Home » या गावात मुलीच्या जन्मानंतर राबवली जाणारी अनोखी प्रथा…
Infomatic

या गावात मुलीच्या जन्मानंतर राबवली जाणारी अनोखी प्रथा…

राजस्थान म्हंटले की वाळवंट,थोडी हिरवळ,पाण्याची कमतरता अशी आपण कल्पना करतो हे सर्वात आधी आपल्या लक्षात येते.पण राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील पिपलांत्री गाव अगदी उलट आहे.देशातील सर्व प्रगत आणि अद्वितीय खेड्यांच्या प्रकारात याचा समावेश आहे.आदर्श ग्राम,निर्मल गाव,टूरिझम व्हिलेज,जल ग्राम, वृक्ष ग्राम,कन्या ग्राम अशा विविध उपमांनी पिपलांत्रीला देशभर प्रसिद्धी मिळाली आहे.सुमारे पाच हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात परिवर्तनाची सुरुवात तेव्हा झाली ती २००५ पासुन जेव्हा श्याम सुंदर पालीवाल हे सरपंच म्हणुन होते.

संगमरवरी दगडाच्या खाणीच्या क्षेत्रामुळे येथे टेकड्यांचे अंदाधुंदी खाणकाम झाले.यामुळे केवळ गावाचे नैसर्गिक सौंदर्यच नष्ट होत नाही तर निसर्गाच्या नावावर जे काही होते ते नष्ट होत आहे.अशा परिस्थितीत त्यांना आपल्या गावातील वन संपत्तीचा नाश होताना दिसत होता आणि त्यापासून पाठ फिरवण्याऐवजी श्याम सुंदर पालीवाल यांनी डोंगर हिरव करण्याचा संकल्प केला.

आज १६ वर्षानंतर त्यांच्या संकल्पतेचा परिणाम म्हणजे पिपलांत्रीचा चेहरा पुर्णपणे बदलला आहे.श्याम सुंदर पालीवाल यांनी शेतकरी,संगमरवरी खाणी कामगार आणि परिसरातील दुर्गम खेड्यांमध्ये स्थायिक झालेल्या ग्रामस्थांना एकत्र घेऊन पाणलोट योजना राबविली,ज्यामुळे डोंगराच्या प्रवाहामुळे सुपीक मातीचे संरक्षण रोखण्यास तसेच पाण्याच्या पातळीत देखील मदत झाली.यासह वृक्षारोपण करण्याचे काम  वेगाने झाले.

मुलीच्या जन्मानंतर या गावात लावली जातात १११ झाडे…

ते सांगतात की प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत स्तरावर जनजागृतीद्वारे जलसंधारण,ग्रामीण स्वच्छता,बालिका शिक्षण आणि आरोग्य सुरक्षा या मुद्द्यांसह वृक्षारोपण प्रक्रिया सुरूच आहे.गावकरी यामध्ये सक्रीय सहभाग घेतात.याचा परिणाम म्हणून आतापर्यंत गावात ३ लाखाहून अधिक रोपे लागवड झाली आहेत.

पिपलांत्री ग्रामपंचायतीत सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे,येथे मुलींच्या जन्मानंतर १११ झाडे लावली जातात.आणि गावातील गावकरी मिळून २१००० रुपये जमा करतात त्यामध्ये मुलीच्या आईवडिलांकडून १०००० रुपये टाकतात.असे मिळुन ३१००० रुपये बँकेत मुलीच्या नावावर डिपॉझिट ठेवले जाते.नंतर याचा उपयोग मुलीच्या लग्नासाठी व इतर गोष्टींसाठी वापरला जातो एवढेच नव्हे तर मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतररच तिच्या लग्नाचा विचार करावा अशी मुलीच्या आईवडिलांकडून शपथ घेतली जाते.

या बरोबरच गावातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील त्याच्या आठवणीत ११ झाडे लावण्याची देखील परंपरा आहे.त्याशिवाय,पिपलांत्रीमध्ये रक्षाबंधनाच्या सणानिमित्त गावातील मुली आपल्या भावाव्यतिरिक्त गावातील झाडावर राखी बांधतात.राखीच्या एक दिवस आधी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो.

पंचायतीची ही सर्व कामे पाहता २००७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम कडून ‘निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार’ मिळाला होता आणि २००८ मध्ये प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय पुरस्कार आणि इतर पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.