Home » चित्रपट सृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन…
Celebrities

चित्रपट सृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन…

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. रेखा कामत यांचे निधन त्यांच्या माहीम येथील निवासस्थानी झाले.रेखा कामत या गेली अनेक दशके वेगवेगळ्या माध्यमांमधून अभिनय क्षेत्रामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत होत्या. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी काही चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका साकारल्या होत्या.यानंतर गेली काही वर्ष त्या मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्रीच्या भूमिका साकारत होत्या.

1952 साली लाखाची गोष्ट या चित्रपटातून राजा गोसावी यांच्यासोबत सर्वात प्रथम रेखा कामत यांनी नायिकेच्या रूपात चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले.त्यांचे माहेरचे नाव कुमुद सुखटणकर होते. त्यांचा विवाह लेखक गो.रा. कामत यांच्याशी झाल्यानंतर त्यांचे नाव रेखा कामत झाले.

चित्रपटांप्रमाणे त्यांनी प्रपंच, एका लग्नाची दुसरी गोष्ट ,सांजसावल्या यांसारख्या मालिकांमध्येही खूप उत्कृष्ट अभिनय केला होता व आजीची भूमिका साकारावी तर रेखा कामत यांनी अशी पावती सुदधा चाहत्यांकडून त्यांना मिळाली होती. रेखा कामत यांनी संगीत नाटकांमध्ये सुद्धा काम केले आहे व टेलिव्हिजनवरील इतक्या अमाप लोकप्रियते नंतरही त्यांचे झुकते माप हे नेहमीच रंगभूमीला होते.

कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’, ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘माझी जमीन’ अगंबाई अरेच्चा’या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका विशेष गाजल्या होत्या.

सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘संशयकल्लोळ’ आदी संगीत नाटकांतून तसेच ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘कालचक्र’या व्यावसायिक प्रकारात मोडणा-या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत.