Home » सगळ्यांनी पाठ फिरवली परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी दिला काश्मिरी पंडितांना आधार…!
Article

सगळ्यांनी पाठ फिरवली परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी दिला काश्मिरी पंडितांना आधार…!

कलाक्षेत्राचा हेतू मनोरंजना पुरता मर्यादित न राहता समाजातील वास्तव समोर आणणे हा सुद्धा असतो.अनेक कलाकृतींद्वारे समाजामध्ये याअगोदर घडलेल्या अन्यायाविरुद्ध प्रबोधन केले जाते.अगोदरच घडलेल्या अन्यायमूलक कृतीमध्ये या कलाकृतींमुळे कोणत्याही प्रकारचा बदल घडणार नसतो मात्र या वास्तवाचे अनेक कंगोरे मात्र निश्चितच समोर येतात.असाच एक चित्रपट म्हणजे काश्मीर फाइल्स होय.

या चित्रपटाद्वारे कश्मीर खो-यातून 1990 साली काश्मिरी पंडितांना द्वेषमूलक वागणूक देऊन अक्षरशः हाकलून देण्यात आले होते व या ठिकाणाहून आपले घर,संपत्ती,मालमत्ता इत्यादींवर पाणी सोडून बेघर करण्यात आले होते.यावेळी कश्मिरी पंडित यांना झालेल्या वेदना आज सुद्धा भरून आलेल्या नाहीत.याच वेदनांचे वास्तववादी दर्शन कश्मीर फाइल्स या चित्रपटामध्ये विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.हा चित्रपट सर्व स्तरांमध्ये लोकप्रिय होत आहे.

यानिमित्ताने पुन्हा एकदा काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाचा मुद्दा समोर आला आहे.त्यावेळी सत्ते मध्ये असलेल्या काँग्रेस सरकारने कश्मीरी पंडितांवर असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही व एकंदरीतच या संवेदनशील मुद्द्याला हात घालण्याची धैर्य कोणत्याही राजकीय पक्षाने दाखवले नाही.याला अपवाद होता तो फक्त शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा.काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधी आपल्या काही मागण्या घेऊन बाळासाहेबांकडे आले होते.

बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे दुःख समजून घेऊन त्यांना काही आर्थिक मदत केली.अचानक कश्मीर खोऱ्यात अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडलेल्या काश्मिरी पंडितांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता भेडसावत होती व या दृष्टीने महाराष्ट्रातील महाविद्यालय व काही शिक्षण संस्थांमध्ये कश्मिरी खोऱ्यातील या मुलांसाठी काही विशिष्ट टक्के आरक्षण ठेवण्यात आले.त्यावेळी महाराष्ट्र मध्ये शरद पवार यांचे सरकार होते व केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या मागणीमुळे हे आरक्षण मान्य केले होते.

बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच सावध भूमिका घेण्याचे टाळले व पाकिस्तान असो किंवा कोणत्याही विशिष्ट धर्माविषयी असो त्यांनी अगदी खुलेआम सडेतोड भाष्य केले होते.अशाप्रकारे ज्यावेळी आधाराची गरज होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे कोणत्याही राजकीय हितसंबंधांची अपेक्षा न ठेवता पुढे सरसावले होते व याची जाणीव या बांधवांकडून ठेवली जाते व म्हणूनच कांग्रा  येथे विस्थापित झालेले काश्मिरी पंडित बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला त्यांना आदरांजली वाहतात.