Home » ‘या’ मराठी महिलेमुळे बालविवाहाच्या प्रथेपासून मिळाली मुक्ती, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘या’ महिलेबद्दल तुम्हाला माहित आहे का?
History

‘या’ मराठी महिलेमुळे बालविवाहाच्या प्रथेपासून मिळाली मुक्ती, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या ‘या’ महिलेबद्दल तुम्हाला माहित आहे का?

भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक अमानुष व अन्यायकारक प्रथा प्रचलित होत्या.या प्रथांमध्ये प्रामुख्याने भरडला गेलेला वर्ग म्हणजे स्त्रिया होय.बालविवाह,स्त्रीभ्रूणहत्या ,पडदा पद्धती ,विधवांचे केशवपन ,सती यांसारख्या भारतीय समाजात वर्षानुवर्षे प्रचलित असलेल्या प्रथांमुळे स्त्रियांना या समाजातील एक स्वतंत्र अस्तित्व असलेला घटक म्हणून नेहमीच नाकारले गेले.बालविवाह ही प्रथा या सर्व अमानुष प्रथांचा पाया होता.भारतामध्ये फार पूर्वीपासून बालविवाह ही प्रथा अस्तित्वात होती.या प्रथेमुळे  अगदी लहानपणी मूलींची वयात येण्याअगोदर विवाह लावून दिले जात असे व या मुली वयात आल्यानंतर त्यांना पतीच्या घरी धाडले जात असे.या प्रथेमुळे मुलींना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला व चार भिंतींच्या आत मध्ये त्यांचे अस्तित्व रेखाटले गेले. यामुळे स्त्रियांना बाहेरच्या व्यवहारिक जगाची ओळखच होत नसे व घरातील पुरुष मंडळींनी घेतलेले निर्णय त्या निमूटपणे सहन करत असत. या प्रथेविरुद्ध कधीही कोणीही आवाज उठवला नाही. मात्र केवळ स्वतःच्याच नव्हे तर संपूर्ण जगभरातील तमाम स्त्रीयांना बालविवाहाच्या या जोखडातून  मुक्त करण्याचे धाडस एका मराठी महिलेने दाखवले.

या महिलेचे नाव होते डॉक्टर रखमाबाई राऊत होय.डॉक्टर रखमाबाई राऊत त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे तत्कालीन ब्रिटीश सरकारने ब्रिटिश प्रेसिडेन्सी च्या अंतर्गत येणाऱ्या सर्वच राष्ट्रांमध्ये विवाहासाठी चे संमती वय कायदा अस्तित्वात आणला, यामुळेच आजही भारतामध्ये 18 वर्षाखालील मुलींचा विवाह करणे हे कायदेशीर रित्या गुन्हा मानले जाते.या कायद्यामुळेच स्त्रियांना शिक्षण घेता येऊ लागले ,नोकरी करता येऊ लागली व स्त्रीयांच्या एकंदरीतच सर्वांगीण विकासाला हा कायदा पोषक ठरला. डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी नक्की काय धाडस दाखवले हे आज आपण जाणून घेणार आहोत.

डॉक्टर रखमाबाई राऊत या ब्रिटिश इंडिया मध्ये डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रथम भारतीय महिला होत्या व त्यांनी विवाहासाठी चे संमती वय कायदा आणण्यासाठी खूप भरीव प्रयत्न केले.डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा जन्म १८६४ साली झाला.२०१७ साली त्यांनी आपली १५३ वी जयंती पूर्ण केली व या निमित्ताने गुगलने  त्यांना सन्मान म्हणून आपल्या होम पेजवर त्यांचे डूडल रेखाटले होते.ज्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या उंबरठ्या बाहेर पडण्याची अनुमती नव्हती त्या काळामध्ये आपल्या पतीच्या घरी जायचे नाही म्हणून वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.ब्रिटिश सरकारला विवाहासाठी संमती वयासाठीचा कायदा करण्यास अक्षरशः भाग पाडणार्‍या रखमाबाई राऊत या असामान्य व्यक्तिमत्व होत्या व त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये त्यांची एखाद्या हिरो प्रमाणे प्रतिमा बनली होती.

रखमाबाई राऊत यांचे वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी दादाजी भिकाजी यांच्यासोबत विवाह करण्यात आला होता त्यावेळी दादाजी भिकाजी यांचे वय एकोणीस वर्षे होते.लग्नानंतर रखमाबाई आपल्या विधवा आई सोबतच राहत होत्या. त्यांच्या आईचे नंतर सखाराम राऊत या पेशाने डॉक्टर असलेल्या सद्गृहस्थांसोबत लग्न झाले व रखमाबाई आपल्या सावत्र वडिलांसोबत राहू लागल्या.त्यांच्या सावत्र वडिलांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले व शिक्षणासाठी मदतही केली.त्यामुळे जेव्हा त्यांना भिकाजीं कडून पतीच्या घरी येण्यासाठी विचारणा केली जाऊ लागली तेव्हा त्यांनी नेहमी आपल्या शिक्षणाचे कारण पूर्ण केले.

मात्र वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर हिंदू रितीरिवाजानुसार पतीच्या घरी जाणे हे बंधनकारक होते.यावेळी रखमाबाईंनी पतीच्या घरी जाण्यास ठामपणे नकार दिला व त्यावेळी त्यांचे सावत्र वडील त्यांच्या पाठीशी उभे होते.१८८५ साली रखमाबाई विरूद्ध भिकाजी ही केस न्यायालयामध्ये उभी राहिली.सुरुवातीला न्यायाधीशांनी ज्यावेळी विवाह झाला तेव्हा रखमाबाई या अल्पवयीन होत्या त्यामुळे त्यांना पतीच्या घरी जाण्याची जबरदस्ती केली जाऊ शकत नाही असे सांगितले.मात्र याला हिंदू धर्मीयांची प्रचंड विरोध केला व यामुळे हिंदू धर्माला धक्का बसत असल्याचे विधानही केले.

शेवटी या ब्रिटिशांनी बहुमत लक्षात घेता रखमाबाईंनी आपल्या पतीच्या घरी जाणे हे बंधनकारक असून जर तसे केले नाही तर त्यांना सहा महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असा निर्णय दिला.मात्र या निर्णयाला विरोध करत रखमाबाईंनी अगदी ठामपणे सुनावले की पतीच्या घरी माझ्या संमतीशिवाय जाण्याऐवजी मी सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगायला तयार आहे.केवळ एवढ्यावरच न थांबता रखमाबाईंनी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया ला आपल्या परिस्थिती विषयाची कल्पना देणारे एक पत्र लिहिले व याबाबतीत योग्य तो न्याय निवाडा करण्याची विनंती केली. हे पत्र त्यावेळी चांगलेच गाजले होते व राणी विक्टोरिया यांनी यासंदर्भात रखमाबाईंवर कोणताही दबाव न टाकण्याचे आदेश दिले. या निकालानंतर रखमाबाई इंग्लंडमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या कारण त्या आपल्या हक्कांसाठी लढल्या.

राणी व्हिक्टोरिया च्या आदेशानुसार हा खटला थांबवला गेला.दादाजी भिकाजी यांनी दोन हजार रुपयांच्या नुकसान भरपाई नंतर रखमाबाई यांच्यावरील आपला अधिकारही सोडून दिला.या खटल्याचे अनेक दूरगामी पडसाद उमटले.ब्रिटिशानी आपल्या साम्राज्य अंतर्गत येणाऱ्या केवळ भारतच नव्हे तर अन्यही वसाहतींमध्ये १८ वर्षाखालील मुलींचा विवाह करणे हा कायदेशीर गुन्हा असल्याचे जाहीर केले व १८९१ मध्ये विवाह संमती वय कायदा अस्तित्वात आला.त्यावेळी संपूर्ण जगभरातील जवळपास २५ टक्के महिला या ब्रिटिश वसाहतींमध्ये येत होत्या.रखमाबाईंच्या या कामगिरीमुळे या सर्वच महिलांना आपल्या विवाहाचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य काही अंशी मिळू शकले.

हा खटला संपल्यानंतर डॉक्टर रखमाबाई राऊत इंग्लंड मध्ये गेल्या व या ठिकाणी त्यांनी लंडन स्कूल ऑफ मेडिसिन मधून पाच वर्षे वैद्यकीय शिक्षण घेतले. या काळामध्ये त्यांनी अनेक पत्रे लिहिली. ही पत्रे सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. रखमाबाईंचा खटला इंग्लंडमध्ये सुद्धा स्त्रीवादाच्या दृष्टीने अभ्यासला गेला. इंग्लंडमधून परत आल्यानंतर रखमाबाई राऊत यांनी राजकोट येथे चीफ मेडिकल ऑफिसर म्हणून आपल्या डॉक्टरकीची सुरुवात केली. डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी या भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर असल्या तरी डॉक्टरकीचा पेशा करणाऱ्या पहिल्या डॉक्टर या डॉक्टर रखमाबाई राऊत मानल्या जातात.डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी आपल्या वडिलांना पासून प्रेरणा घेऊन डॉक्टरकीचा व्यवसाय पुढे चालवला.जवळपास ३५ ठिकाणे त्यांनी वैद्यकीय उपचार देणारी केंद्रे सुरू केली. ज्या ठिकाणी वॉर्डबॉय,नर्सेस यांच्या सोयी उपलब्ध होत्या. मुलींच्या शिक्षणाला रमाबाईंनी नेहमीच खूप प्राधान्य दिले व म्हणूनच आपल्या दवाखान्याची इमारत आपल्या मृत्यूनंतर एखाद्या मुलींच्या शाळेसाठी दान करावी असे त्यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले होते व म्हणूनच त्यांच्या दवाखान्याच्या ठिकाणी शारदा मंदिर हायस्कूल ही मुलींची शाळा चालवली जाते.