Home » वॉचमन ते प्रसिद्ध सुपरस्टार! नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा खडतर प्रवास…
Celebrities

वॉचमन ते प्रसिद्ध सुपरस्टार! नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा खडतर प्रवास…

बॉलीवूड मध्ये नेपोटिझमचा आरोप होत असताना असे ही काही अभिनेते व अभिनेत्री आहेत ज्यांनी अगदी सर्वसाधारण रंगरूप व सामान्य परिस्थितीमध्ये येऊन बॉलिवूडमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे व आज ते यशस्वी कलाकारांच्या यादी मध्ये जाऊन बसली आहे.तसाच एक कलाकार म्हणजे नवाजुद्दीन सिद्दिकी होय.1974 साली उत्तर प्रदेश मधील एका छोट्याशा गावांमध्ये जन्म घेतलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी चे रंग रूप हे तथाकथित हिरो मटेरियल मध्ये बसणारे नक्कीच नव्हते.

तब्बल 15 वर्षाच्या संघर्षानंतर नवाजुद्दीनला बॉलिवूड मध्ये आपले स्थान निर्माण करता आले मात्र नवाजुद्दीन आज सुद्धा आपल्या गावाला विसरलेला नाही.तो आजही गावी जातो आपल्या शेतामध्ये काम  करतो.आज आपण नवाजुद्दीन चा बॉलिवुडमधील प्रवास व संघर्ष जाणून घेऊया.1999 साली आलेल्या सरफरोश या सुपरहिट चित्रपटाद्वारे नवाजुद्दीन सिद्दिकी चे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले.

या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन ची भूमिका खूपच छोटीशी होती व नवाजुद्दीन या भूमिकेमध्ये फारसा कुणाच्या लक्षातही आला नाही.यानंतर 2012 सालापर्यंत नवाजुद्दीन ने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या.मात्र दखल घेण्याजोगे काम त्याला मिळत नव्हते.अनुराग कश्यपच्या गॅंग्ज ऑफ वासेपुर या चित्रपटांमधील फैजल ची भुमिका अनुरागने नवाजुद्दीन ला दिली व या संधीचे सोने करत नवाजुद्दीनने साकारलेला फैसल हा खूपच लोकप्रिय झाला.

यानंतर नवाजुद्दीनने मागे पाहिले नाही व विविध प्रकारच्या भूमिका त्याच्या वाट्याला आल्या.प्रत्येक भूमिकेमध्ये नवाजुद्दीन एकदम फिट कसा बसतो हे प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकतेचे वाटेल.काही दिवसांपूर्वी या गोष्टी मागचे रहस्य नवाजुद्दीन ने स्वतः उलगडले.त्याच्या मते एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर तो गावी जाऊन राहतो.तिथे शेतामध्ये काम करून आपले मन रमते.यामधून त्याला आंतरिक शांती मिळते व यानंतर पुन्हा एकदा नवीन भूमिकेमध्ये समरसून जाण्यास तो तयार असतो.नवाजुद्दीन चे लहानपण हे हलाखीत गेले.

त्याच्या कुटुंबामध्ये सात भावंडे इतके मोठे कुटुंब होते.घरामध्ये चित्रपटाला अनुकूल असे वातावरण फारसे नव्हते कारण घरच्या रोजीरोटीची चिंता भेडसावत असताना चित्रपट हा विषय सुद्धा डोक्यात येत नसे.मात्र नवाजुद्दीन च्या वडिलांना नवाजुद्दीन ने खूप शिकून काहीतरी चांगले करावे असे नेहमी वाटत असे.मात्र नक्की काय शिकावे याबाबत त्यांना स्पष्टता नव्हती.नवाजुद्दीनने हरिद्वार येथील विद्यापीठामधून कसेबसे शास्त्र शाखेमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले व यानंतर दोन वर्षे तो बेरोजगार म्हणूनच राहिला.

कुठेही नोकरी मिळत नव्हती.नोकरीच्या शोधात वणवण फिरत होता. अशातच बडोदा येथे एका पेट्रो केमिकल कंपनी मध्ये त्याला नोकरी मिळाली.याठिकाणी अतिशय जीवघेणा अनुभव घेतल्याचे नवाजुद्दीन सांगतो कारण प्रत्येक प्रकारच्या रासायनिक द्रव्यांना टेस्ट करण्याचे काम त्याला याठिकाणी करावे लागत होते.या कामांमध्ये मन रमत नव्हते यामुळे त्यांनी दिल्लीकडे कूच केले व या ठिकाणी नवीन नोकरी शोधू लागला.या ठिकाणी त्याने वॉचमनची नोकरी सुद्धा केली. आयुष्यामध्ये काहीतरी वेगळे करायचे आहे हे सुरुवातीपासूनच नवाजुद्दीन च्या मनात होते मात्र ते वेगळे म्हणजे काय हे त्याला कळत नव्हते.

अशातच एक दिवस मित्रांसोबत तो नाटक बघण्यासाठी गेला ते नाटक बघून तो अक्षरशः हरखून गेला व याच वेळी त्याला कळले की त्याला नाटक किंवा अभिनय करायचा आहे.त्याने साक्षी,सौरभ शुक्ला ही कलाकार मंडळी असलेल्या एका नाटकाच्या ग्रुपला सहभागी झाला.या ठिकाणी त्याला खूप रस येत होता. मात्र नाटकाच्या प्रयोगांमधून फारसे पैसे मिळत नसत.रोजच्या खाण्यापिण्याचे खर्चही त्यामधून कधीकधी भागत नसत.दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू नये म्हणून त्याने त्या वेळी वॉचमनची नोकरी केली.