Home » अबब! द्राक्षाच्या एका घडाची किंमत आहे चक्क साडे सात लाख रुपये…!
Uncategorized

अबब! द्राक्षाच्या एका घडाची किंमत आहे चक्क साडे सात लाख रुपये…!

आपल्या आजूबाजूच्या हवामान व शरीराच्या गरजा नुसार आहार घेण्याचे वेळी आयुर्वेद‌ व आहारशास्त्राने ठरवून दिलेले आहे. प्रत्येक प्रांतामध्ये, देशांमध्ये विविध प्रकारच्या खाण्यायोग्य पदार्थांचे धान्य किंवा फळांचे उत्पादन घेतले जाते. आपल्या आहारात धान्य, कडधान्य यांच्यासोबतच भरपूर जीवनसत्वे व आरोग्यदायी शर्करांनी युक्त फळांचा समावेश असावा असे नेहमीच आहारतज्ञांकडून सांगितले जाते.

प्रत्येक मोसमांमध्ये वेगवेगळ्या फळांचे उत्पादन घेतले जाते व या मोसमांमध्ये फळांचे दर सुद्धा खालीवर होत असतात. काही वेळा तर हे दर अगदी आकाशाला भिडलेले असतात. याचे उदाहरण भारतात हापूस आंब्याच्या बाबतीत घेता येईल. मात्र हापूस आंबा किंवा असेच काही फळे खाणे आपल्या रसनेची तृप्ती व आरोग्याच्या दृष्टीने तर फायदेशीर असतेच मात्र याला एक प्रकारे आपल्या सुबत्तेचे प्रतीक सुद्धा मानले जाते.

प्रत्येक देशामध्ये अशीच काही वैशिष्ट्यपूर्ण व महागडी फळ असतात. जपानमध्ये नुकतेच रुबी रोमन या विशिष्ट प्रजातीच्या द्राक्षाने विक्रीचा एक नवीनच उच्चांक गाठला आहे. या द्राक्षाच्या एका घडाची किंमत ही साडेसात लाख रुपये इतकी लिलावामध्ये बोलीद्वारे लावण्यात आली. ही आत्तापर्यंतची या फळाची सर्वाधिक लावली गेलेली बोली आहे.

हे फळ रंगाने लाल चुटुक असून याचा आकार हा अगदी मोजून मापून बसवल्याप्रमाणे उत्पादित केला जातो. हे फळ आरोग्याच्या दृष्टीने तर हितकारक आहेच मात्र अनेक जण याचा वापर हा आप्तजनांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी ही करतात. ही द्राक्षे विकत घेणे म्हणजे जणू काही एक प्रकारे आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शनच आहे. या द्राक्षाचा लिलाव केला जातो व याची सर्वसाधारण मंडईत विक्री केली जात नाही.

या द्राक्षाचे उत्पादन घेण्याचे अगदी शास्त्रीय काटेकोर नियमही आखण्यात आलेले आहेत. या नियमांमध्ये उत्तीर्ण झाले तरच या द्राक्षांना गुणांक व विक्रीची मुभा दिली जाते. या द्राक्षामध्ये 18% इतकी शर्करा असते व या  एका द्राक्षाचा आकार हा वीस ग्राम इतका असतो. या द्राक्षाच्या एका घडामध्ये साधारण 30 ते 35 इतकी द्राक्ष असतात. या द्राक्षाच्या लालचुटुक रंगामुळे त्याला रुबी रोमन असे नाव देण्यात आले आहे. जपान हा आपल्या वैविध्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी ओळखला जातो.

जपानने अगदी राखेतून उभे राहत विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे व यामध्ये आता कृषी क्षेत्राची सुद्धा भर पडत आहे. कृषी क्षेत्रामधील विविध बदल हे शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या फायद्याच्या दृष्टीने केले जातात. याचे उदाहरण  म्हणजे मध्यंतरी चर्चेत आलेले चौकोनी आकाराचे कलिंगड होय. या चौकोनी आकाराच्या कलिंगडाची निर्मिती ही साठवणुकीच्या दृष्टीने सोयीस्कर मार्ग म्हणून करण्यात आलेली आहे. मात्र सध्या या कलिंगडा पेक्षा ही जास्त चर्चा रंगली आहे ती साडेसात लाख रुपये इतके एका घडाचे मूल्य असलेल्या रुबी रोमन या द्राक्षाची हे मात्र नक्की.