Home » ‘भंगारवालापासून ते महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री’ जाणून घ्या नवाब मलिक यांचा हा प्रवास…
Success

‘भंगारवालापासून ते महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री’ जाणून घ्या नवाब मलिक यांचा हा प्रवास…

गेल्या महिन्यांपासून आर्यन खान ड्र’ग्स केस प्रकरणी आर्यन खान आणि या संपूर्ण केसचा तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे यांच्या व्यतिरिक्त अजुन एक व्यक्ती चांगलीच चर्चेत आली आहे.ती व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक होय.नवाब मलिक यांनी आर्यन खानला अटक केल्यापासून समीर वानखेडे यांच्या विरोधात अगदी बारीक बारीक तपशील देणारे दस्तऐवज मीडिया समोर सादर करून समीर वानखेडे यांची बाजू कशी असत्याची आहे या संदर्भात अनेक वक्तव्ये नित्यनेमाने केली आहे.

वानखेडे यांच्या जाती धर्मावरून तसेच त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी अनेक पुरावे देत दररोज नवाब मलिक समोर येत आहेत व यातूनच भाजपा वरही त्यांनी आपला रोख वळवला आहे.त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवत भाजप नेत्यांनी नवाब मलिक यांची हेटाळणी भंगारवाला या शब्दात केली आहे.मात्र या टीकेमुळे मागे न हटता नवाब मलिक यांनी होय मी भंगारवालाच आहे व माझे संपूर्ण कुटुंबीय अजूनही हाच व्यवसाय करत आहे असे अगदी स्पष्टपणे सांगितले.नवाब मलिक यांची भंगारचा व्यवसाय करणारा व्यवसायिक ते महाराष्ट्रातील राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व इथपर्यंतचा प्रवास नक्की कसा होता याची उत्सुकता यानिमित्ताने सर्वांमध्येच निर्माण झाली आहे.याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

नवाब मलिक यांचे कुटुंबीय हे मूळचे उत्तर प्रदेश येथील होते.व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे कुटुंबीय मुंबईमध्ये येऊन स्थायिक झाले.त्यांच्या वडिलांचे एक छोटेसे हॉटेल आणि भंगारचा व्यवसाय होता.या व्यवसायात त्यांनी जम बसवला होता.नवाब मलिक यांचा स्वभाव हा सुरुवातीपासूनच धडपड्या व स्पष्ट वक्ता होता.महाविद्यालय जीवनामध्ये अचानक वाढलेल्या फीच्या विरोधात त्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन घडवून आणले व या आंदोलनाला मिळालेल्या यशामुळे त्यांचा रस हा राजकारणात जास्त वाढला.

मुंबई मध्ये 1984 साली लोकसभेच्या निवडणुका लागल्या होता.ईशान्य मुंबई या मतदारसंघातून दोन दिग्गज निवडणुकीसाठी उभे राहिले होते.त्यापैकी एक होते भाजपचे प्रमोद महाजन व दुसरे होते काँग्रेसचे गुरुदास कामत.या दोन्ही दिग्गजांमध्ये नक्की बाजी कोण मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना अचानक एका पंचवीस वर्षांच्या तरुणाने या मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज भरला.या तरुणाचे नाव होते नवाब मलिक.या निवडणुकीमध्ये गुरुदास कामत हे विजयी ठरले व नवाब मालिक यांना 2620 मते मिळाली.

यातूनच नवाब मलिक यांची धडाडी लक्षात येते.नंतरच्या काळात नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला कारण  1991 साली त्यांना काँग्रेसने महापालिकेच्या निवडणुकांसाठी चे तिकीट नाकारले होते.समाजवादी पक्षांमध्ये 1996 साली सर्वात प्रथम नेहरूनगर या मतदारसंघातून विधानसभेवर जाण्याची त्यांना संधी मिळाली व आमदार होई पर्यंत आपल्या कुटुंबाचा भंगारचा व्यवसाय ते सांभाळत होते.आमदारकी नंतर राजकीय आयुष्यातील नवाब मलिक यांची घोडदौड सुरू झाली.

1999 साली महा विकास आघाडी ला दिलेल्या पाठिंब्यामुळे समाजवादी पक्षाला राज्यमंत्रीपद एक मिळाले व ते होते नवाब मलिक.त्यानंतर मात्र समाजवादी पक्षातील काही मतभेदांमुळे पक्ष सोडून नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आतापर्यंत राष्ट्रवादीचे कार्य अधिक जबाबदारीने ते पार पाडत आहेत.राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून ते पक्षाची भूमिका मांडतात व सध्या ते राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.

आर्यन खान प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले नवाब मलिक यापूर्वीही अनेक विवादांमध्ये सापडले आहेत.2006 साली त्यांच्यावर एका इमारतीच्या बांधकाम प्रकरणी झालेल्या घोटाळ्यात आरोप लावण्यात आले होते व तब्बल बारा वर्षे  न्यायालयीन लढाईनंतर त्यांना निर्दोष म्हणून क्लीनचिट देण्यात आली.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर आज कॅबिनेट मंत्री पदावर असलेल्या या भंगार वाल्याने आर्यन खान प्रकरणांमध्ये त्यांच्यावर टीका करणा-या विरोधकांना अतिशय अभिमानाने मी भंगारवाला आहे असे सांगत सर्व भंगार व घाण साफ करणार आहे असे आव्हान सुद्धा दिले आहे.