Home » ‘या’ कारणामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता?
Infomatic

‘या’ कारणामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता?

भारत हा एक अठरापगड जातींनी वसलेला देश आहे असे भारतातील विविधतेतील एकता सांगण्यासाठी अधोरेखित केल्या जाणाऱ्या वाक्यामध्ये कधीही भारतातील एकतेला भंग पावण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विषमतेचा उल्लेख केला जात नाही.मात्र ही विषमता अगदी प्राचीन काळापासून भारतीय समाजव्यवस्थेत वर्ण,जात-धर्म,लिंग,आर्थिक स्तर या सर्वांच्या आधारावर एखाद्या उतरंडी प्रमाणे अस्तित्वात आहे.या उतरंडी मधील वरचे सवर्ण हे नेहमीच श्रेष्ठ तर खालच्या स्तरातील दलित हे नेहमीच तुच्छ म्हणून पाहिले गेले.

अगदी कामांची विभागणी सुद्धा जातीप्रमाणे किंवा वर्णा प्रमाणे केली गेली.यामध्ये समाजामध्ये वावरताना चे एक मनुष्य म्हणून जगण्याचे अधिकार सुद्धा केवळ सवर्णासाठीच राखीव म्हणून ठेवले गेले व वर्षानुवर्षे दलितांना खितपत पडावे लागले.गावा कुसा बाहेर राहणे ,गावच्या पाणवठ्याला स्पर्श न करणे, मुलांना शिक्षण न देणे ,मेलेली गुरंढोरं वाहून नेणे,गावचा मैला आपल्या खांद्यांवर नेऊन टाकने यांसारखी काम वर्षानुवर्षे या उतरंडी तील खालच्या स्तराला करावी लागली व याला कारण दिले गेले ते म्हणजे त्यांचे कर्म होय.

मागील जन्मांमध्ये केल्या गेलेल्या वाईट कर्माची शिक्षा म्हणून या जन्मी त्यांच्या नशिबी अशी भोग आले आहेत असेच त्यांच्या कानीकपाळी ओरडून सांगितले जात होते व त्यांच्या विचारांमध्ये भिनवले जात होते व हे आहे ते असे आहे असे मानून त्यांना जगण्यास भाग पाडले जात होते.या मूठभर लोकांना जगण्याचे,स्वतंत्रपणे राहण्याचे अधिकार राखीव ठेवले जाण्याच्या अन्यायाविरोधात या खालच्या स्तरातील कुणीही कधीही आवाज उठवण्याचे धाडस केले नाही.

मात्र असाच एक क्रांतीसुर्य या समाजामध्ये जन्माला आला व त्याने आपल्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाच्या अगदी खोलात जाऊन त्याची मुळं शोधून काढली व ती मुळ नष्ट करण्याचाही प्रयत्न आपल्या शिक्षणाने केला. हीच एक तेवणारी ज्योत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका कनिष्ठ वर्गामध्ये जन्माला येणे म्हणजे जणू काही गुन्हाच केला आहे अशा प्रकारे बघणाऱ्या समाजाच्या अन्यायाचे चटके अगदी लहानपणापासून सोसले होते.

कधी शिक्षण घेताना त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला तर कधी गावी जाण्यासाठी केवळ दलित समाजातील असल्यामुळे गाडीवानाने प्रवास नाकारला म्हणून मैलोन मैल पायपीट केली.अगदी लहान वयापासूनच त्यांच्या मनामध्ये कनिष्ठ वर्गाच्या या हालअपेष्टांचे मूळ कुठे आहे हे शोधण्याची जिज्ञासा जागृत झाली व त्यांनी सर्व अडथळ्यांवर मात करत उच्च शिक्षण घेऊन आपल्या तर्कनिष्ठ बुद्धीने या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्नही केला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे त्यानंतरच्या अनेक पिढ्यांसाठी अक्षरशः वरदानच ठरले होते.महाडचा सत्याग्रह हा त्यापैकीच एक होय.अशीच एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह स्वतः नागपूरच्या दीक्षाभूमी मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता.आज सुद्धा ही घटना एक ऐतिहासिक घटना म्हणून पाहिले जाते.आजही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला याचे अनेक प्रकारे विश्लेषण केले जाते यावरूनच हा निर्णय किती मैलाचा दगड होता हे आपण समजू शकतो.आज आपण काही मुद्द्यांच्या आधारे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार का केला हे जाणून घेणार आहोत.

१९२३ साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये परतले तेव्हा भारतीय समाजामध्ये पसरलेल्या जातीभेदा वर आधारित विषमतेने ते खूपच व्यथित होते व या विषमतेला नाहीसे करण्याची ताकद ते समाजवाद आणि मार्क्सवादा मध्ये शोधू लागले.मात्र काही काळानंतर त्यांच्या लक्षात आले की येथील व्यवस्था ही वर्गभेदावर आधारित नसून वर्णभेद किंवा जातीभेदावर आधारित आहे.त्यामुळे याला धर्माधारित असेच उत्तर शोधले पाहिजे हे त्यांना कळले होते.

जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त होणार होते तेव्हा भारतामध्ये दलित वर्गाला स्वातंत्र्य प्राप्त तेव्हाच होईल जेव्हा या धर्म आणि वर्णाच्या बेडयांमधून त्यांची सुटका होईल असा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला. यादृष्टीने त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने केला.भारतीय व्यवस्थेमधील विषमता ही एखादी व्यक्ती किंवा एखाद्या विशिष्ट जातीची व्यक्ती यांच्यामधील दरी नसून ती दोन विभिन्न वर्गांमधील दरी आहे व या वर्गांमधील सवर्णां प्रमाणेच आपल्याला अधिकार मिळत नाही यामुळे कुठेतरी दलित वर्गाचे खच्चीकरण होत आहे असे त्यांना वाटत होते.

दलित वर्गामध्ये संघटन कमी होते त्यामुळे दलित वर्गामधील संघटितपणा वाढवून एक प्रचंड संख्या असलेल्या धर्मामध्ये त्यांना रूपांतरित करणे खूप गरजेचे होते.सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांना इस्लाम धर्म या दृष्टीने जवळचा वाटला कारण भारतामध्ये एखाद्या इस्लामधर्मीय वर अन्याय झाला तर सर्वच इस्लाम धर्मीय एकजुटीने या अन्यायाविरुद्ध उभे राहत असत व त्यांची संख्या सुद्धा खूप होती.अशीच संख्या ही दलितांच्या धर्माच्या बाबतीतही असावी असे त्यांना वाटत होते त्यादृष्टीने त्यांनी बहिष्कृत भारत मध्ये आपले विचार सुद्धा मांडले होते.व यामुळे सवर्णांनी त्यांना  इस्लाम धर्मामध्ये धर्मांतर करण्यास विरोध केला होता.

यानंतर त्यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केला.हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती मध्ये सिद्धांत आणि नीती यांच्या आधारे वर्षानुवर्ष सवर्णांनी आपली कर्म थोर होती म्हणून या जन्मी आपल्याला चांगले आयुष्य मिळाले असेच बिंबवले होते.

या दृष्टीने त्यांना गौतम बुद्ध भावले.गौतम बुद्धाने कधीही स्वतःला ईश्वराचा अवतार किंवा ईश्वरी अंश म्हणून घेतले नाही व बौद्ध धर्मामध्ये जे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य व समान वागणूक दिली जाते की कुठल्याही धर्मात मिळू शकत नाही असे त्यांचे मत बनले ते बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या समान वागणुकीमुळे म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याचे ठरवले. व या दृष्टीने आपल्या जवळच्या व्यक्तींसह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर खूप कमी कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले.मात्र त्यानंतर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याचा घेतलेला निर्णय चूक की बरोबर यावर अनेक वादविवाद आज सुद्धा होत असताना दिसून येतात. मात्र त्यानंतरच्या अनेक पिढ्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या या धर्मांतराच्या निर्णयामुळे एक नवीन ओळख मिळाली हे निश्चित होय.