Home » “सर्वसामान्य शेतक-याची मुलगी ते धडाडीची जिल्हाधिकारी…!” रोहिणी भाजीभाकरे यांचा थक्क करणारा प्रवास…
Success

“सर्वसामान्य शेतक-याची मुलगी ते धडाडीची जिल्हाधिकारी…!” रोहिणी भाजीभाकरे यांचा थक्क करणारा प्रवास…

आजच्या प्रचलित व्यवस्थेमधील त्रुटींबद्दल भाष्य करणारे अनेक जण आपल्या आजूबाजूला असतात.मात्र या व्यवस्थेचा भाग बनून या व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणारी खूप कमी जण असतात.खूप वर्षां पूर्वी आपल्या लहानपणी वडिलांना कलेक्टर ऑफिस मध्ये कामासाठी अनेकदा चकरा मारताना पाहून एका छोट्या मुलीने वडिलांना कलेक्टर ऑफिस मध्ये इतक्या चकरा का माराव्या लागतात असा प्रश्न केला होता.

यावर त्या मुलीच्या वडिलांनी सांगितले की आपली व्यवस्थाच अशी आहे इथे प्रत्येक काम हे खूप उशिराने होते असे सांगितले. अगदी त्याच क्षणी त्या लहान मुलीने निश्चय केला की जिल्हाधिकारी म्हणून आपण या सगळ्या व्यवस्थेमधील हे चक्र थांबवायचे. मोठेपणी तिने देशातील सर्वात अवघड परीक्षा पैकी एक म्हणजे यूपीएससीची परीक्षा पास होऊन जिल्हाधिकारी बनवून दाखवले.ही मुलगी म्हणजेच सध्या आय ए एस म्हणून देशाला सेवा प्रदान करणाऱ्या धडाडीच्या अधिकारी रोहिणी भाजीभाकरे होय.

रोहिणी भाजीभाकरे यांनी अगदी लहानपणीच आय ए एस बनण्याचे ध्येय निश्चित केले होते.त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये झाला.प्रार्थमिक शिक्षण त्यांनी सरकारी शाळेमधून पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण हे अभियांत्रिकी शाखेतून पूर्ण करून यूपीएससी परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.२००८ साली रोहिणी भाजीभाकरे यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली.रोहिणी भाजीभाकरे यांच्या मते यूपीएससी सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुमचे ध्येय निश्‍चित पाहिजे व तुमच्या प्रेरणा सुद्धा.माझी प्रेरणा हे माझे वडील होते.

युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर रोहिणी भाजीभाकरे यांची पहिली पोस्टिंग ही तामिळनाडूमधील मदुराई येथे करण्यात आली.या ठिकाणी आपल्या पहिल्याच पोस्टींगमध्ये त्यांनी इतके उत्कृष्ट काम केले की संपूर्ण देश त्यांच्या कामाला ओळखू लागला.त्यांनी पहिला उघड्यावर शौचालय मुक्त जिल्हा करून दाखवला.त्याचप्रमाणे मनरेगा चे काम त्यांनी इतक्या उत्तम पद्धतीने केले की त्यासाठी त्यांना पुरस्कार सुद्धा देण्यात आला.जेव्हा रोहिणी भाजीभाकरे यांचे पोस्टिंग हे सालेम येथे झाले तेव्हा तर त्यांनी आपल्या कामाने एका पेक्षा एक विक्रम रचले.

१७९० नंतर तब्बल १७० जिल्हाधिकारी या जिल्ह्याला लाभले मात्र यामध्ये एकही महिला जिल्हाधिकारी नव्हत्या.रोहिणी भाजीभाकरे यांच्या रूपाने पहिली महिला जिल्हाधिकारी या जिल्ह्याला मिळाली.रोहिणी यांच्या पोस्टिंग जिथे जिथे झाले आहेत तिथे रोहिणी भाजीभाकरे यांनी आपल्या वडिलांना या व्यवस्थेने दिलेला त्रास लक्षात ठेवून सर्वसामान्यांसाठी व्यवस्था अधिक सुलभ करून देण्याचे काम उत्कृष्टपणे केले आहे.

रोहिणी भाजीभाकरे यांच्या प्रत्येक विकास कार्याची चर्चा का होते याचे गमक उत्तर रोहिणी यांनी सांगितले आहे.त्यांच्या वडिलांनी त्यांना एक सल्ला दिला होता की जेव्हा कधी एखादी फाईल तुझ्या समोर येईल तेव्हा केवळ त्याकडे एक फाईल म्हणून त्याकडे न पाहता या फाईल मुळे किती लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडू शकतो याचा विचार कर आणि मग निर्णय घे. आज सुद्धा वडिलांचा हा सल्ला मी मूलमंत्र म्हणून म्हणते व म्हणूनच योग्य निर्णय घेऊ शकते असे रोहिणी भाजीभाकरे सांगतात.

सध्या रोहिणी भाजीभाकरे ह्या दिल्ली येथे शिक्षण विभागात उपसचिव पदावर कार्यरत आहेत.भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान देश असलेल्या राष्ट्राची लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची प्रक्रिया कशी चालते हे संपूर्ण जगाला सांगण्याची संधी रोहिणी भाजीभाकरे यांना त्यांच्या कार्यामुळे मिळाली.याची दखल नॅशनल जॉग्रफिक सारख्या मातब्बर वाहिनीने सुद्धा घेतली.