Home » कधी काळी रस्त्यावर पेन विकून गुजराण करत होता हा प्रसिद्ध कॉमेडियन,नाव ऐकून थक्क व्हाल…
Celebrities

कधी काळी रस्त्यावर पेन विकून गुजराण करत होता हा प्रसिद्ध कॉमेडियन,नाव ऐकून थक्क व्हाल…

हिंदी सिनेसृष्टीने अनेक उत्तमोत्तम विनोदवीर निर्माण केले आहेत,त्यांपैकीच ८० व ९० च्या दशकामध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध विनोद वीर म्हणजे जॉनी लिव्हर होय.८० आणि ९० च्या दशका मध्ये जॉनी लिव्हर यांनी विनोदाची व्याख्या बदलून टाकली होती.जॉनी लिव्हर हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व मानले जाते. जॉनी लिव्हर यांच्या विनोदी अभिनयाची प्रेक्षकांनी व समीक्षकांनी सुद्धा खूप प्रशंसा केली आहे.जॉनी लिव्हर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्रप्रदेश येथे झाला होता.नुकतीच त्यांनी आपल्या वयाची ६४ वर्षे पूर्ण केली आहेत व मोठ्या थाटामाटात आपला वाढदिवस सुद्धा साजरा केला आहे .यानिमित्ताने जॉनी लिव्हर यांच्या आयुष्याशी निगडीत काही रोमांचक अशी तथ्य आपण जाणून घेणार आहोत.

जॉनी लिव्हर यांचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला होता.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांचे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होते.आपल्या कुटुंबाच्या आर्थिक जबाबदारीला पेलण्यासाठी खुप लहान वयात जॉनी लिव्हर यांनी आपल्या खांद्यांवर ही जबाबदारी घेतली व रस्त्यावर पेन विकण्याचे काम त्यांनी सुरू केले.खूप लहान वयातच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम सुरू केल्यामुळे जॉनी लिव्हर यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.जॉनी लिव्हर हे उपजतच कलाकार होते व त्यामुळे त्यांनी रस्त्यावर पेन विकतांना आपल्या कलेचा वापर केला व पेन विकण्यासाठी ते नृत्य करत असत.त्यामुळे निश्चितच लोक त्यांच्या कलेकडे आकृष्ट होऊन त्यांच्याकडील पेनची खरेदी करत असत व यातून त्यांना थोडीबहुत जास्त कमाई होत असे.

सध्या स्टॅंड अप कॉमेडीचे जणू काही पेवच फुटले आहे.मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जॉनी लिव्हर यांना भारतातील पहिले स्टँडअप कॉमेडियन मानले जाते .जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाश राव जुनमाला असे आहे.जॉनी लिव्हर यांनी तब्बल ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी जॉनी लिव्हर हे हिंदुस्तान लिव्हर या कंपनीमध्ये काम करत होते.याठिकाणी जॉनी लिव्हर यांचे काम शारीरिक मेहनतीचे होते.त्यांना जवळपास १०० किलोहून अधिक वजनाचे ड्रम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उचलून ठेवावे लागत असत.

जॉनी लिव्हर यांना अगदी सुरुवातीपासूनच अभिनयाची व विनोदी अभिनयाची खूप आवड होती.ते आपल्या मित्रांना विविध प्रकारचे मिमिक्री आणि अभिनय करून त्यांचे मनोरंजन करत असत.यामुळेच कामाच्या ठिकाणी त्यांचे नाव जॉन लिवर असे पडले व संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत व जगभरात त्यांचे हेच नाव पुढे प्रसिद्ध झाले.

जॉनी लिव्हर यांनी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये केलेल्या कामगिरीची पावती ही त्यांना मिळालेल्या १३ फिल्मफेअर अवॉर्ड मधूनच मिळते.तेरा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवलेले जॉनी लिव्हर हे एक प्रसिद्ध विनोदी अभिनेते आहेत.असे मत आहे की आजपर्यंत जॉनी लिव्हर यांच्यासारखा विनोदी अभिनेता झाला नाही व काही लोकांचे असे म्हणणे आहे की निदान ८० व ९० च्या दशकात तरी जॉनी लिव्हर यांच्या बरोबरीचा विनोदी अभिनेता शोधूनही सापडणार नाही.

जॉनी लिव्हर यांनी केवळ चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या नाही तर त्यांना मिमिक्री ची सुद्धा आवड होती व मिमिक्री करण्यामध्ये ते खुपच पारंगत होते.चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापूर्वी जॉनी लिव्हर यांनी अनेक स्टेज शो केले आहेत व अशाच एका स्टेज शो मध्ये त्यांनी ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांना खूपच प्रभावित केले होते.या संदर्भात असे सांगितले जाते की जॉनी लीवर यांचा एक स्टेज शो‌ पाहण्यासाठी सुनील दत्त गेले होते व त्यावेळी जॉनी लिव्हर यांचा अभिनय व मिमेक्री पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जॉनी लिव्हर यांना आपला दर्द का रिश्ता या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली व अशाप्रकारे जॉनी लिव्हर यांची बॉलिवूड मधे एंट्री झाली.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर जॉनी लिव्हर यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.यशाची एकापाठोपाठ शिखरे त्यांनी सर केली.जॉनी लिव्हर यांचे काम चाहत्यांना चांगलेच पसंतीस पडत होते.आज सुद्धा बॉलिवूडमधील विनोदी कलाकारांच्या नावांमध्ये जॉनी लिव्हर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.ऐंशीच्या दशकामध्ये जॉनी लिव्हर यांची लोकप्रियता खूपच वाढली होती.

८० आणि ९० च्या दशकामध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये जॉनी लिव्हर यांनी अभिनय केला होता.त्यावेळी जॉनी लिव्हर हे सर्वात व्यस्त दिनक्रम असलेल्या अभिनेत्यांमध्ये गणले जात होते.सन २००० मध्ये जॉनी लिव्हर यांच्या तब्बल पंचवीस चित्रपट एकाच वर्षात प्रदर्शित झाले होते.मोठमोठ्या सुपस्टार्सचेसुद्धा वर्षभरात तीन ते चार चित्रपट रिलीज होतात.मात्र जॉनी लिव्हर यांचे एका वर्षात २५ चित्रपट प्रदर्शित झाले होते.

 आपल्या निखळ विनोदी शैलीने हसवणाऱ्या या कलाकाराला आयुष्यामध्ये अनेक चढ-उतारानाही सामोरे जावे लागले आहे. खूप कमी लोकांना माहीत असेल की जॉनी लिव्हर यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. इतक्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलाकाराला तुरुंगाची हवा का खावी लागली असेल हा प्रश्न पडतो.आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.या प्रकरणात त्यांना सात दिवस तुरुंगात काढावे लागले होते.काही‌ काळानंतर  त्यांच्यावरील हा आरोप हटवला गेला.