Articles Featured

अबब..! भारतातील सर्वांत शक्तिशाली निवासस्थान याची रचना पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल !

जाणून घ्या भारतातील सर्वांत शक्तिशाली निवासस्थानाविषयी… याची रचना पाहून आश्चर्यचकित व्हाल.

स्वप्नातील घर कसे असावे याविषयी प्रत्येकाच्या मनात अनेक सुंदर कल्पना असतात. जो-तो आपल्या स्वप्नातील सुंदर घर साकारण्यासाठी प्रयत्न करत असतो. घर बांधताना सजावटीसोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील त्याचे बांधकाम करण्याला प्राधान्य दिले जाते. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण भारतातील सर्वाधिक मजबूत तसेच शक्तिशाली असणाऱ्या निवास्थानाविषयी माहिती पाहणार आहोत.

भारतातील सर्वाधिक शक्तिशाली असलेल्या निवासस्थानाचे नाव आहे ‘पंचवटी’. भारताची राजधानी नवी दिल्लीमधील ‘7 रेस कोर्स रोड’ अर्थात ‘७ लोक कल्याण मार्गा’वर असलेले ‘पंचवटी’ निवासस्थान 1990 पासून भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहे. यामध्ये पंतप्रधानांचे खाजगी निवासी क्षेत्र, वर्क हाऊस, सभागृह आणि गेस्ट हाऊस आहे.

पंचवटी निवासस्थान 12 एकरच्या विस्तीर्ण जमिनीवर पसरलेले असून यामध्ये एकूण पाच बंगल्यांचा समावेश आहे.  एकंदरीत, या पाच इमारती, गार्डन आणि येथील इतर काही मोक्याच्या रचना हे सर्व मिळून ‘पंचवटी’ निवासस्थान बनलेले आहे. 

या निवास्थानात राहणारे पहिले पंतप्रधान स्व. राजीव गांधी होते. भारताचे सातवे पंतप्रधान आणि राजीव गांधी यांचे उत्तराधिकारी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांनी पंचवटीला प्रथम स्वत: साठी आणि भावी पंतप्रधानांसाठी अधिकृत निवासस्थान म्हणून घोषित केले.

सामान्यत: पंतप्रधान आपल्या सर्व अधिकृत आणि राजकीय बैठका येथे घेतात. पंतप्रधानांचे अधिकृत कार्यालय ‘दक्षिण ब्लॉक, केंद्रीय सचिवालय’ येथे असले तरी ‘पंचवटी’ या निवासस्थानात पंतप्रधानांसाठी वर्क हाऊस आणि हॉल देखील आहेत. त्यामुळे पंतप्रधानांना पंचवटीतूनदेखील कामकाज पाहणे शक्य होते.

सुरक्षेच्या दृष्टीने हे निवासस्थान आणि आजूबाजूचा परिसर नागरिकांसाठी प्रतिबंधित आहे. येथे सतत विशेष सुरक्षा दलाचा पहारा असतो. ‘7 रेस कोर्स रोड’ हे या रस्त्याचे जुने नाव असून याचे आधुनिक नाव ‘७ लोक कल्याण मार्ग’ असे आहे.

भारतात इतरही अनेक ठिकाणी शक्तिशाली आणि मजबूत महल, गड, किल्ले आहेत. मात्र देशाचे नेतृत्व करत असलेल्या पंतप्रधानांचे ‘पंचवटी’ हे निवासस्थान अत्यंत वेगळे, सुंदर, सुरक्षित असल्याने त्याला मोठे महत्व आहे. भारताच्या पंतप्रधानांचे हे अधिकृत निवासस्थान जगातील तीन सर्वात शक्तिशाली निवासस्थानांपैकी एक आहे.