Home » रक्तचंदन म्हणजे नेमके काय? आणि त्याला इतकं महत्व का? जाणून घ्या
Article Infomatic

रक्तचंदन म्हणजे नेमके काय? आणि त्याला इतकं महत्व का? जाणून घ्या

काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर आणि सर्वत्रच पुष्पा या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुन या नायकाने रंगवलेली व्यक्तिरेखा, त्याची स्टाईल संवाद हे सोशल मीडियावर कॉपी करून ट्रेन्डमध्ये आहेत. या चित्रपटाची भुरळ ही राजकारण्यांपासून ते परदेशातील खेळाडूंना सुद्धा पडली आहे.

त्या चित्रपटाचे कथानक सुद्धा थोडेसे हटके आहे. या चित्रपटाचे कथानक आंध्र प्रदेश- तमिळनाडू सीमा भागामध्ये मिळणार्‍या रक्तचंदन या बहुपयोगी व महागड्या लाकडा भोवती फिरते. हे रक्तचंदन म्हणजे नक्की काय ज्यामुळे आंध्रप्रदेश तमिळनाडूच्या सीमा भागामध्ये शेषाचल येथे अनेक जणांचा तस्करी मध्ये जीव गेला आहे ,हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 रक्तचंदन हे लाल रंगाचे असते म्हणून त्याला रक्तचंदन असे म्हणतात. पिवळ्या रंगाचे चंदन हे वैष्णव पंथीय लोक पूजाअर्चा साठी वापरतात. तर रक्तचंदन हे शैव पंथीय वापरतात. रक्तचंदनाचा मुख्य उपयोग पूजापाठ यासाठीच असतो. रक्तचंदन हे वेगळेच प्रजाती चे झाड आहे.रक्तचंदन हे पिवळ्या किंवा पांढऱ्या चंदना पेक्षा पूर्ण वेगळी असते. यामध्ये सर्वसाधारण चंदनाप्रमाणे सुगंध नसतो. रक्त चंदनाला शास्त्रीय नाव टेरोकार्पस सैन्टनस आहे.

पांढरे किंवा पिवळे चंदन आणि रक्तचंदन यामधील गुणधर्म हे पूर्णपणे भिन्न आहेत. पांढऱ्या चंदनाच्या सुगंधामुळे त्याचा उपयोग अत्तर व अन्य सुगंधी वस्तू बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. रक्तचंदनाला असा सुगंध नसतो. त्याचा मुख्य उपयोग हा विविध प्रकारचे फर्निचर बनवण्यासाठी केला जातो.तसेच रक्त चंदनाचा उपयोग हा त्याच्या अनोख्या रंगामुळे सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी होतो. रक्त चंदनाचा उपयोग काही ठिकाणी मद्यनिर्मितीसाठी सुद्धा होतो.

रक्तचंदन हे महागड्या लाकडांपैकी एक मानले जाते.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये रक्तचंदनाची प्रति किलो किंमत ही तीन हजार रुपये आहे.रक्तचंदन हे खूप कमी ठिकाणी उगवले जाते.भारतामध्ये आंध्र प्रदेशातील कडप्पा, कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यांमध्ये जे शेषाचल या डोंगराळ भागांमध्ये वसलेले आहेत तिथे रक्तचंदन उगवले जाते.

रक्तचंदनाच्या सर्व साधारण झाडाची उंची ही आठ ते अकरा मीटर इतकी असते व या झाडांची वाढ ही खूप मंद गतीने होते.त्यामुळे त्यांचे घनता ही खूप जास्त असते.यामुळेच अन्य झाडां प्रमाणे रक्त चंदनाचे लाकूड पाण्यावर न तरंगता ते बुडून जाते.

रक्तचंदन या झाडाची लोकप्रियता केवळ भारतामध्येच नव्हे तर परदेशामध्ये किंबहुना जास्त आहे याची प्रचिती ही गेल्या वर्षभरात रक्तचंदनाच्या लाकडांच्या झालेल्या लिलावातून दिसून येते.चीन, जापान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमीरात या देशांमधून खूप मोठ्या प्रमाणात रक्त चंदना साठी बोली लावली जाते. या सर्व देशांमध्ये चीनकडून रक्तचंदनाची सर्वात जास्त मागणी केली जाते .

चौदाव्या आणि सतराव्या शतकामध्ये चीनमध्ये मिंग सत्ता होती व या शासकांकडून रक्त चंदनाच्या झाडा पासून बनवलेल्या फर्निचर विषयी अतीव प्रेम होते. त्या काळापासून आतापर्यंत चीनमध्ये रक्त चंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या फर्निचरला एक प्रकारचे स्टेटस सिम्बॉल आजही मानले जाते व म्हणूनच रेड संडलवुड म्युझियम नावाचे रक्तचंदन पासून बनवलेल्या विविध वस्तू आणि फर्निचर चे संग्रहालय चीन मध्ये वसविण्यात आले आहे.

चीन आणि जपानमध्ये सुद्धा काही काळापूर्वी रक्तचंदनाची मागणी मोठ्या प्रमाणात होती. जपानमध्ये विवाहप्रसंगी देण्यात येणारे शामिशेन वाद्य रक्तचंदन पासून बनवले जाते. मात्र हा ट्रेंड सध्या काहीसा कालबाह्य होत चालला आहे म्हणून जपान कडून येणाऱ्या मागणीत थोडी घट झाली आहे.