Home » म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता…
Infomatic

म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता…

मराठी माणूस आणि मुंबई म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते एकच नाव म्हणजे शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे होय.काही दशकांपूर्वी मुंबईतील मराठी माणसाला आपल्याच भूमीवर व्यवसाय करण्यापासून रोखणाऱ्या परप्रांतीय वृत्तींना ठेचणाऱ्या व मराठी माणसाला नेहमीच कणा ताठ ठेवण्याची ऊर्जा देणाऱ्या शिवसेना पक्ष म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समीकरण तर अगदी ठायीठायी वसले आहे.शिवसेनाप्रमुखांनी मराठी माती बद्दलचा मराठी माणसाचा अभिमान,प्रेम कायम जागृत ठेवण्यासाठी शिवसैनिकांमध्ये एक प्रकारचे वेगळेच स्फुल्लिंग प्रज्वलित केले होते जे आजतागायत तेवत आहे व यातूनच शिवसेनेची पायाभरणी बाळासाहेब ठाकरे यांनी किती भक्कम पणे केली होती याची प्रचीती येते.

बाळासाहेब ठाकरें नंतर त्यांचे सुपुत्र माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे नातू व महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे अगदी समर्थपणे शिवसेनेची धुरा सांभाळत आहेत.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.शिवसेना हे बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न होते.बाळासाहेब ठाकरे यांची स्वतःची एक शैली होती याला ठाकरी शैली असे सुद्धा बोलले जाते.बाळासाहेब ठाकरे हे आपली मत मांडताना किंवा जाहीर सभेत बोलताना ही कुठलीही भीडभाड ठेवत नसत.शिवसेना अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झिरपवण्याचे कार्य व ध्येय बाळासाहेबांनी समोर ठेवले होते.

आपल्या श्वासांनी ज्या पक्षाला त्यांनी जिवंत ठेवले तो पक्षच आपल्या हयातीत दोनदा सोडण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला होता.असा निर्णय घेण्यामागे नक्की काय परिस्थिती होती. तर 1978 साली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला फारसे यश मिळू शकले नाही.यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर शिवसेनेला बहुमत मिळवून देऊ शकलो नाही तर आपण शिवसेनेला रामराम ठोकणार असल्याचे बाळासाहेबांनी जाहीर केले होते.त्या काळामध्ये शिवसेनेला तगडी टक्कर देणारा जनता दल हा पक्ष समोर उभा होता.

या निवडणुकांमध्ये जनता दलाने शिवसेनेला पराभूत केले. 1973 साली महानगरपालिकेच्या निवडणुकांपेक्षा 1978 साली अगदी निम्म्या जागा सुद्धा शिवसेनेला मिळू शकल्या नाही.यामुळे बाळासाहेब ठाकरे हे व्यथित झाले व त्यांनी आपल्या शब्दाला जागत राजीनामा देण्याचे ठरवले. त्यांनी जेव्हा हे जाहीर केले तेव्हा शिवसैनिकांना हे मान्यच नव्हते .बाळासाहेबां शिवाय शिवसेना नाहीच होऊ शकत हे शिवसैनिकांच्या मनावर अगदी स्पष्ट बिंबले गेले होते.शिवसैनिकांनी बाळासाहेबांना पक्ष न सोडण्यासाठी अनेक आर्जव केली व शेवटी शिवसैनिकांची मागणी मान्य करत बाळासाहेब शिवसेनाप्रमुख या पदावर राहिले.

यानंतर पुन्हा एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा बाळासाहेबांनी परिस्थितीला शरण जात पक्ष सोडण्याचा स्वाभिमानी निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी सुद्धा शिवसैनिकांनी त्यांना असे करण्यापासून रोखले .हा प्रसंग घडला होता 1992 साली. 1992 साली बाळासाहेबांच्या बरोबरीनेच पुढची पिढी म्हणजेच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व बाळासाहेबांचे पुतणे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिवसेनेमध्ये आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करू पाहत होते.यामुळे पक्षातील काही ज्येष्ठ शिवसैनिक दुखावले गेले होते ते त्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याच मुलाला व पुतण्याला पुढे आणण्याचा प्रयत्न चालवला आहे व या पक्षामध्ये अन्य पदाधिकाऱ्यांना कोणतेही स्वातंत्र्य नाही असे आरोप केले गेले.

त्यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक माधव देशपांडे यांनी असे परिपत्रक सुद्धा जारी केले होते. माधव देशपांडे यांच्या या आरोपांवर तत्कालीन शिवसैनिकांनी तटस्थपणे राहण्याची भूमिका घेतली .या भूमिकेवर नाराज होत पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला व तसे आपल्या वृत्तपत्रातून म्हणजेच सामनामधील अग्रलेखातून जाहीर सुद्धा केले. त्यांच्या या लेखाचे नाव होते अखेरचा दंडवत.

काही मोजक्या लोकांच्या घराणेशाही सारख्या आरोपांना न जुमानता शिवसेनाप्रमुखांनी आपले नेतृत्व करावे ही शिवसैनिकांची भावना होती व या भावनेसह हजारो शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंना साकडे घालायला आले.त्यावेळी सुद्धा शिवसैनिकांच्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी शिवसेना सोडली नाही.बाळासाहेब अखेरपर्यंत शिवसेनेसाठी झगडले व आपल्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा त्यांनी ही बीज रुजवली.आजही जिथे कुठे मराठी माणसाच्या हितसंबंधांचा झगडा उभा राहतो तिथे शिवसेना अगदी खंबीरपणे पाठीशी उभी राहते.