Home » नेहमी आई बहिणीवरच शिव्या का दिल्या जातात? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास…
Article History

नेहमी आई बहिणीवरच शिव्या का दिल्या जातात? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास…

दैनंदिन आयुष्यामध्ये जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडते किंवा आपल्याला राग येतो तेव्हा हा राग किंवा चीड व्यक्त करण्याचे प्रत्येकाचे मार्ग हे वेगवेगळे असतात.मात्र बहुतांश वेळा समोरच्याला दुखावेल असे बोलणे हा एक सरळसोट मार्ग अवलंबला जातो.शिव्या देणे हा प्रकार यामध्ये अतिशय सर्वसाधारण मानला जातो.सार्वजनिक ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा केवळ राग आल्यावरच नव्हे तर गमतीजमती मध्ये सुद्धा अनेकदा समोरच्या व्यक्तीला शिवी दिली जाते. या शिव्यां मध्ये बऱ्याचदा स्त्री वाचक,जातिवाचक,धर्मवाचक ,प्रांत वाचक अशा अनुषंगाने समोरच्या व्यक्तीची अवहेलना केली जाते.

मात्र यामध्ये काही वावगे आहे असे आतापर्यंत तरी कुणाला वाटले नाही.कारण शिवी देणे हा प्रकार वर्षानुवर्षे चालू आहे.आपल्या समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या पद्धतीच कला क्षेत्रामध्ये सुद्धा अवलंबल्या जातात व या अनुषंगाने नाटकांमध्ये,चित्रपटांमध्ये व सध्या लोकप्रिय ठरणाऱ्या वेबसिरीज मध्ये सुद्धा शिव्यांचे प्रमाण खूप अधिक आहे व आश्चर्याची गोष्ट म्हणजे यावर आक्षेप न घेता प्रेक्षकवर्ग या शिव्या एन्जॉय करताना दिसून येतो.या शिव्यांवर अनेक प्रकारचे मिम सुद्धा तयार होऊन ते व्हायरल सुद्धा होतात.यांमध्ये एखादी विशिष्ट जात किंवा स्त्रियांनाच का ओढले जाते हा प्रश्न निर्माण होणे खूप गरजेचे ठरते व हा प्रश्न केवळ समोर न ठेवता याचे उत्तर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न दोन तरुणी गाली प्रोजेक्ट मधून करत आहेत.

जेव्हा दोन व्यक्तींचे भांडण झालेले असते तेव्हा प्रत्यक्ष दुरान्वये संबंध नसलेल्या एखाद्या तिसर्‍या व्यक्तीला यामध्ये शिवीच्या स्वरूपात ओढणे थांबवण्यासाठी म्हणजेच स्त्रिया किंवा जातीवाचक शिव्यांना थांबून त्याऐवजी कोणत्याही वर्गाला अपमानित न करणाऱ्या शब्दांना शिव्या म्हणून वापरण्यासाठी दोन मैत्रिणी तमन्ना मिश्रा व नेहा ठाकूर यांनी मिळून गाली प्रोजेक्ट सुरू केला आहे.हा प्रकल्प क्राउड सोर्सिंग स्वरूपाचा आहे. यामध्ये गुगल फॉर्म च्या मदतीने आपल्या ओळखीतील विविध प्रदेशांमधील लोकांना या दोघींनी समोरच्या व्यक्तीला जातिवाचक किंवा स्त्रीयांचा उल्लेख न करता शिवी म्हणून देता येऊ शकणाऱ्या शब्दांना सांगण्याची विनंती केली. इंस्टाग्राम फेसबुक वर या प्रोजेक्टचे हँडल सुरू करण्यात आले. या प्रकल्पाद्वारे शिव्या देण्यासाठी कोणते शब्द हे योग्य ठरू शकतात याचे स्पष्टीकरण देणे चालू करण्यात आले आहे.

जागतिक स्तरावर सुद्धा असे अनेक शब्द आहेत त्यामुळे महिलांना अपमानजनक पद्धतीने संबोधले जाते.जागतिक स्तरावरही या शब्दांना पर्यायी शब्द शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.आजही अनेक ठिकाणी खूप सहजपणे आपला राग,चीड नैराश्य व्यक्त करण्यासाठी स्त्रियांवरील हिंसा प्रधान शब्दांना शिवी म्हणून वापरले जाते.शिवी म्हणून वापरले जाणारे हे शब्द म्हणजे आधीच संकुचित मानसिकता ठेवून पाहिल्या जाणाऱ्या वर्गांना अधिकच कोपऱ्यात ढकलण्यासारखे आहे.

गाली प्रकल्पासाठी १५ राज्यांमधून जवळपास आठशे प्रतिसाद आत्तापर्यंत निवडले गेले आहेत.आत्तापर्यंत दिल्या गेलेल्या प्रतिसादां पैकी ३० टक्के प्रतिसादांमध्ये ही स्त्रीवाचक व जातीवाचक शब्दांचा उल्लेख असल्यामुळे ते शब्द वगळले गेले.गाली प्रोजेक्टमध्ये निवडल्या गेलेल्या शब्दांना फेसबुक आणि इंस्टाग्राम वरील पेजवर शेअर केले जाते व या शब्दाशी निगडीत मिम्स तयार केले जातात. या शब्दांचा अर्थ अतिशय रंजक पद्धतीने सांगितला जातो यामुळे वाचकांना सुद्धा निश्चितच हसू येते.

गाली प्रोजेक्टमध्ये आत्तापर्यंत आसामी, हिंदी, बंगाली, मराठी ,पंजाबी, तेलगु, कन्नड ,तमिळ या भाषांमधील काही असे शब्द निवडले आहेत जे प्रचलित असलेल्या शिव्यांना चांगले पर्याय ठरू शकतात.

या शिव्या किंवा हे शब्द वाचकांना  आवडतातही मात्र काही वाचकांच्या मते हे शब्द वापरताना शिवी दिल्याचा फिल येत नाही.तमन्ना मिश्रा व नेहा ठाकूर यांचा गाली प्रोजेक्टचा मुख्य उद्देश एका रात्रीमध्ये क्रांती घडवून आणण्याचा नाही तर हळूहळू या शब्दां पैकी थोडेफार शब्द जरी सर्वसामान्य माणसांच्या तोंडात बसले तर स्त्रिया आणि काही विशिष्ट जातींचा केला जाणारा अपमान जनक उल्लेख टाळला जाईल अशी आशा त्यांना वाटते .या शब्दांना सांगताना गाली प्रोजेक्टचा उद्देश हा कोणत्याही प्रकारे शिकवण देण्याचा नसून हसत-खेळत हे शब्द समाजामध्ये रुजवण्याचा आहे.या शब्दांना एखाद्या संग्रहाच्या रूपामध्ये समाजासमोर आणण्याचाही या दोघींचा मानस आहे.

दैनंदिन आयुष्यामध्ये शिव्यांचा वापर करणे कधी सुरू झाले याचा शोध घेणे हे खूपच रंजक ठरेल. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी मानली जाते.  संस्कृत भाषेमध्ये एकाही शिवीचा उल्लेख नाही. संस्कृत भाषेमध्ये कृपण यांसारख्या शब्दांचा वापर हा एखाद्याला राग व्यक्त करण्यासाठी वापरला जात असे. संस्कृत ,प्राकृत व पाली भाषांमधून मधून निर्माण झालेल्या काही दाक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये शिव्यांचा उल्लेख दिसून येत नाही.नंतरच्या काळामध्ये व्यापार व अन्य कारणांमुळे जेव्हा विविध प्रदेशांचा एकमेकांशी संपर्क वाढू लागला तेव्हा शिव्यांचा वापर होऊ लागल्याचे निष्कर्ष काही भाषा तज्ञांनी काढले.

वैदिक काळामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने मानले जात होते, स्त्री पुरुष समानता होती. मात्र नंतरच्या काळात जेव्हा एकमेकांच्या प्रदेशांवर आक्रमणे केली जाऊ लागली तेव्हाच स्त्री हा एक प्रकारे पुरुषी अहंकाराचा विषय बनला व यातूनच स्त्रीयांचा उल्लेख शिवी दर्शक भाषेमध्ये केला जावू लागला. आदिवासी समाजामध्ये स्त्रियांना घराची इज्जत मानली जात असे त्यामुळेच जेव्हा एखाद्या पुरुषाला त्याच्या घरातील स्त्री वरून शिवी दिली जात असे तेव्हा तो त्याच्यासाठी खूप मोठा अपमान मानला जाई. अशाप्रकारे स्त्रियांवरील शिव्यांची सुरुवात झाल्याचा अंदाज काढला जातो.

समाजामध्ये जशी जशी सामाजिक स्थित्यंतरे आली तसतशी समाजाची मानसिकताही बदलू लागली. वर्ग व्यवस्था व वर्णव्यवस्था ही बदलू लागले.पूर्वीच्या काळी केवळ काही कनिष्ठ वर्गाकडून शिव्यांचा वापर केला जात असे व तो सार्वजनिक ठिकाणी करणे निषिद्ध मानले जाई

 मात्र सध्या उच्चशिक्षित उच्चभ्रू वर्ग सुद्धा शिव्यांचा वापर करताना दिसून येतात. मात्र स्त्रियांना कुठेतरी कनिष्ठ दर्जा देऊन व स्त्रियांचे रक्षण ही आपली मुख्य जबाबदारी आहे हा अहंकार बाळगणाऱ्या पुरुषी मानसिकतेला या शिव्या दर्शवतात हे नजरेआड करून चालणार नाही.

लोकगीतांमध्ये सुद्धा शिव्यांचा उल्लेख आढळून येतो. मात्र या शिव्या गमतीजमती मध्ये दिल्या जातात .विशेषकरून लग्नप्रसंगी मुलाकडील व मुलीकडील परिवारांना एकमेकांची थट्टा करण्यासाठी या लोकगीतांमध्ये शिव्यांचा आधार घेतला जातो.