Home » रविना टंडनचे वडील दिग्दर्शक रवी टंडन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन…
News

रविना टंडनचे वडील दिग्दर्शक रवी टंडन यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन…

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि त्यांच्या काळातील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रवी टंडन यांचे आज (शुक्रवारी) पहाटे ३.३० वाजता त्यांच्या मुंबईतील घरी निधन झाले.ते ८६ वर्षांचे होते.रवी टंडन हे काही दिवसांपासून आजारी होते. 

फुफ्फुसाच्या समस्येने त्रस्त असलेल्या रवी टंडन यांच्या निधनाची पुष्टी करताना,एका विश्वसनीय सूत्राने एबीपी न्यूजला सांगितले की,”८६ वर्षीय रवी टंडन यांना चालता येत होते,परंतु त्यांना काही काळापासून फुफ्फुसाचा त्रास होत होता.लंग फायब्रोसिस नावाच्या फुफ्फुसाच्या समस्येमुळे त्यांना श्वास घेण्यास खूप त्रास होत होता.या आजारामुळे त्यांनी आज पहाटे ३.३० वाजता मुंबईतील जुहू येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.

रवी टंडन यांच्या पार्थिवावर सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत सायंकाळी 4.30 वाजता पूर्ण विधीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.रवी टंडन यांनी 70 आणि 80 च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले.खेल खेल में, मजबूर, अनहोनी, खुद्दार, जिंदगी, नजराना, एक मैं और एक तू, जवाब, ऐन और शान, निर्माण, झूठा कहें का, चोर हो तो ऐसा या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्यांनी आपला ठसा उमटवला. 

रवी टंडन यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शन तसेच निर्मिती केली.1960 मध्ये रिलीज झालेल्या ‘लव्ह इन शिमला’ या चित्रपटातही तो अभिनेता म्हणून दिसला होता.