Home » नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील बर्फाचं गूढ आलं समोर, ऐकून वाटेल आश्चर्य…!
News

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील बर्फाचं गूढ आलं समोर, ऐकून वाटेल आश्चर्य…!

या जगामध्ये श्रद्धा व अंधश्रद्धा या दोन्हीही भावनांवर मनुष्य तरलेला आहे असे आपण वेळोवेळी पाहतो. अनेकदा धार्मिक भावना या अतिरेकी स्वरूपात अंधश्रद्धांना खतपाणी घालतात व या अंधश्रद्धांच्या मुलाम्या खाली अनेक चमत्कार खपवलेही जातात. या चमत्कारांमुळे अनेक भोंदू बाबा भाविकांना लुटतात. असाच एक चमत्कार नुकताच प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घडल्याचे समोर आले व हा चमत्कार खूप मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला.

नाशिक येथील त्रंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून याठिकाणी 30 जून रोजी अमरनाथ येथील शिवलिंगाप्रमाणे शिवलिंगा वरती बर्फ निर्माण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे या ठिकाणचे काही पुजारी होते. यामागे अशी कथाही रचली गेली की ज्यावेळी भारत आणि चीनचे युद्ध झाले त्यावेळी सुद्धा अशा प्रकारे बर्फ शिवलिंगावर साठले होते मात्र या प्रकाराची पुष्टी त्यावेळी असलेल्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात आली नाही.

यामुळे हा चमत्कार नक्की खरा आहे की यामागे काही कारस्थान आहे अशी शंका निर्माण झाली. यातूनच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा चमत्कार नक्की काय आहे हे पडताळून पाहण्याचे सीसीटीव्ही फुटेच्या आधारे ठरवले व जर हा चमत्कार सिद्ध झाला तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती 21 लाखाचे बक्षीस देईल असे सुद्धा जाहीर केले.

या ठिकाणी शिवलिंगावर बर्फ निर्माण होईल असे मंदिराशी निगडित व देवस्थानाशी निगडित अनेक व्यक्तींनाही वाटत नव्हते कारण नाशिक येथील तापमान ऐन हिवाळ्यात सुद्धा उणे कधीच नसते व मंदिरातील गर्भगृहातील तापमान सुद्धा गरम असते त्यामुळे शिवलिंगावर बर्फ साचण्यासारखे तापमान अस्तित्वातच नसल्यामुळे यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे हा संशय दृढ झाला.

यासाठी प्रशासनाने सुद्धा एक समिती गठीत केली होती. या सर्व तपासाअंती असे सिद्ध झाले की या ठिकाणी कार्यरत असलेल्या तुंगार नावाच्या पुजा-याने स्वतः शिवलिंगा वरती बाहेरून बर्फ आणून तो ठेवला व याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला. या मागे भक्तांच्या भावनांशी खेळ करुन स्वतःचा आर्थिक फायदा करण्याचा त्याचा व अन्य सहकार्यांचा हेतू होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक भाविकांनी त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये हा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी केली होती यातूनच धार्मिक भावना या किती लवकर विचलित केल्या जाऊ शकतात हे दिसून येते.

म्हणूनच वेळोवेळी कोणत्याही वायरल झालेल्या व्हिडिओ मागची सत्यता पडताळणे किती आवश्यक आहे हे सुद्धा सिद्ध होते. या सर्व प्रकारांमध्ये तपास करण्यामध्ये खूपच विलंब केला गेला असा आरोप केला जात आहे. मात्र सध्या या प्रकरणातील तीनही आरोपींना विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे व पुढील कारवाई सुद्धा सुरू आहे.