Articles News

…म्हणून विमानाला वाँटर सँल्युट दिला जातो.

एखाद्याच्या उत्तुंग कर्तृत्वासाठी किंवा कामगिरीसाठी त्याला तोफांची सलामी देण्याची पद्धत आपण खूप आधीपासून जाणतो ,मात्र एखाद्या विमानाला पाण्याची सलामी किंवा वॉटर सँल्युट देण्याची पद्धत सुद्धा आहे हे ऐकून थोडेसे आश्चर्यचकित व्हायला नक्कीच होईल .वॉटर सॅल्यूट ही पद्धत म्हणजे नक्की काय व ती विमानाला का दिले जाते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

विमानाच्या वरच्या भागावर पाण्याचा फवारा केला जातो या पद्धतीला वॉटर सँल्युट असे म्हटले जाते.काही लोकांच्या मते विमानाच्या वाढलेल्या तापमानाला थंड करण्यासाठी त्याच्यावर पाण्याचा फवारा केला जातो मात्र यामध्ये काही तथ्य नाही कारण विमान वातावरणाच्या ज्या थरामध्ये उड्डाण करत असते त्या उंचीवर विमानाचे तापमान योग्य राखले जाते. जसे की एखाद्या सजीव व्यक्तीच्या बाबतीत त्याने केलेल्या चांगल्या कामगिरीच्या सन्मानासाठी त्याला मानवंदना दिली जाते किंवा सलामी दिली जाते अगदी त्याचप्रमाणे विमानाला सुद्धा काही विशिष्ट प्रसंगी वॉटर सॅल्युट दिला जातो.

विमानांचा वापर करण्यापूर्वी समुद्रामध्ये जहाजा द्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात असे. त्या काळी कोणतेही नवीन जहाज जेव्हा जलसफरी ला आरंभ करणार असायचे तेव्हा त्याच्यावर चोहोबाजूंनी पाण्याचा फवारा उडवला जात असे यालाच वॉटर सॅल्यूट असे म्हटले जात असे व जेव्हा विमानाचा वापर सुरू झाला तेव्हा सुद्धा कोणतेही नवीन विमान जेव्हा वाहतुकीच्या विमानांच्या ताफ्यामध्ये सामील होते तेव्हा त्याच्या पहिल्या उड्डाणाच्या प्रसंगी वॉटर सॅल्यूट देण्याची परंपरा सुरू करण्यात आली.

काही प्रसंगी जेव्हा एखादे विमान एखाद्या विमान तळावरून पहिल्यांदा उड्डाण घेते तेव्हासुद्धा क्वचितप्रसंगी वॉटर सँल्युट दिला जातो.विमानाचे पायलट किंवा चालक यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये अनेक वेळा विमानांची उड्डाणे यशस्वीरित्या पूर्ण केलेली असतात. या विमानाच्या चालकांच्या निवृत्तीच्या वेळी त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीची दखल व सन्मान म्हणून त्या विमानाला वॉटर सँल्युट देण्याची पद्धत आहे.

एखादी विमान उद्योगातील कंपनी एखाद्या नव्या मार्गावर आपली विमान सेवा सुरू करते तेव्हा या हवाई मार्गावरील विमानसेवा सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या दिवशी जे कोणते विमान या ठिकाणी सर्वात प्रथम उड्डाण करते त्याला वाँटर सँल्युट देण्याची विमान उद्योगक्षेत्राची प्रथा आहे.