Home » यामुळे जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती आजही आहे अर्धवट अवस्थेत, जाणून घ्या यामागील रहस्य…!
Spiritual

यामुळे जगन्नाथ पुरी मंदिरातील मूर्ती आजही आहे अर्धवट अवस्थेत, जाणून घ्या यामागील रहस्य…!

भारत देशाला मंदिरांचा देश असेही म्हटले जाते. भारत देवी देवतांचा देश म्हणून ओळखला जातो. प्रत्येक मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे व या वैशिष्ट्यामागे अनेकदा तर्क शास्त्रही असते. या तर्कशास्त्राला विविध कथांच्या स्वरूपात पिढ्यान पिढ्या पुढे पोहोचवले जाते. असेच एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे जगन्नाथ पुरी होय.

जगन्नाथ पुरी हे चार धामांपैकी एक मानले जाते व जगन्नाथ पुरी येथील रथयात्राही खूप प्रसिद्ध आहे. ही रथयात्रा पाहण्यासाठी परदेशातूनही अनेक पर्यटक दरवर्षी भारतात येतात. जगन्नाथ पुरी येथील मंदिराची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या मंदिर च्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील मूर्ती या पूर्णपणे कोरल्या गेलेल्या नाहीत. या अर्धवट निर्माण केल्या गेलेल्या मूर्ती मागचे रहस्य काही कथां द्वारे आपल्यापर्यंत येते.

पूरी येथील मंदिरामध्ये आपल्याला तीन मूर्ती दिसून येतात. या तीन मूर्ती म्हणजे भगवान जगन्नाथ यांचे बंधू बलभद्र व देवी सुभद्रा यांच्या आहेत. रथयात्रेत कडुनिंबाच्या लाकडापासून बनवलेले तीन रथ निर्माण करण्यात येतात. भगवान जगन्नाथ हे भगवान श्रीकृष्णांचा अवतार म्हणून पूजनीय असतात.

पूरी येथील मंदिरांमधील तीनही मूर्ति या अर्धवट अवस्थेत बांधलेल्या आहेत. या मागची कथा म्हणजे सत्य युगामध्ये इंद्रद्युम्न नावाच्या राजाला भगवान विष्णूंचे एक अतिशय पवित्र असे मंदिर बांधण्याची इच्छा होती. इंद्रद्युम्न हा नेहमीच विष्णूंची उपासना करत असे. हे मंदिर बांधताना भगवान विष्णूंच्या मूर्तीची निर्मिती कशी करावी यासाठी त्यांनी भगवान ब्रह्मांची तपश्चर्या केली.

या तपश्चर्यामध्ये सफल होऊन त्याने भगवान ब्रह्मांना प्रसन्न केले. ब्रह्मा देवांनी इंद्रद्युम्नने विष्णूंची मूर्ती कशी असावी हे खुद्द भगवान विष्णू कडूनच जाणून घ्यावे असे सांगितले यासाठी त्याला पुन्हा एकदा तपश्चर्या करण्याचा सल्ला दिला व याप्रमाणे इंद्रद्युम्न ने भगवान विष्णूंची तपश्चर्या केली.

त्यावेळी विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाहून एक कडुनिंबाच्या झाडाचा लाकडाचा ओंडका घेऊन येण्यास सांगितले व या लाकडाच्या ओंडक्यातून विष्णूजींच्या मूर्तीची निर्मिती करण्यात सांगितले. या लाकडाच्या ओंडक्यातून विष्णूंचे रूप साकारण्यासाठी कोणत्याही कारागिराचे काम इंद्रद्युम्नास पसंत पडत नव्हते. त्याच्या मनाला समाधान वाटत नव्हते.

या मूर्तींची स्थापना निर्मिती करण्यासाठी पुढे आलेल्या कारागिरांची हत्यार अनेकदा तुटून गेली. यामागे नक्की ईश्वरी काय कल्पना आहे याचा उलगडा इंद्रद्युम्नला होत नव्हता अशा वेळी त्याला अक्षरशः तारणहार म्हणून साक्षात देवांचे वास्तुकार असलेले विश्वकर्मा हजर झाले व त्यांनी अनंत महाराणा या कारागिरासह या लाकडाच्या ओंडक्यातून भगवान विष्णूंची मूर्ती साकारण्यास तयारी दर्शवली.

मात्र त्यांनी यासाठी इंद्रद्युम्नसमोर एक अट ठेवली की ही मूर्ती तयार होईपर्यंत मंदिराचे दार उघडायचे नाही भले यासाठी कितीही कालावधी लागो. मंदिराची रचना झाल्यानंतर मूर्ती बनवण्याचे काम चालू होते मात्र आपल्या देवताच्या मूर्ती बघण्याची उत्सुकता इंद्रद्युम्नच्या मनात अगदी शिगेला पोहोचली होती व अगदी अधीर होऊन त्याने एक दिवस या मंदिराचे दार उघडले व हे दार उघडता क्षणी त्याला विश्वकर्मा व अनंत महाराणा त्या ठिकाणी अदृश्य झाल्याचे दिसले व तीन अर्धवट अवस्थेत तयार असलेल्या मूर्ती त्याच्या दृष्टीस पडल्या.

आपल्या या कृतीच्या त्याला पश्चाताप झाला मात्र तोपर्यंत खूप विलंब झाला होता. त्याने पुन्हा एकदा भगवान ब्रम्हांना साकडे घातले व त्यावेळी त्यांनी भगवान विष्णूंना हे सर्व कळवले. भगवान विष्णूंना या मूर्ती खूपच आवडल्या होत्या व याच मूर्तींची प्रतिष्ठापना या मंदिरात करावी असा दृष्टांत त्यांनी इंद्रद्युम्नला दिला. त्या मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीचे डोळे हे प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या आकाराचे आहेत मात्र हीच या मुर्ती ची खासियत आहे व हे डोळेच भक्तांना जास्त भावतात.