Home » तुम्हाला माहिती आहे का? पंढरपूरची वारी का, कधी आणि कशी सुरु झाली…!
history

तुम्हाला माहिती आहे का? पंढरपूरची वारी का, कधी आणि कशी सुरु झाली…!

महाराष्ट्र ही वारकऱ्यांची भूमी मानली जाते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची व पंढरपूरच्या वारीची खूप मोठी परंपरा आहे. पंढरपूरची वारी ही भक्ती व श्रद्धेचे प्रतीक आहे. पंढरपूरच्या वारीची अगदी आतुरतेने वाट संपूर्ण वर्षभर वारकऱ्यांकडून पाहिली जाते. अशी ही वारी कधी सुरू झाली व पंढरीचा विठुराया पंढरी मध्ये कधी आला याबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

यांपैकी काही अख्यायिका म्हणजे भक्त पुंडलिक हे विठ्ठलाचा भक्त होते व ते आपल्या आई वडिलांची अगदी निस्वार्थपणे अविरत सेवा करत होते. यामुळे त्याला विठुरायाच्या दर्शनाला येणे शक्य नव्हते स्वतः पुंडलिकाच्या भेटीसाठी हे पांडुरंग आले मात्र त्यावेळी भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता म्हणून त्याने पांडुरंगाकडे उभे राहण्यासाठी वीट फेकली व तेव्हापासून पांडुरंग या विटेवर उभे आहेत असे सांगितले जाते.

पांडुरंग किंवा विठ्ठलाला श्रीकृष्णाचा अवतारही मानले जाते व यावरूनही काही अख्यायिका प्रसिद्ध आहेत. यापैकी एक आख्यायिका म्हणजे श्रीकृष्ण राधेला महत्त्व देत असल्यामुळे रुक्मिणी पांडुरंगावर रुसून या ठिकाणी आली असे सांगितले जाते व रुक्मिणीला मनवण्यासाठी भगवान श्रीकृष्णही या ठिकाणी अवतीर्ण झाले.

या ठिकाणी आजही वारीच्या सांगतेवेळी गोपाळकाल्याचे आयोजन केले जाते. संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या काळापासून वारी महाराष्ट्र मध्ये चालू असल्याचे अनेक दाखले दिले जातात. संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांच्या देहावसानंतरही त्यांच्या सोबत जोडल्या गेलेल्या भक्तांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली.

संत तुकारामांचे पुत्र नारायण यांनी संत तुकारामांच्या पादुका देहू येथून आळंदीला आणून या ठिकाणाहून विठ्ठलाच्या पादुका घेऊन पंढरपूरला जाण्याचा क्रम सुरू केला जो आजही पाळला जातो. मात्र काही वर्षानंतर संत तुकारामांच्या वंशजांमध्ये दुफळी माजली व यामुळे हैबतबाबांच्या सांगण्यानुसार ज्ञानेश्वरांची वेगळी पालखी सुरू करण्यात आली. आजही या दोन्ही पालख्या अगदी दिमाखात पंढरीच्या दिशेने चालत असतात.

मात्र या दोन्ही पालख्यांचे मार्ग पुण्यापासून भिन्न असतात. पालखी किंवा वारी सर्व स्तरातील लोकांना भक्तीच्या महिम्याने एकत्र आणते. या ठिकाणी श्रीमंत, गरीब हे सर्व भेदभाव गळून जातात, अहंकार निघून जातो व केवळ पांडुरंगाच्या जयघोषामध्ये तल्लीन होणे हेच एक उद्दिष्ट वारकऱ्यांसमोर उभे राहते. आपल्या रोजच्या प्रापंचिक जबाबदाऱ्यांमधून काही कालावधीसाठी पूर्णपणे मुक्त होऊन केवळ विठूनामाच्या गजरामध्ये तल्लीन होण्याचा अनुभव वारी वारकऱ्यांना देते.