Home » ‘या’ शापामुळे झाली तुळशी विवाहाची सुरुवात, वाचा यामागील पौराणिक कथा…!
Spiritual

‘या’ शापामुळे झाली तुळशी विवाहाची सुरुवात, वाचा यामागील पौराणिक कथा…!

भारतीय संस्कृतीत प्रत्येक महिन्याला एक तरी सण उत्सव साजरा केला जातो. या प्रत्येक सणाचे माहात्म्य आपल्या पूर्वजांनी धार्मिक, नैतिक पायावर सांगितले आहे व या परंपरा पिढ्यानपिढ्या पाळल्या जात आहेत. दिवाळी झाल्यानंतर तूलसीविवाह हा एक पूजाविधी संपूर्ण भारतात अगदी उत्साहाने साजरा केला जातो. तुळस ही पावित्र्य व शुद्धतेची प्रतीक मानली जाते. तुलसीविवाह का केला जातो यामागे एक आख्यायिका सांगितली जाते.

तुळशीचे मनुष्य रुपातील नाव वृंदा होते. मथुरा येथील कालनेमी या दैत्य राजाला वृंदा ही मुलगी झाली होती. दैत्य कुळात  जन्माला येऊनही वृंदा अतिशय देवभक्त होती. विष्णू वरती वृंदाची नितांत श्रद्धा होती व याचे पुण्य नेहमीच तिच्या कामी येत होते. वयात आल्यानंतर वृंदाचा विवाह जालंदर या दैत्य राजासोबत करून देण्यात आला.

जालंदर हा भगवान शिवशंकर व देवांचे राजे इंद्र यांच्यातील युद्धाच्या वेळी जन्माला आलेला अतिशय क्रूर असा राजा होता. भगवान शंकर व इंद्रदेव यांच्यातील युद्धाच्या वेळी आपल्या क्रोधासाठी जाणल्या जाणाऱ्या भगवान शंकरांचा तिसरा डोळा उघडला गेला व त्यामुळे पृथ्वीचा संहार निश्चित होता. म्हणूनच देवांचे गुरु बृहस्पती यांनी भगवान शंकरांना इंद्रदेवांना माफ करण्याची विनंती केली.

यामुळे भगवान शंकरांनी आपल्या तिसऱ्या डोळ्यातून निर्माण झालेला अग्नीरूपी क्रोध हा समुद्राकडे वळवला व या ठिकाणी या क्रोधातूनच जालंधर या राक्षसाची निर्मिती झाली. जालंदराचे खरे बलस्थान होते ते त्याच्या विवाह नंतर वृंदाची मिळालेले पतीव्रत्य होय. वृंदा ही आपल्या पतीच्या अमरत्वासाठी नेहमीच प्रार्थना करत असे व म्हणूनच कोणत्याही युद्धात त्याचा नायनाट होऊ शकला नाही.

देव आणि दानव यांच्यातील अमृतकुंभ मिळवण्याच्या युद्धामध्ये सुद्धा केवळ वृंदाच्या पुण्यकर्मामुळे जालंदराचा विजय झाला व यानंतर तो अतिशय बेभानपणे सर्वत्र आक्रमण करू लागला. देवांनी नारद मुनींना जालंधराचा पराभव करण्याचा उपाय विचारला असता त्यांनी केवळ भगवान महादेवाच जालंदराचा नाश करू शकतात असे सांगितले. मात्र यासाठी काहीतरी निमित्त तर हवे म्हणून नारद मूनी हे सर्वत्र संचार करत असत त्याप्रमाणे त्यांनी जालंदराच्या दरबारात जाऊन भगवान शंकरांचे निवासस्थान असलेल्या कैलास पर्वताचे अतिशय गुणगान केले व पार्वती देवीच्या सौंदर्याची ही खूप तारीफ केली.

यामुळे अतिशय अहंकारी असलेल्या जालंदराला कैलास पर्वतावर आक्रमण करण्याची इच्छा निर्माण झाली. वृंदाच्या पतीव्रत्यामुळे साक्षात भगवान महादेवांनाही जालंदराला हरवणे कठीण जाऊ लागले. पार्वतीला आपल्या ताब्यात घेण्याची इच्छा बाळगलेल्या जालंदराने आपले रूप बदलून भगवान शंकरांचे रूप घेतले व पार्वतीकडे तो गेला. मात्र पार्वती देवीने जालंदराला ओळखले व त्याच्यावर आक्रमण केले त्यावेळी तो तिथून पळाला.

यावर क्रोधित होऊन देवी पार्वतीने भगवान विष्णूंना त्यांची  निस्सिम भक्त असलेल्या वृंदाला सुद्धा अशा प्रकारे जालंदराचे खोटे रूप घेऊन तिची समाधी भंग करावी असे सुचवले. विष्णू या गोष्टीसाठी तयार नव्हते कारण वृंदा ही त्यांची एकनिष्ठ भक्त होती मात्र जालंदराचा नाश करणे सुद्धा अतिशय आवश्यक बनले होते. म्हणून नाईलाजाने भगवान विष्णू जालंदराचा अवतार घेऊन राजवाड्यात आले. यावेळी वृंदा आपल्या पतीच्या जीवनासाठी प्रार्थना करत होती.

जालंदराच्या रूपातील विष्णूंना पाहून तिला जालंदर हा युद्धावरून जिवंत परत आला आहे असेच वाटले व ती त्याच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी जागेवरून उठली व त्या क्षणी तिची समाधीभंग पावली आणि भगवान महादेवांनी जालंधराचा वध केला. ते शीर वृंदाच्या समोर येऊन पडले. त्यावेळी तिला तिच्या सोबत छळकपट झाल्याचे लक्षात आले व हेच कपट साक्षात भगवान विष्णूंनी केल्याचे पाहून तिला अतिशय धक्का बसला व क्रोधित होऊन तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही ज्या निष्ठुरपणे एखाद्या दगडाप्रमाणे माझ्यासोबत वर्तन केले आहे त्यामुळे तुम्ही एक दगडच बनाल व त्यांचे रूपांतर या शापामुळे शाळिग्राममध्ये झाले व या शाळीग्रामाचा आकार दिवसेंदिवस वाढू लागला.

संपूर्ण पृथ्वीतलाव या शाळिग्राम मुळे व्यापले जाते की काय अशी भीती निर्माण होऊ लागली. त्यावेळी सर्व देवगण व देवी लक्ष्मींनी वृंदाची विनवणी केली व त्यावेळी उ:शाप म्हणून वृंदा आपल्या पतीच्या देहासह सती गेली या चिते मधून एक रोप बाहेर आले व तिला तुळस हे नाव देण्यात आले. तुळशी सोबत शालिग्राम ठेवला जातो याचे कारण सुद्धा या आख्यायिकेतच आपल्याला सापडते. तुळस ही एक औषधी वनस्पती आहे यामुळे तुळस नेहमीच आपल्या घरामध्ये आढळते.

भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही परंपरेला शास्त्रीय व धार्मिक असे दोन्ही आधार दिले जातात. त्याच आधारावर ही आख्यायिका बेतलेली आहे. दरवर्षी तुळशी विवाह हा प्रबोधिनी एकादशी ते त्रिपुरारी एकादशी पर्यंत साजरा केला जातो. या पूजेच्या वेळी तुळशीला अगदी एखाद्या नववधूप्रमाणे सजवले जाते. सौभाग्यवती चे सर्व अलंकार तिला अर्पण केले जातात. ज्या घरांमध्ये नुकताच विवाह झाला आहे तिथे तर आवर्जून तुळशी विवाह केला जातो.