fbpx

झोप पूर्ण होत नाही आहे तर हे नक्की वाचा

झोप हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणांची झोप पूर्ण होत नाही. दिवसभराचा थकवा दूर घालवण्यासाठी व्यक्तीने आराम हा केलाच पाहिजे. यासाठी रात्रीची पुरेशी झोप फार महत्त्वाची असते. झोप पूर्ण होत नसेल तर ती गोष्ट आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

* कमी झोपेमुळे किंवा अतिझोपेमुळे आळस बळावतो व त्यामुळे सुस्ती येते. त्यामुळे आपल्या कामांचा वेग मंदावतो व परिणामी आधी काही मिनिटांत होणारे आपले काम काही तासांवर जाऊन पर्यायाने आपल्या प्रगतीचा वेग मंदावतो. आपल्या सहकार्‍यांसमोर आपला प्रभावही फिका पडतो व बाहेरच्या जगातही आपली मंद अशी प्रतिमा तयार होते.

* अतिझोपेचा किंवा कमी झोपेचा आपल्या बुद्धिमत्तेवरही परिणाम होतो. शिकणे व विचार करणे या प्रक्रियांमध्ये झोपेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपली
एकाग्रता, सावधपणा, समस्या सोडवण्याची क्षमता इत्यादी गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी आपल्या मेंदूत एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेचे आरोग्य हे झोपेवर
अवलंबून असते. पर्यायाने आपल्या बुद्धिमत्तेवरही त्याचा परिणाम होतो.

* याशिवाय आपली स्मरणशक्‍ती मजबूत करण्यासाठीही झोप गरजेची असते. झोप कमी झाल्यास आपल्या स्मरणशक्‍तीवरही त्याचा परिणाम होतो.

* झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभार आळस, काम करताना चिडचिड, नैराश्य तसंच कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करता येत नाही. तसंच रक्तदाब अनियंत्रित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. विस्मरण, रक्तातली साखर वाढणं, चेहऱ्यावर सतत थकवा, लठ्ठपणा, पोटाचे विकार, डोकेदुखी, अंगदुखी अशा विविध समस्या उद्भवत आहेत. झोप पूर्ण न झाल्यामुळे असे अनेक परिणाम शरीरावर होतात.

* अलिकडे फोन आणि लॅपटॉपचा वापर खूप वाढला आहे. पुरेशी झोप न मिळाल्यास डोळे लाल होतात आणि सातत्याने डोळ्यातून पाणी येतं. डोळयांना सूज येते.डोळ्यांभोवती काळी वर्तुळ आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात. डोळ्यांच्या समस्या जर तुम्हाला जाणवत असतील तर ही तुमच्या अपुऱ्या झोपेचे कारणं असू शकतं.

*याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे किंवा अतिझोपेमुळे हृदयविकार, हृदयविकाराचा झटका येणे, हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता, उच्च रक्‍तदाब, मधुमेह इत्यादी समस्या निर्माण होतात.

* गरजेपेक्षा कमी झोप झाल्यास आपल्या त्वचेवरही त्याचा दुष्परिणाम होतो. एक रात्र झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यांखाली काळे डाग पडणे, डोळ्यांखालील त्वचा सुजणे इत्यादी समस्या निर्माण होतात. हीच गोष्ट सातत्याने होत राहिल्यास हे निशाण कायमचे चेहर्‍यावर बसतात.

* झोपेच्या कमतरतेमुळे लैंगिक क्षमतेवरही दुष्परिणाम होतो. संपूर्ण शरीरात ताण व आळस असल्यामुळे लैंगिक संबंधांसाठीचा उत्साह हरवून जातो.

* कमी झोपेमुळे हार्मोन्सचं प्रमाण नियंत्रणात न राहता अधिक भूक लागण्याची समस्या उद्भवते. परिणामी तुमचं वजन वाढतं. जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेता तेव्हा तुमचे हार्मोन्स नियंत्रणात राहतात. आणि या हार्मोन्सचा परिणाम तुमच्या भूकेवर होतो.