Home » कोरडवाहू शेतीतून ‘या’ महिला कमावतात वर्षाला 25 लाख रुपये…!
Success

कोरडवाहू शेतीतून ‘या’ महिला कमावतात वर्षाला 25 लाख रुपये…!

इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे अनेकांनी आपल्याला भेडसावत असलेल्या मोठ्या संकटांवर अगदी बखुबी मात केली आहे. यामध्ये स्त्री किंवा पुरुषाचा भेदभाव केला जाऊ शकत नाही. भारतीय संस्कृती कृषीप्रधान संस्कृती आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून आसमानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी या कर्जबाजारी होत चालला आहे.

मात्र या धारणेला छेद देत औरंगाबाद येथील खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथील रहिवासी असलेल्या योगिता गायकवाड व अश्विनी गायकवाड या शेतकरी महिलांनी शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेचा फायदा घेत वर्षाकाठी 25 लाख रुपये उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे.

खुलताबाद तालुक्यातील दरेगाव येथे अश्विनी आणि योगिता गायकवाड या महिलांच्या कुटुंबीयांची 25 एकर शेत जमीन आहे. मात्र कोरडवाहू पट्टा असल्यामुळे समाधानकारक उत्पन्न घेणे शक्य होत नव्हते. या परिस्थितीला सामोरे जाणे खूप आवश्यक होते. यावेळी खचून न जाता शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी त्यांनी अर्ज भरला व आपल्या 25 एकर शेतामध्ये 30 बाय 30 मीटरवर 27 फूट इतक्या आकारमानाचे दोन शेततळे निर्माण केले.

या शेततळ्यात सुमारे एक कोटी लिटर पाणी मावते व यामुळे बाराही महिने शेतीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी उपयोग झाला. त्याचा फायदा त्यांना एकापेक्षा अधिक पिके शेतामध्ये घेण्यासाठी झाला तसेच दुष्काळाच्या भीतीने भाव नसताना आल्यासारखे पीक बाजारात काढणी करून विकण्याची मजबुरी सुद्धा निर्माण झाली नाही. बाराही महिने शेतामध्ये पीक पाण्यावर पोसून मग ते बाजारात योग्य भावाने विकले जाते.

योगिता गायकवाड व अश्विनी गायकवाड यांनी शेततळ्याच्या माध्यमातून आले ,गहू ,मूग यांसारखी विविध पिके आपल्या शेतामध्ये यशस्वीपणे घेतली आहे. त्यांच्या या अनुभवाचा वापर परिसरातील शेतकऱ्यांनी करून घेतला आहे व सध्या या भागात मध्ये शंभरहून अधिक शेततळी निर्माण झाली आहे.

योगिता गायकवाड व अश्विनी गायकवाड यांनी शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेतात शेततळी निर्माण करताना प्रत्येकी तीन लाख रुपये खर्च आला होता व यापैकी शासनाकडून प्रत्येकी एक लाख 75 हजार रुपये त्यांना अनुदान मिळाले होते. या आदर्श उदाहरणातील दखल अनेक ठिकाणी घेतली गेली आहे.