Home » अनाथांचे छत्र हरवले! सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन…
News

अनाथांचे छत्र हरवले! सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

अनाथांची माय किंवा अनाथांची यशोदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माननीय समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज निधन झाले.सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने एका महान पर्वाचा अस्त झाला.सिंधुताई सपकाळ यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले.मृत्युसमयी त्यांचे वय 75 वर्षांचे होते.गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या.सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनाथ पोरक्या मुलांना मायेचा आधार देत सांभाळले आहे,वेळ प्रसंगी आपल्या घासातला घास दिला आहे.

सिंधुताई सपकाळ जेमतेम चौथीपर्यंत शिकलेल्या चिंधी अर्थातच सिंधुताई सपकाळ यांनी हजारो गोरगरिबांची माय होण्यापर्यंतचा प्रवास कसा काय पार पडला याचे कुतूहल सगळ्यांनाच वाटत असे.सिंधुताई सपकाळ यांचा जन्म हा वर्ध्यातील नवरगाव या गावचा.सिंधुताई सपकाळ यांच्या कुटुंबाचा व्यवसाय गुरु राखण्याचा होता.तीन भावंडांमध्ये  वाढत असलेल्या सिंधुताईंना शिक्षणाची ओढ होती. चौथीपर्यंत शिकल्यावर त्यांचे वडील अभिमान साठे यांना त्यांनी खूप शिकावे अशी इच्छा होती मात्र त्याकाळी मूलींनी‌ शिकण्याची पद्धत नव्हती व म्हणूनच त्यांच्या आईने त्यांना खुलं राखण्याच्या कामाला लावून दिले. तरीही मराठी वाचणे शिकल्यामुळे त्यांना वाचनाची कवितेची आवड लागली.

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह वयाने दुपटीने मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लावून दिला गेला.लग्नापूर्वी वाचनामध्ये कवितांमध्ये रमणाऱ्या सिंधूताई यांच्यामागे विवाहानंतर मात्र यातनांचे दुष्टचक्र सुरू झाले .सिंधुताईंचा स्वभाव मुळातच अन्यायाविरुद्ध लढण्याचा होता.सासरी सुद्धा सिंधुताईंना गुरे राखण्याचे काम करावे लागत असे.गुराढोरांचे शेण काढावे लागत असे. याची मजूरी मात्र कंत्राटदारांकडून  बायकांना मिळत नसे.तेव्हा त्यांनी गावातील बायकांना गुराढोरांचे शेण काढण्याची मजुरी मिळावी यासाठी बंड केले.शासनाकडून यासाठी मजुरी येत असे मात्र गावातील कंत्राट दार ते  मधल्या मधे हडप करत.

या आंदोलनामुळे बायकांना त्यांचा हक्क मिळाला मात्र यामुळे दमडाजी हा गावातील जमीनदार मात्र दुखावला गेला होता .त्यांनी सिंधुताईंकडून बदला घेण्याच्या भावनेने त्यांच्या चारित्र्यावर आरोप लावले.या आरोपांना सत्य मानत संशयी स्वभावाच्या श्रीहरी सपकाळ यांनी गर्भवती असलेल्या सिंधूताईंच्या मारून अर्धमेल्या अवस्थेत जनावरांच्या गोठ्यात टाकून दिले.या  ठिकाणी त्यांनी आपल्या चौथ्या मुलीला जन्म दिला.आधारासाठी त्या माहेरी गेल्या मात्र त्या ठिकाणी ही त्यांच्या वाट्याला अवहेलना आली.शेवटी दौंड परभणी रेल्वे स्टेशनवर  त्यांनी आश्रय घेतला.त्या भीक मागून आपली गुजराण करत असत.त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी आपल्याला मिळालेल्या चतकोर भाकरीचा तुकडाही अन्य भिका-यांसोबत मिळून खाल्ला.मात्र या ठिकाणी दररोज खाण्याची आबाळ होत असे  म्हणून त्यांनी या ठिकाणाहून आपला मुक्काम हलवला.

सिंधुताईंनी 1994 साली पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे ममता सदनची स्थापना केली.स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या हालअपेष्टा,अपमान यामुळे समाजातील इतर अनाथ,दुर्बलांची माता होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांची स्वतःची मुलगी ममता हिला त्यांनी पुण्यातील सेवासदन शाळेत दगडूशेठ हलवाई संस्थांनच्या माध्यमातून  घातले व त्यांनी हजारो अनाथांची माता होण्याचे शिवधनुष्य उचलले .या संस्थेमध्ये अनाथ,गोरगरीब मुलांना जेवण,खाणे पिणे, शिक्षण कपडेलत्ते यांची सोय केली जाते.

पण या व्यतिरिक्त या संस्थेतून बाहेर पडल्यावर आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आवश्यक शिक्षणही त्यांना दिले जाते.विवाहयोग्य तरुण-तरुणींना योग्य जोडीदार मिळावा म्हणून ही संस्था प्रयत्न करते.आतापर्यंत हजारो मुलांना या संस्थेने स्वतःच्या पायावर उभे केले आहे व नवीन आयुष्य दिले आहे. केवळ भारतामध्येच नव्हे तर परदेशातही सिंधुताईंच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.परदेशातूनही त्यांच्या या कार्यासाठी आर्थिक मदत दिली जाते.सिंधुताईंनी भारताप्रमाणेच परदेशात सुद्धा आपल्या कार्यासाठी निधी मिळावा म्हणून अनेक दौरे केले. यासाठी त्यांनी मदर ग्लोबल फाऊंडेशन ची स्थापना केली.

सिंधुताईंनी अतिशय निर्व्याज पणे अनाथांची माय होण्याचे कार्य हाती घेतले होते.मात्र त्यांच्या या कार्याची उतराई म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.त्यापैकी काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे 2021 साली त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.या अगोदर महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार ,अहिल्याबाई होळकर पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले होते.

कला क्षेत्राने सुद्धा सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेतली व त्यांचे अतिशय वास्तववादी चित्रण चित्रपटांद्वारे केले आहे.मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला.या चित्रपटामध्ये सिंधुताईंचे आयुष्य दाखवले गेले होते.या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.सिंधुताईंच्या निधनाने अनाथांचे गोकूळ वसवणारी एक माऊली आपल्या लेकरांना पोरकी करून गेली मात्र आपल्या कार्याने समाजात मानवतेची ज्योत पेटवून गेली हे निश्चित.