Home » गरोदरपणात डोहाळे का लागतात? जाणून घ्या यामागील थक्क करणारी कारणं…!
Infomatic

गरोदरपणात डोहाळे का लागतात? जाणून घ्या यामागील थक्क करणारी कारणं…!

गर्भार पण हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय सुखाचा व कसोटीचा काळ असतो. गर्भारपणामध्ये स्त्रीला विविध प्रकारच्या मानसिक व शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते. शरीरातील हार्मोन्स मध्ये सुद्धा अमुलाग्र बदल घडून येतात. यामुळे मूड स्विंग्जही मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात. गर्भारपणाशी निगडित काही गोष्टी ह्या खूपच खास असतात. तशीच एक गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्रीला लागणारे डोहाळे होय.

विविध संस्कृतीमध्ये स्त्रीला डोहाळे लागण्याचे विविध प्रकारचे अर्थ काढले जातात. मात्र एकंदरीतच गर्भवती स्त्री व तिच्या गर्भातील बाळाला हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून हे सर्व डोहाळे अतिशय आनंदाने पुरवले जातात. मुळात डोहाळे लागणे म्हणजे काय हा प्रश्न अनेकदा पडतो व या विशिष्ट अवस्थेमध्येच हे डोहाळे का लागतात अशी शंका सुद्धा निर्माण होते. स्त्रीच्या शरीरामध्ये होणाऱ्या बदलांमुळे, अनेकदा तिला शरीरामध्ये कमी पडणाऱ्या पोषक तत्वामुळे सुद्धा डोहाळे लागतात.

डोहाळे लागणे म्हणजे एखाद्या विशिष्ट पदार्थाला वारंवार खावे वाटणे होय. बहुतांश स्त्रियांना आंबट पदार्थ म्हणजे चिंचा, आवळा, बोरं किंवा पाणीपुरी यांसारखे पदार्थ खावे वाटतात. यामागे असे कारण दिले जाते की गर्भवती असताना बहुतांश स्त्रियांना उलट्या व शिसारीला सामोरे जावे लागते अशावेळी काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा निश्चितच निर्माण होते. काही स्त्रिया आईस्क्रीम ,बर्फाचा गोळा यांसारखे गार पदार्थ वारंवार गर्भावस्थेमध्ये खातात.

शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेमुळे बहुतांश वेळा असे गार पदार्थ खाण्याची इच्छा महिलांमध्ये निर्माण होते. आयुर्वेदामध्ये सुद्धा डोहाळ्यांविषयी अगदी विस्तृत वर्णन केलेले आहे. बऱ्याचदा डोहाळे लागण्याचा संबंध हा गर्भातील बाळाच्या भविष्यातील वर्तन, स्वभाव, रंग रूप यांच्याशी सुद्धा जोडला जातो व यामुळेच काही पदार्थ डोहाळे लागलेले असतानाही वर्ज्य ठेवावे असे सांगितले जाते.

अनेकदा असे दिसून येते की काही महिलांना एखादा पदार्थ हा गर्भवती होण्याअगोदर फारसा आवडत नसतो मात्र गर्भावस्थेमध्ये याच पदार्थाचे डोहाळे त्यांना लागतात. डोहाळे हे केवळ खानपानाशी संबंधित नसतात तर ते काही विशिष्ट वर्तनाशी सुद्धा संबंधित असतात.म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी फिरायला जावेसे वाटणे, त्या ठिकाणी जास्त काळ व्यतीत करावेसे वाटणे याला सुद्धा या अवस्थेमध्ये डोहाळे लागणे असेच म्हटले जाते.

डोहाळे लागण्यामागे काही शास्त्रीय व आरोग्य विषयक कारणे सुद्धा सांगितली जातात व या आरोग्यविषयक कारणांना अजिबात दुर्लक्षित न करता तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा असेही सुचवले जाते. ज्या महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता असते त्यांना गर्भावस्थेमध्ये खडू किंवा पाटीवरची पेन्सिल खावी वाटते. मात्र गर्भवती स्त्री व तिच्या गर्भातील बाळाला सुद्धा यामुळे पोषणमूल्य कमी पडू शकतात.

काही महिलांना पावसाचा वास आवडतो व माती खावीशी वाटते. माती खाण्याची इच्छा होणाऱ्या महिलांमध्ये बहुतांश वेळा लोहाची कमतरता असते. म्हणूनच सर्वसाधारण पदार्थांव्यतिरिक्त अशा वेगळ्या पदार्थांना वारंवार खाण्याची इच्छा गर्भावस्थेमध्ये होत असेल तर त्याकडे डोहाळे म्हणून न बघता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.