Home » संगीत विश्वातील सूर हरपला…! गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन…
News

संगीत विश्वातील सूर हरपला…! गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन…

महान गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे.यावर्षी  जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस कोवीड ची लागण झाल्यामुळे व न्युमोनिया चा त्रास जाणवल्यामुळे लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.याठिकाणी उपचारांना प्रतिसाद देत त्या बऱ्या होत होत्या.लता मंगेशकर यांना ज्यावेळी रुग्णालयात दाखल केले गेले तेव्हा त्यांना कोविडची काही सौम्य लक्षणे जाणवत होती.

उपचारांनंतर 28 जानेवारी रोजी त्यांना व्हेंटिलेटर वरून काढण्यात आले कारण त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा जाणवत होती.मात्र पाच फेब्रुवारीला पुन्हा एकदा त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.डॉक्टरांनी सर्व शर्थीचे प्रयत्न केले मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता मंगेशकर यांना भारताची गानकोकिळा असे म्हटले जात असे .वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी लताजींनी गाण्याच्या करिअरला सुरुवात केली व त्याचे पहिले गाणे 1942 रोजी रेकॉर्ड केले गेले.सात दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमधील व अन्य भाषांमधील विविध सुरेल गाण्यांना लताजींनी आपला आवाज दिला.त्यांनी विविध भाषांमधील तीस हजाराहून अधिक गाणे गायलेली आहेत.

एक प्यार का नगमा है, राम तेरी गंगा मैली,एक राधा एक मीरा,दीदी तेरा देवर दिवाना यांसह अनेक गाजलेल्या गाण्यांचे पार्श्वगायन लतादीदींनी केलेले आहे.लता मंगेशकर यांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल सरकारने त्यांना 1966 साली पद्मभूषण हा पुरस्कार दिला होता.यानंतर 1999 साली लताजींना पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले व 2001 साली भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मानल्या जाणाऱ्या भारतरत्न पुरस्काराने त्यांना  सन्मानित करण्यात आले.

मंगेशकर कुटुंबीय हे संगीत व गायनाच्या क्षेत्रांमध्ये वर्षानुवर्षे आपला वारसा पुढे चालवत आहेत.लतादीदी या मीना खाडीकर,आशा भोसले,उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये सर्वात थोरल्या होत्या.लता मंगेशकर यांच्या जाण्याने संगीत विश्वामध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली असून संगीत विश्वा मधील सुर हरपल्याची भावना सुद्धा निर्माण झाली आहे.राजकीय क्षेत्रातील व कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.