एकेकाळी बँकेत नोकरी करणारे अशोक सराफ असे बनले अभिनयाचे बादशहा

एकेकाळी बँकेत नोकरी करणारे अशोक सराफ असे बनले अभिनयाचे बादशहा

एकेकाळी बँकेत नोकरी करणारे अशोक सराफ असे बनले अभिनयाचे बादशहा

मराठी चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर गेल्या 50 वर्षांपासून गाजत असलेलं नाव म्हणजे अशोक सराफ होय. विनोदी तसेच नायकाची आणि प्रसंगी खलनायकी भूमिकादेखील त्यांनी प्रचंड ताकदीने साकारली.अचूक टायमिंग साधत केलेली संवादफेक हे त्यांच्या अभिनयकौशल्याचं बलस्थान मानलं जातं. मात्र अशोक सराफ यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. आज त्यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या या लेखात जाणून घेऊयात अभिनेते अशोक सराफ यांच्या प्रवासाविषयी…

अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी मुंबईमधील चिखलवाडी या भागात झाला आणि तिथेच त्यांचं बालपण गेलं. त्यांनी शिक्षणदेखील मुंबईतल्याच डी.जी.टी. विद्यालया मधून पूर्ण केलं. लहानपणापासूनच अभिनय आणि नाटक यांची आवड असणाऱ्या अशोक सराफ यांनी ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकामध्ये विदुषकाची भूमिका साकारत रंगभूमीवर पाऊल ठेवलं. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 18 वर्ष. या कालावधीच्या आसपास ते बॅंकेतदेखील नोकरी करायचे. त्यांनी जवळपास बँकेमध्ये 10 वर्ष नोकरी केली. मात्र बँकेत कमी आणि अभिनयावर त्यांचं जास्त लक्ष होतं.

त्यानंतर अशोक सराफ यांना ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारायची संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. मात्र अशोक सराफ यांना खरी ओळख मिळाली ती दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटातून. या चित्रपटात अशोक सराफ यांनी ‘सखाराम हवालदार’ ही भ्रष्ट पोलीस हवालदाराची इरसाल भूमिका साकारली जी अत्यंत लोकप्रिय झाली.

अशोक सराफ यांच्या भूमिका 80 आणि 90 च्या दशकातील चित्रपटांमधून प्रामुख्याने गाजल्या. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने अनेक सुपरहिट चित्रपट देत रसिकांच्या मनावर राज्य केले. या जोडीने केलेले ‘दे दणा दण’, ‘धूमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’ हे चित्रपट अत्यंत गाजले. तसेच अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांचे ‘आयत्या घरात घरोबा’, ‘गंमत जंमत’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आमच्यासारखे आम्हीच’ हे चित्रपटही अत्यंत लोकप्रिय ठरले. याव्यतिरिक्तही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. 

अशोक सराफ यांचा अभिनय आणि अचूक टायमिंग साधत केलेली संवादफेक यामुळे बॉलिवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीलाही त्यांची भुरळ पडली. त्यांनी ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘जोरू का गुलाम’, ‘येस बॉस’, ‘सिंघम’ यांसारख्या आणि इतरही अनेक हिंदी चित्रपटांत दमदार भूमिका निभावल्या.  

अशोक सराफ यांनी रंगभूमीवर देखील मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘सारखं छातीत दुखतंय’, ‘मनोमिलन’, ‘अनधिकृत’, ‘हमीदाबाईची कोठी’ इत्यादी आणि इतरही अनेक नाटकांमध्ये त्यांनी कसदार भूमिका साकारल्या. त्याचप्रमाणे छोटा पडदा अर्थात टीव्हीवरील ‘छोटी बडी बाते’, ‘हम पांच’, ‘टना टना टण’ या मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

अशोक सराफ यांचा विवाह नावाजलेल्या मराठी अभिनेत्री निवेदिता जोशी यांच्याशी झाला असून त्यांना अनिकेत सराफ हा मुलगा आहे. अशोक सराफ यांचे कलाक्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, झी गौरव पुरस्कार इत्यादी आणि इतरही अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अशा या हरहुन्नरी अभिनयाच्या सम्राटाला ‘टीम बीइंग महाराष्ट्रीयन’तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.