वैवाहिक आयुष्य सुखी राखण्यासाठी खालील गोष्टी करा…

आधुनिक काळात समाजव्यवस्था आणि कुटुंबाच्या रचनेमध्ये अमुलाग्र बदल घडून आले आहेत. पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेली एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन सध्या विभक्त कुटुंब पद्धती रुजू झाली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये पती पत्नी व त्यांची मुले इतके मर्यादित कुटुंब असते.अशा वातावरणामध्ये सहसा लग्नाचे नव्याचे नऊ दिवस सरल्यानंतर विवाहित जोडप्यांमध्ये काही कलह किंवा गैरसमज निर्माण होऊन हे नाते अगदी संपुष्टात येण्यापर्यंत देखील परिस्थिती निर्माण होते तर काही परिस्थितीमध्ये विवाहित जोडपे समाज आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी तडजोड करून एकमेकांसोबत राहत असतात. मुळात वैवाहिक आयुष्य हे अगदी सुखासमाधानाने व सामंजस्याने व्यतित व्हावे यासाठी थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन व काही प्रमाणात समुपदेशनाची आवश्यकता असते .आज आपण वैवाहिक आयुष्य सुखी राहण्यासाठी काही सर्वसाधारण टिप्स पाहणार आहोत.

1) विवाहाच्या काही वर्षांनंतर जोडीदारा मध्ये एकसुरी पणाची भावना निर्माण होऊ शकते याला मुख्य कारण म्हणजे भावनिक गरजा पूर्ण न होणे किंवा आपल्या जोडीदाराकडून आपली योग्य ती दखल घेतली जात नाही अशी भावना निर्माण होणे होय. ही भावना मुख्यतः पुरुषांमध्ये जास्त निर्माण होते. अपत्य प्राप्तीनंतर स्त्रिया किंवा मुली घरातील अन्य जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त होतात त्यावेळी आपल्या पत्नीला आपल्या भावनिक गरजा समजून घेता येत नाही असा गैरसमज निर्माण होऊ शकतो व काही प्रमाणात हीच परिस्थिती स्त्रियांच्याबाबतीतही घडू शकते.यामुळे नेहमी आपल्या जोडीदारा बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे खूप आवश्यक असते.

2) वैवाहिक आयुष्यामध्ये एकमेकांना गृहीत धरल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी घरातील जबाबदा-यांची  विभागणी ही सामंजस्याने करावी. जेणेकरून कोणा एका व्यक्तीवर याचा भार येणार नाही व व त्याचे पर्यावसन भांडणांमध्ये होणार नाही.

3) विश्वास आणि प्रामाणिकपणा ही कोणत्याही नात्याची पाया असतो. यामुळे आपल्या जोडीदारावर विश्वास आणि त्याच्या प्रतीच्या निष्ठा यांना तडा जाऊ देऊ नये .अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून नात्यांमधील विश्वास उडू शकतो. घरातील आर्थिक निर्णय घेताना ही एकमेकांना विश्वासात घेऊन परस्पर सामंजस्याने चर्चा करणे कधीही फायद्याचे ठरते. कारण आजकाल दोन्हीही जोडीदार हे  कामानिमित्त बाहेर जात असतात व आर्थिक रित्या ते स्वतंत्र असतात.

4) सुरुवातीचे काही दिवस पती आणि पत्नी दोघेही आपल्या दिसण्यावर आणि राहण्यावर विशेष लक्ष देत असतात मात्र काही वर्षानंतर घरातील काही मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे स्वतःच्या दिसण्याकडे काहीसे दुर्लक्ष होऊ लागते.आपल्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी व स्वतः प्रति नेहमीच आकृष्ट राहण्यासाठी पती व पत्नी  दोघांनीही प्रेझेंटेबल राहण्यावर विशेष भर दिला गेला पाहिजे.

5) विवाहानंतर पती आणि पत्नी आपले प्राधान्यक्रम बदलल्यामुळे सुरवातीच्या काळातील मित्र-मैत्रिणी व अन्य नातेसंबंधांमध्ये मन रमत नाही असे दिसून येते मात्र आपल्या जोडीदारासोबत चे नाते अधिक दृढ होण्यासाठी अधून मधून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाणे ,त्यांच्याशी संवाद साधणे यासारख्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.

6) सातत्याने जोडीदाराकडे दुर्लक्ष करणे ,जोडीदारासमोर सतत दुस-यांचे कौतुक करणे किंवा तुलना करणे यासारख्या गोष्टी सातत्याने घडत गेल्यानंतर त्याचा उद्रेक हा तीव्र स्वरूपात होऊ शकतो. शक्यतो आपल्या जोडीदाराची  इतरांसोबत तुलना करणे टाळावे.

7) प्रत्येक वेळी वैवाहिक आयुष्यात काही मतभेद निर्माण झाले तर प्रत्येक वेळी भांडण किंवा वाद-विवाद करुन संपवावे असे नाही तर कित्येकदा आपल्या जोडीदाराच्या भावनांना समजून घेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेऊन शांत राहणे सुद्धा वैवाहिक आयुष्य सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी मदत करते.

8) कोणता जीव आहेत जोडप्यांमध्ये कायम आनंदी किंवा कायम भांडणारे असे कोणतेही नाते नसते त्यामुळे याचा एक मध्य मार्ग निर्माण करणे व एकमेकांना थोडी स्पेस देणे हे वैवाहिक आयुष्य सामंजस्याने जगण्यासाठी खूप आवश्यक असते.

9) अपत्यप्राप्ती नंतर अनेक जबाबदाऱ्या या नव्याने पार पाडत असताना जोडीदाराचा सहभाग नसेल तर त्यांच्यामध्ये नैराश्य निर्माण होते याचा प्रभाव आयुष्यामध्ये  तणाव निर्माण करू शकतो यासाठी अपत्य प्राप्तीनंतर मुलांसाठी सा-या  जबाबदा-या पार पाडताना जोडीदारासोबत सक्रिय सहभाग असावा.शारीरिक संबंध हे  वैवाहिक आयुष्यातील एक मुख्य अंग आहे. ज्या जोडप्यांमध्ये शारीरिक संबंध निकोप व आनंददायी असतात त्यांचे नातेसंबंध हे निरोगी व सुखी असतात असे दिसून आले आहे यासाठी जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडली नाही पाहिजे.