Home » जाणून घ्या सीड मदर राहीबाई पोपरे यांचा प्रेरणादायी प्रवास …!
Agriculture

जाणून घ्या सीड मदर राहीबाई पोपरे यांचा प्रेरणादायी प्रवास …!

जिवचक्रामध्ये अन्नसाखळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे .अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे.  लोकसंख्येच्या वाढत्या गरजेमुळे अन्न धान्य पिकवण्यासाठी सुद्धा विविध देशांमध्ये अनेक क्रांती झाल्या. भारतामध्ये सुद्धा हरितक्रांती याचेच प्रतीक आहे. हरितक्रांतीनंतर खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे हेक्टरी उत्पादन होऊ लागले. बियाण्यांमध्ये झालेले वैज्ञानिक बदल यास कारणीभूत आहेत. बहुतेक भाज्या व फळे ही हायब्रीड पद्धतीने पिकवली जाऊ लागली.

मात्र पूर्वीच्या जुन्या पद्धतीने पिकवले जाणारे बियाण्यांचे वाण हे खूप सकस होते व निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त होते हे वारंवार सिद्ध झाले आहे. या दृष्टीने ऑरगॅनिक पद्धतीने पिकांचे उत्पादन करणे ही आता सुरू झाले आहे. मात्र अशा काही व्यक्ती आहेत ज्यांनी खूप वर्षांपासून चालत आलेल्या बियाण्यांचे वाण आजही एखाद्या संपत्तीप्रमाणे जतन करून ठेवले आहेत. अशाच एक व्यक्ती म्हणजे राहीबाई पोपेरे होय.

अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे गावाच्या राहीबाई रहिवासी आहेत. आपल्या आदीच्या पिढ्यांनी वापरलेल्या वाणिच्या बियांचे संवर्धन करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी राबवले आहे. त्यांच्या जोडीला तीन हजार स्त्रिया असलेला बचत गट आहे. एका छोट्याशा गावामध्ये राहणा-या या महिलेला येथे हे मोलाचे कार्य करण्याची प्रेरणा कुठून मिळाली याचे मूळ हे तुमच्या भोवताली परिस्थितीतच असल्याचे राहीबाई सांगतात.

पूर्वीच्या काळी सकस अन्न खाल्ले जात असे व हे सगळं पिकवण्यासाठी संकरित वाणांचा कमी वापर केला जात असे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये हायब्रीड अन्न मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते यामुळे अगदी लहानपणापासूनच मुलांच्या कुपोषणाचे प्रमाण वाढल्याचे त्या सांगतात. यावर उपाय म्हणून आपण पुढील पिढीसाठी बियाण्यांचे जुने वाण जतन करून ठेवण्याचे निश्चित केल्याचे त्या सांगतात.

राहीबाई या आपले स्वतःचे सीड बँक चालवतात. या सीड बँक मुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक पद्धतीची पिकं घेण्यास सुरुवात केली आहे ज्यामध्ये रासायनिक प्रक्रिया केल्या जात नाहीत. राहीबाई यांच्या कार्याची दखल ही आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांचा उद्योग बीजमाता असा केला आहे. जगभरातील शंभर प्रतिभावंत महिलांमध्ये देखील राहीबाई यांचा समावेश करण्यात आला आहे.

2020 साली भारत सरकारने देखील राहीबाई यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री हा नागरी पुरस्कार प्रदान केला आहे. केवळ पुरस्कारापुरतेच न थांबता आपल्या या कार्याला अखंडपणे करण्याची त्यांची इच्छा आहे व म्हणूनच बियाण्यांच्या वाणांविषयी व आपल्या सीड बँकेविषयी बोलताना त्या अगदी हरखून जातात यातच त्यांचे साधेपण व मातीशी जोडलेली नाळ दिसून येते.