Home » एकीकडे ‘हिरो’ तर दुसरीकडे ‘खुंखार विलन’ या भुमीका गाजवणारा हा मराठमोळा अभिनेता आहे तरी कोण…!
News

एकीकडे ‘हिरो’ तर दुसरीकडे ‘खुंखार विलन’ या भुमीका गाजवणारा हा मराठमोळा अभिनेता आहे तरी कोण…!

चतुरस्त्र अभिनेता किंवा बहुरंगी भूमिका अगदी हुबेहूब वठवण्याचे कसब खूप मोजक्या अभिनेत्यांमध्ये असते.महाराष्ट्राने असे अनेक अभिनेते बॉलिवूडला दिलेले आहेत त्यापैकीच एक म्हणजे सध्या पावनखिंड व कश्मीर फाईल्स या दोन्ही चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर होय.गेले दशकभर चिन्मय ने पटकथा लेखक,दिग्दर्शक व अभिनेता या भूमिका अगदी समर्थपणे पेलल्या आहेत.

पावनखिंड  या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो किंवा काश्मीर फाईल्स या चित्रपटातील बिट्टा हा अतिरेकी या दोन्ही भूमिका अत्यंत टोकाच्या आहेत मात्र यामध्ये कुठेही कृत्रिम पणा दिसून येत नाही.दोन्ही भूमिकांमध्ये चिन्मयने अक्षरशः जीव ओतून काम केले आहे व म्हणूनच पावनखिंड चित्रपटा‌त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेला पाहून प्रेक्षकांना जसे स्फुरण चढते तसेच काश्मिर फाईल्स मध्ये बिट्टाला पाहून रागाचा पारा चढतो.

बिट्टा हे पात्र पाहून प्रेक्षक चिन्मयचा तिरस्कार करू लागले आहेत इतकी मेहनत घेऊन त्याने हे पात्र साकारले आहे.चिन्मयच्या कामाबाबत हे पहिल्यांदाच घडले नाही तर या अगोदर चिन्मयने साकारलेल्या मोरया,झेंडा,शांघाय,भावेश जोशी या चित्रपटांतील भूमिका ही तितक्याच गाजल्या आहेत.

चिन्मय ने अभिनयाचे शिक्षण एन एस डी मधून घेतले व यानंतर त्याने प्रेमगंध या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवले.टेलिव्हिजनवरील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने अभिनय,पटकथा लेखन व दिग्दर्शन या तीनही भूमिका लिलया पार पाडल्या आहेत.तू तिथे मी या मालिकेतील सत्यजीत हे चिन्मयने साकारलेले पात्र आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.

चिन्मय मांडलेकर कडे एखाद्या हिरोला साजेसे लूक नाहीत मात्र आपल्या अभिनयाने तो कोणतेही पात्र अगदी सहजपणे जिवंत करतो.बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सहकलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिन्मयला इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच अधिक महत्त्वपूर्ण भूमिका मिळतील ही आशा‌ आहे.