Home » प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांनी गमावले स्वतः चे प्राण…
history

प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांनी गमावले स्वतः चे प्राण…

आज भारतामधील स्त्रिया व मुली यांच्या साक्षरतेचे प्रमाण खूप मोठे आहे व ज्ञान,विज्ञान,तंत्रज्ञान,अभियांत्रिकी,सैन्यदल,वैद्यक शाखा या सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय महिला आघाडीवर आहेत.मात्र एक काळ असा होता जेव्हा शिक्षणाची दारे ही समाजातील महत्वपूर्ण टक्केवारी असलेल्या स्त्रियांसाठी बंद होती.समाजातील सनातन विचार व रूढी मुळे स्त्रियांना अज्ञानाच्या खाईत ढकलले गेलेले होते.स्त्रियांच्या शिक्षणामुळे कुठले तरी मोठे संकट येईल अशी भीती जनमानसामध्ये रुजवली गेली होती व यामुळेच त्याकाळी सुधारक मंडळी सुद्धा स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न करण्यास कचरत असत.

त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना शिक्षित करून स्त्री शिक्षणाचे महान कार्य सुरू केले.सावित्रीबाईंना या कार्यामध्ये प्रचंड अवहेलना सहन कराव्या लागल्या मात्र आपल्या पतीने घेतलेले हे महान कार्य त्यांनी अगदी हिमतीने पुढे नेले.सावित्रीबाई या केवळ शिक्षित झाल्या नाही तर काळाच्या पुढे जाऊन समाजामध्ये माजलेल्या अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी,परंपरांच्या जोखडा च्या त्या पुढे गेल्या होत्या म्हणूनच त्यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीकडे वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पद्धतीने बघण्याचा दृष्टिकोन विकसित झाला होता याची प्रचीती जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती तेव्हा आली.

ही गोष्ट आहे 1894 सालची.त्यावेळी चीन मधील युनान प्रांतांमध्ये प्लेगची साथ पसरली होती.चीनमधील युनान प्रांत हा त्यावेळी अफूचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र होता.या ठिकाणाहून सर्वत्र अफूचा व्यापार जहाजा मार्फत केला जात असे.या अफूमार्फतच मेकांग नदीद्वारे जहाजावरील उंदरांच्या माध्यमातून प्लेग हॉंगकॉंग कलकत्ता असा प्रवास करत पुण्यामध्ये पसरला व अगदी थैमान घालू लागला.प्लेग झालेल्या व्यक्तीला सात दिवसांमध्ये उलट्या,सर्दी,ताप,जुलाब यांसारखी लक्षणे दिसू लागत असत व जर वेळीच उपचार केला गेला नाही तर ती व्यक्ती न्युमोनिया ला बळी पडत असे.

त्याकाळी प्लेगचा उपचारांसाठी अँटिबायोटिक किंवा ऑक्सीजन सिलेंडर सारखे उपचार नव्हते.या आजारामुळे भारतामध्ये लाखो लोकांनी आपले प्राण गमावले होते.या आजाराची इतकी मोठी धास्ती पसरली होती की खुद्द डॉक्टर सुद्धा या रोग्यांवर उपचार करण्यास घाबरत होते.अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले प्लेगच्या आजारांमध्ये लोकांची मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या.त्यांनी आपला मुलगा डॉक्टर यशवंतराव फुले यांच्या सोबत पुण्यामध्ये प्लेगच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक क्लीनिक सुरू केले.अशातच एक दिवस त्यांना कळले की हरिजन वस्ती मध्ये प्लेगची साथ पसरली आहे व तिथे राहणाऱ्या पांडुरंग गायकवाड यांचा मुलगा हा प्लेग या आजाराने गंभीर अवस्थेत आहे.

ही बातमी कळताच सावित्रीबाई फुले क्षणाचाही विलंब न करता हरिजन वस्ती मध्ये पोहोचल्या व त्यांनी पांडुरंग गायकवाड यांच्या दहा वर्षाच्या मुलाला स्वतःच्या पाठीवर टाकून आपल्या दवाखान्यामध्ये आणले.या ठिकाणी या मुलावर वेळीच उपचार करण्यात आले त्यामुळे तो बचावला.मात्र सावित्रीबाई फुले यांना यावेळी प्लेगची लागण झाली व या आजाराचा त्या बळी ठरल्या.यानंतर 1904 साली त्यांचा मुलगा सुद्धा प्लेगग्रस्त रुग्णांचे उपचार करताना त्याला स्वतःला प्लेगची लागण होऊन मरण पावला.

सावित्रीबाई फुले यांनी पांडुरंग गायकवाड यांच्या मुलाला वेळीच दवाखान्यात आणल्यामुळे वस्तीतील अन्य लोकांमध्ये आजाराचे संक्रमण होण्यापासून ही बचाव झाला.सावित्रीबाई फुले आज संपूर्ण जगभरामध्ये स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून ओळखल्या जातात ते उगाच नाही.सावित्रीबाई फुले यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातील अनेक घटनां द्वारे मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे वेळोवेळी दाखवून दिले आहे.