Home » पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला आला आणि चहावाला झाला, जाणून घ्या यशस्वी उद्योजक बनलेल्या तरुणाची यशोगाथा…
History Success

पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला आला आणि चहावाला झाला, जाणून घ्या यशस्वी उद्योजक बनलेल्या तरुणाची यशोगाथा…

स्वप्नील लोणकर या पुण्यामध्ये एमपीएससीची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षेचा वेळेत निकाल न लागल्यामुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केली.या निमित्ताने पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या मृगजळा मागे धावणार्‍या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.गावा खेड्यातील अनेक मुलं ज्यांचे आई-वडील शेतीचा तुकडा कसून आपल्या मूलांना अधिकारी बनवण्याचे स्वप्न बघत असतात व या स्वप्नाचे ओझे घेऊन हे विद्यार्थी रात्रंदिवस हा अभ्यासिकांमध्ये अभ्यास करत असतात.

पुण्यामुंबई मध्ये राहून नातेवाईक देणार्‍या मोजक्या पैशांमध्ये गुजराण करत असतात. काही दशकांपासून गावाकडील हुशार होतकरू मुलांना डीएड बीएड किंवा अगदी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावर सुद्धा अधिकारी बनण्याची स्वप्न  पडत आहेत. एमपीएससी चे क्लासेस पुण्या-मुंबईत असतात त्यामुळे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी येऊन राहणे हे अपरिहार्य होते. पुण्या मुंबईत राहण्याचा साधारण खर्च पूर्वी आठ हजार होता मात्र आता तो नऊ ते दहा हजार रुपये महिना झाला आहे.

अशा परिस्थितीमध्ये आयुष्यातील दहा वर्षे गुंतवत ही मूलं एमपीएससीची परीक्षा देत राहातात व निकालाची वाट पाहत राहतात.यामध्ये त्यांच्या उमेदीची वर्ष निघून जातात त्यानंतर कोणताही प्लॅन बी तयार नसेल तर अनेकदा हे विद्यार्थी नैराश्यात जाऊन आत्महत्या करतात.त्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या मागे त्यांच्या शिक्षणासाठीचे कर्ज फेडणारे  कुटुंबीय हतबल होण्याशिवाय काहीच करू शकत नाही. या सर्व गर्दीमध्ये असेही काही तरुण असतात जे वेळीच सावध होऊन प्लॅन बी अंमलात आणतात.

याचे आदर्श उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये मधुज टी अंड कॉफी हे सेंद्रिय गुळाचा चहा साठी प्रसिद्ध असलेल्या दुकानाचे मालक माळसाकांत पावडे हे होय. म्हाळसाकांत पावडे  हे  एका छोट्याशा गावातून शिक्षण पूर्ण करून नंतर नोकरी करायला लागले.शिक्षण झाल्यानंतर दोन वर्ष म्हाळसाकांत यांनी नोकरी केली व आपल्या कुटुंबाला हातभार लावला. माळसाकांत यांच्या कुटुंबाचे गावी छोटेसे किराणा मालाचे दुकान आहे जे त्यांचा भाऊ चालवतो व वडिलोपार्जित थोडीफार शेती आहे ज्यामध्ये केवळ त्यांच्या रोजच्या खाण्या इतके धान्य निघते.

अशा परिस्थिती मध्ये दोन वर्ष नोकरी केल्यावर आपल्याला काहीतरी मोठे करायचे आहे या ध्येयाने त्यांना झपाटून टाकले होते.मग नक्की काय करायचे तर एमपीएससीची परीक्षा द्यायची असे त्यांनी निश्चित केले व त्याप्रमाणे नोकरीचा राजीनामा देऊन ते पुणे येथे एमपीएससीच्या क्लासेस साठी आले.सुरुवातीच्या काळामध्ये सात ते आठ हजार रुपये इतक्या खर्चात राहणे खाणे व कधीतरी बाहेरचे खाणे यासारख्या गोष्टी भागत होत्या. दिवसातील १२ ते १४ तास अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणे इतकाच काय तो दिनक्रम त्यांनी पाळला.

या कालावधीमध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यामुळे घरून येणारी आर्थिक मदत कमी पडू लागली. अशा परिस्थितीत पुण्यासारख्या शहरात गुजराण करणे निश्चितच अवघड झाले. त्याचप्रमाणे नातेवाईक व मित्रांकडूननही वेळोवेळी विचारणा केली जाऊ लागली की कधी पास होणार यामुळे ते काहीसे नैराश्यात गेले व त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार सुद्धा येऊ लागले पण या आत्महत्येच्या विचारांमध्ये त्यांच्या मनात त्यांच्या आईची प्रतिमा आली व आपले कुटुंब आपली आई यांच्यासाठी आपण जगले पाहिजे काहीतरी नवीन मार्ग शोधला पाहिजे असे त्यांनी निश्चित केले.

त्याप्रमाणे एमपीएससी हे आपले ध्येय पूर्ण करताना काहीतरी प्लॅन बी आपण राबवला पाहिजे हे त्यांच्या मनाशी निश्चित केले.त्याप्रमाणे एक लाख रुपयांची गुंतवणूक करत त्यांनी सेंद्रिय गुळाचा चहा विकणारा मधुज टी अंड कॉफी हा स्टॉल सुरू केला.ही काही तरी अनोखी कल्पना होती व ती लोकांच्या पसंतीस उतरली. सध्या म्हाळसाकांत आपल्या चहाचा स्टॉल मधून दिवसाला खूप चांगले उत्पन्न घेत आहेत व बरोबरीने दुपारच्यावेळी दोन तास व रात्री साधारण चार ते पाच तास इतका एमपीएससीचा अभ्यास सुद्धा करत आहेत.

काही दिवसांपूर्वी स्वप्नील लोणकरने एमपीएससीच्या कोलमडलेल्या नियोजनामुळे आत्महत्या केली व त्या वेळी आपल्या सिस्टिमचा हलगर्जीपणा समोर आला .त्यावेळी म्हाळसाकांत यांच्यासारखे प्लॅन बी राबवणारे विद्यार्थी सांगतात की जेव्हा विद्यार्थी पुण्यामध्ये एमपीएससीच्या क्लास साठी येतो तेव्हा तो केवळ प्लॅन ए हाताशी घेऊन येतो पण अशा वेळी प्लॅन बी हा नेहमीच तयार ठेवला पाहिजे. कारण प्लॅन ए यशस्वी झाला नाही तर उमेदीची वर्ष निघून गेल्यानंतर आपल्या हाती काहीच रहात नाही व राहते ते केवळ नैराश्य.

म्हाळसा कांत यांचे आज सुदधा अधिकारी बनण्याचे स्वप्न जिवंत आहे मात्र त्याबरोबरीनेच त्यांनी अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेऊन आपल्या आयुष्याला सकारात्मकतेची जोड दिली आहे व याची प्रेरणा पुढील पिढ्यांमधील स्पर्धा परीक्षांकडे वाढणाऱ्या तरुणांनी सुद्धा घेणे खूपच गरजेचे आहे.