Articles Featured Festival Inspirational Religion

… म्हणून गणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित केले जाते

ganpati visarjan
ganpati visarjan

देवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक मंगल कार्यात त्याला प्रथम स्थान मिळालेला आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असल्यास आपण सर्वात प्रथम गणपतीची पूजा करतो.महादेव शिवशंकर आणि पार्वती देवी यांचा पुत्र म्हणून गणपती ओळखला जातो. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात किमान नामस्मरणाने करतो. त्यामुळे सर्व देवांमध्ये महत्वाचा आणि सर्वात ताकदवर देव म्हणून गणपतीची गणना केली जाते. गणपती हे सर्वात पराक्रमी देवांपैकी एक मानले जातात. अगदी गणेश पुराणातही घरोघरी गणपती विराजमान झाल्याचे दाखले आढळतात. गणपती जल तत्त्वाचे अधिपती आहे. हेच कारण आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चना करून गणपती-प्रतिमेचे विसर्जन केले जाते.

गणपती हा बुद्धीचा देव आहे. माणसाची बुद्धी कुशाग्र असेल तर कामात अडचणी येत नाहीत. अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करता येते. हे विश्व पाच महाभूतांनी मिळून बनले आहे. या पाच तत्त्वांपैकी एक तत्त्व आहे जल. जलाचा अधिपती आहे गणपती. माणसाच्या मेंदूचा अधिकांश भाग तरल आहे, असे विज्ञानानेही मान्य केले आहे. त्यामुळेच गणपतीला बुद्धीची देवता मानण्यात येते व गणपतीचे विसर्जन पाण्यात करतात. गणपतीचा निवास पाण्यात असतो, अशी मान्यता आहे. बाप्पा ११ दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत विराजमान होतात. त्या दिवशी देखील प्रत्येक भाविक अगदी जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देतो. अनेकदा लहान मुलं बाप्पाला सोडून जाण्यास नकार देतात. अगदी रडून ते आपल्या लाडक्या गणूला निरोप देतात. अशावेळी त्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात. आपण बाप्पाला निरोप का देतो? किंवा गणरायाचे विसर्जन पाण्यातच का करतात?मात्र यामागे एक महत्वाची आणि पौराणिक गोष्ट असून आजच्या लेखामध्ये आपण याच गोष्टीविषयी माहिती घेणार आहोत.

पौराणिक कथांमध्ये याविषयी एक कथा सांगितली असून ती अशी आहे कि, महर्षी वेदव्यासजींनी गणेश चतुर्थीपासून लागोपाठ दहा दिवसांपर्यंत महाभारताची कथा गणपतीला ऐकवली होती. मात्र गणपतीने हि कथा केवळ न ऐकता लिहून देखील काढली होती. मात्र हि कथा सांगताना महर्षी वेदव्यास यांनी आपले डोळे बंद ठेवले होते. त्यामुळे या कथेचा गणपतीवर काय परिणाम होत आहे याची त्यांना माहिती नव्हती. मात्र जेव्हा हि कथा पूर्ण झाली तेव्हा त्यांनी डोळे उघडल्यानंर त्यांना दिसून आले कि, गणपतीच्या शरीराचे तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याला प्रचंड ताप आला होता. त्यानंतर महर्षी वेदव्‍यासजींनी गणपतीला जवळच्या कुंडांत डुबकी लावायला सांगितली ज्याने त्यांच्या शरीरातील तापमान थोडा कमी झाला. असे मानले जाते की गण‍पति गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगुण साकार रूपात या मूर्तीत स्थापित राहतात, ज्याला गणपती उत्सवाच्या दरम्यान स्थापित केले जाते. त्यामुळे या ११ दिवसांमध्ये गणपती लोकांच्या सर्व इच्छा आणि अपेक्षा ऐकता असतो. सर्व लोक आपली इच्छा आणि अपेक्षा गणपतीच्या कानात सांगत असतात. त्यामुळे या काळातील १० दिवस गणपती लोकांची इच्छा ऐकता ऐकता एवढे गरम होऊन जातात की चतुर्दशीला वाहत्या पाण्यात विसर्जित करून त्यांना शीतल करण्यात येते.

त्याचबरोबर आणखी एक गोष्ट अशी सांगितली जाते कि, मनुष्याची उत्पत्तीही जलापासूनच झाली आहे. भगवंताचा पहिला अवतार मत्स्य अवतार आहे. हा अवतार पाण्यात जन्मास आला. त्यामुळे मानवी संस्कृतीत जलाला पूज्य स्थान आहे. भगवान गणपती जल तत्त्वाची अधिपती देवता आहे. त्यामुळे गणपतीला प्रथम पूज्य मानण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यात करण्यामागेही हेच कारण आहे.गणपती बाप्पाशी निगडित मोऱ्या नावामागे गणपतीचे मयूरेश्वर स्वरूप मानले जाते. गणेश-पुराणानुसार सिंधू नावाच्या दानवाच्या अत्याचारापासून बचाव करण्यासाठी देवगणांनी गणपतीचे आव्हान केले. सिंधूचा संहार करण्यासाठी गणपतीने मयुराला वाहन निवडले आणि सहा भुजांचा अवतार धारण केला. या अवताराची पूजा भक्त गणपती बाप्पा मोऱ्याच्या जयघोषासोबत करतात.

गणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित का करावे ?
पौराणिक कथांनुसार, यामागे देखील मोठे कारण आहे. या १० दिवसांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शास्त्रोक्त पूजाविधींमुळे मूर्तीत श्री गणपतीचे चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होते. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने हे चैतन्य पाण्याद्वारे सर्वदूर पसरते. पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने हे चैतन्य वातावरणाद्वारेही दूरपर्यंत पोहोचते. पूजेतील निर्माल्यामध्येही चैतन्य आलेले असल्यामुळे निर्माल्य वहात्या जलस्रोतात विसर्जित करावा. असे केल्याने निर्माल्यातील चैतन्यही सर्वदूर पसरते. बाप्पाला निरोप देणं प्रत्येकालाच कठीण असतं. मात्र दहा दिवसांच्या सेवेनंतर आपल्याला बाप्पाला निरोप द्यावाच लागतो.

About the author

Being Maharashtrian