Home » ठाण्याचे ‘बाळ ठाकरे’ म्हणून ओळखले जाणारे ‘आनंद दीघे’ नेमके आहे तरी कोण?
Article

ठाण्याचे ‘बाळ ठाकरे’ म्हणून ओळखले जाणारे ‘आनंद दीघे’ नेमके आहे तरी कोण?

महाराष्ट्राची अस्मिता व‌ स्वाभिमान जपणारा पक्ष म्हणजे शिवसेना होय. शिवसेना पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जीवाभावाचे कार्यकर्ते निर्माण केले व पक्षाला अगदी तळागाळापर्यंत नेले. आजही शिवसेना पक्ष हा सुरूवातीच्या काळात पक्षासाठी आपला वेळ आणि सर्व काही देणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे ओळखला जातो. असेच एक नाव म्हणजे कार्यकर्त्यांची फौज उभी करणारे शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते आनंद दिघे. आज सुद्धा पक्ष आणि सर्वसामान्य  जनता आनंद दिघेंना विसरलेले नाहीत.

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे गारुड तरुणांच्या हृदयावर घर करून गेले व यातूनच पक्षाला वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि यामध्ये ठाण्यात शिवसेनेची मोट उभी करण्याचे  काम आनंद दिघे यांनी केले. आनंद दिघे अगदी झपाटून काम करणारे कार्यकर्ते होते. ठाण्यामध्ये केवळ आनंद दिघे यांच्या साठी आजही शिवसेनेवर जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते दिसून येतात.

1952 साली आनंद दिघे यांचा जन्म झाला. ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना रुजवण्याचे काम त्यांनी केले. समाजाच्या प्रश्नांबाबत आनंद दिघे यांना कळकळ होती व यामुळेच त्यांनी आपल्या घराजवळच आनंदाश्रम ची स्थापना केली. आनंद आश्रम मध्ये गोरगरिब, दुर्बल व सर्वसामान्य लोक आपल्या समस्या घेऊन जात असत व या समस्यांना सर्वतोपरी सोडवण्याचे काम आनंद दिघे करत असत यामुळे त्यांची लोकप्रियता प्रति बाळासाहेब इतकी वाढली.

आनंदाश्रम हा नेहमीच लोकांनी गजबजलेला असे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव आनंद दिघे यांनी केला नाही. सर्वसामान्यांमध्ये ते अगदी समरसून जात. तसेच नंतरच्या काळामध्ये त्यांची ठाण्याचे जिल्हाप्रमुख पदी निवड झाली यावेळी त्यांनी आपल्या कामाचा पसारा खूप जास्त वाढला व शिवसेनेला अधिकाधिक भक्कम करण्याचे प्रयत्नही केले. 1989 साली आनंद दिघे यांच्यावर एक बालंट आले.

त्यावेळेच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे आनंद दिघे यांनी मदत केलेले उमेदवार अवघ्या एका मताच्या फरकाने पराभूत झाले व यामागे शिवसेनेचे कार्यकर्ते फितूर झाल्याचे बाळासाहेबांचे मत होते. बाळासाहेबांना त्यावेळी आनंद दिघे यांनी त्या गद्दाराला सोडणार नाही असे सांगितले‌. शिवसेनेचे खोपकर हे कार्यकर्ते या पराभवामागचे कारण असल्याचे समोर आले. त्यावेळी आनंद दिघे यांनी दिलेला शब्द खरा केला व अगदी दिवसाढवळ्या खोपकर यांची ह’त्या झाली या हत्येच्या आरोपाखाली आनंद दिघे यांना अटक करण्यात आली व काही काळानंतर ते जामिनावर बाहेर आले.

आनंद दिघे हे केवळ राजकारण करणारे नव्हते तर ते अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. भारतीय संस्कृती विषयी त्यांना अतिशय प्रेम होते व यातूनच त्यांनी ठाण्यामध्ये नवरात्रोत्सव ,दहीहंडी या कार्यक्रमांची सुरुवात केली. आजही हे कार्यक्रम म्हणजे ठाण्याची ओळख आहेत मात्र यामागचे खरे शिल्पकार आनंद दिघे होते. आनंद दिघे यांचा मृ’त्यू हा अतिशय आकस्मिक पद्धतीने झाला.

एका अपघाताचे निमित्त झाले व पायाला झालेल्या दुखापती च्या वेळी शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना हृदयविकाराचे झटके आले व यामध्ये त्यांचा अंत झाला. कार्यकर्त्यांमध्ये यावेळी प्रचंड रोष निर्माण झाला होता व आनंद दिघे यांच्या मृ’त्यु’ची बातमी कळताच कार्यकर्त्यांनी सर्वत्र जाळपोळ केली होती. आजही आनंद दिघे यांच्या आनंदाश्रम आणि त्यांच्या स्मारकाजवळ आपल्या मनातील गा-हाणे घेऊन जाणाऱ्या शिवसैनिकांची उपस्थिती हेच आनंद दिघे यांनी केलेल्या कार्याची पोचपावती आहे.