Actress Articles Bollywood Entertainment TV Shows

मशीनच्या आवाजाने आजसुध्दा घाबरायला होते, काँमेडियन भारतीने सांगितला बालपणीचा थक्क करणारा प्रवास

विनोदाद्वारे एखाद्याचे चेहऱ्यावर हसू झळकवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.गेल्या काही दिवसांपासून  टेलिव्हिजनवर विनोदी कार्यक्रमांची चलती आहे. अनेक कसलेले विनोदी कलाकार यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत.प्रसिद्ध विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे भारती सिंह होय. अभिनयाच्या बाबतीत भारती सिंह कॉमेडी क्वीन म्हणून टेलिव्हिजन जगतामध्ये ओळखली जाते. आज भारती हे नाव सर्वपरिचित आहे व तिचे चाहते सुद्धा देश विदेशामध्ये मोठ्या संख्येने आहेत.इतकी सारी प्रसिद्धी आणि यश मिळविण्या साठी चा भारती चा प्रवास निश्चितच सहज व सोपा नव्हता. आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करत व प्रचंड संघर्ष करत भारती यशाच्या शिखरावर विराजमान झालेली आहे.भारती बऱ्याचदा स्वतः सुद्धा आपल्या संघर्षाचा उल्लेख केलेला आहे.

भारतीचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. भारती भारती तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होती .तिच्या आईचे लग्न अवघ्या सतराव्या वर्षी झाले आणि  तेविसाव्या वर्षापर्यंत तीन मुलांची आई बनून एका वेगळ्या जबाबदारीला तिला सामोरे जावे लागले होते .भारतीला स्टारडम प्राप्त होण्याअगोदर तिची आई एका फॅक्टरी मध्ये काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.

आपल्या बालपणीच्या हालाखीच्या दिवसांबद्दल बोलताना भारती सांगते की आजही शिवण मशीन चा आवाज आला की हृदयामध्ये भीतीने धडधड सुरू होते. भारती ची आई फॅक्टरी मध्ये राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी घरी घेऊन येत असे व आपले सर्व बालपण हे शिवणकामाच्या मशीनचा आवाज ऐकण्यामध्ये गेले आहे. त्यामुळे आजसुदधा शिवणकामाच्या मशीन चा आवाज आला की अंगावर काटा येतो असे भारती आपल्या लहानपणीच्या कष्टांबद्दल सांगते.

वयाच्या दुसऱ्या वर्षी भारतीच्या वडिलांचे निधन झाले.इतक्या लहान वयात पितृछत्र हरवल्यामुळे आपल्याला वडिलांच्या आठवणी नसल्याचे सांगते. मात्र वडिलांच्या निधनानंतर भारतीच्या आईने दुसरे लग्न केले नाही व संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या अंगावर घेतली. सगळे बालपण हे गरिबीचे चटके खात गेल्याचे भारती सांगते .लहानपणी आपली आई व मोठे भाऊ दिवस-रात्र मेहनत करत असत केवळ डोक्यावर छत आणि  खायला दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून. वेळ पडली तेव्हा अर्धपोटी राहून आम्ही गुजराण केली आहे असे भारती सांगते.

आपले कुटुंबीय आर्थिक संकटात होते व जवळपास फारसे पैसे नसल्यामुळे आपण अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला असे भारती सांगते. अमृतसर मधून जेव्हा मुंबईला ती अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी आली तेव्हा तिच्या निर्णयावर तिचा नातलगांना जराही विश्वास नव्हता. सुरुवातीच्या काळात ती स्टेजवर कॉमेडी करत असे तेव्हा तिची सगळे मस्करी करत असत तेच नातलग आज त्यांच्या मुलांना अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मार्गदर्शन करण्याबद्दल तिला सांगतात.

प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता कठोर परिश्रमांच्या आधारावर भारती ने आज आपली स्वतःची ओळख बनवली आहे. 2018साली हर्ष लिंबाचीया याच्यासोबत भारतीने विवाह केला. सुरूवातीला बेस्ट फ्रेंड असलेल्या भारती आणि हर्ष यांनी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केले होते.आजही निरनिराळ्या विनोदी व्हिडिओ द्वारे ते आपल्या चाहत्यांना हसवत असतात.