Home » लाल किल्यावर ब्रिटिशांचा ध्वज काढून तिरंगा फडकावणारे शहानवाज खान…
History

लाल किल्यावर ब्रिटिशांचा ध्वज काढून तिरंगा फडकावणारे शहानवाज खान…

भारताच्या ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे .या लोकांच्या त्याग, देशप्रेम  व समर्पणा मुळे आज आपण स्वतंत्र भारतामध्ये राहू शकत आहोत व स्वातंत्र्य उपभोगू शकत आहोत. मात्र  अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खूप मोठे असूनही त्यांचे सध्या विस्मरण पडले आहे.अशाच एका महान व्यक्तिमत्त्वा विषयी आज आपण जाणून घेणार आहोत जे काळाच्या ओघात काहीसे पडद्याआड गेले आहेत.हे महान व्यक्तिमत्व म्हणजे मेजर जनरल शहनावाज खान होय.शाहनवाज खान यांचे नक्की काय योगदान होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

1952 साली भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा भारतामध्ये लोकशाहीची बीजं रोवली जात होती त्यावेळी भारत मातीचे सपुत्र मेजर जनरल शहानवाज खान हे मेरठ साठी अभिमानाचा केंद्रबिंदू होते व त्यांना संपूर्ण जनतेने जणू आपल्या डोक्यावर उचलून धरले होते.1952 साली  पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तिकिटावर शहनवाज खान हे मेरठ मधून निवडून आले होते. 1952 ते 1971 या कालावधीमध्ये तब्बल चार वेळा शहनवाज लोकसभेवर निवडून गेले.ज्या मेरठमध्ये त्यांना इतका विश्वास व प्रेम मिळाले होते त्याच मेरठच्या वर्तमानात शहानवाज खान यांचा कुठे उल्लेख दिसून येत नाही. शाहनवाज खान हे आझाद हिंद सेनेचे भारतातील पहिले मेजर जनरल होते.

शहानवाज खान यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ही लढवय्या होती. 14 जानेवारी 1914 रोजी शहानवाज खान यांचा जन्म पाकिस्तानमधील रावळपिंडी येथील मटौर येथे झाला.त्यांचे वडील सरदार टीका खान हे कॅप्टन होते.स्वतंत्र भारतामध्ये लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा ध्वज काढून त्याठिकाणी आपला तिरंगा ध्वज फडकवणारे शाहनवाज खान हे पहिले सेनानी होते. आज सुद्धा लाल किल्ल्यावर दररोज  संध्याकाळी जो प्रकाश आणि ध्वनी संयोजनाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये सुभाष चंद्र बोस यांच्या बरोबरीने जो आवाज आहे तो शहानवाज खान यांचा आहे.

तब्बल दोन दशके शहानवाज खान यांनी भारतीय राजकारणामध्ये सक्रिय योगदान दिले.ते पार्लमेंटरी सेक्रेटरी रेल्वे मंत्रालय कृषी खाते या विविध खात्यांचे मंत्री राहिले आहेत व त्यांनी अतिशय जबाबदारीने आपले पदेही सांभाळली.या जबाबदाऱ्या सांभाळताना शाहनवाज खान यांनी देशाच्या विकासाला नेहमी प्राधान्य दिले.

तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतः शाहनवाज खान यांना मेरठमधून निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्याकाळी शाहनवाज खान मेरठमध्ये भाड्याने घर घेऊन त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. कधीकाळी मेरठमध्ये हे लोकप्रिय असलेले हे व्यक्तिमत्व मात्र आज विस्मरणात गेले आहे  याची खंत त्यांच्या कुटुंबीयांना वाटते. त्यांचे कुटुंबीय आज सुध्दा मेरठमधील डब्लू एच ओ कॉलनीजवळ राहतात. त्यांना भारत सरकारने देशासाठी  लढलेल्या व देशाच्या इतक्या मोठ्या पदांना न्याय दिलेल्या व्यक्तीसाठी त्याच्या मृ’त्यूपश्चात काहीही करावे वाटले नाही याचे दुःख होते.

शहानवाज खान यांचे नातू सांगतात की त्यांनी भारत सरकारकडे अनेकदा शाहनवाज खान यांच्या स्मरणार्थ एखादे स्मारक बांधण्याची विनंती केली होती मात्र त्यावर कोणीही विचार केला नाही किंवा पाठपुरावाही केला नाही‌ शेवटी त्यांनी वैयक्तिक पातळीवरच शहानवाज मेमोरियल हे स्मारक बांधले व त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी जामा मशिदीजवळ एका कार्यक्रमाचे आयोजन वैयक्तिक पद्धतीने केले जाते. आज मेरठमध्ये शाहनवाज खान यांच्या कार्याच्या कोणत्याही गोष्टींचा उल्लेख केला जात नाही हे एक दुर्दैवच आहे.