घरातील तुळशीचे रोप वारंवार सुकून जाते ,जाणून घ्या कारणे आणि टवटवीत तुळस ठेवण्याचे उपाय.

तुळशीचे रोप खूप आरोग्यदायी असते. भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अशी मान्यता आहे. तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्त्व आहे. भारतीय महिला दररोज सकाळी तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालतात. वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे. लक्ष्मीसमान तुळस सुखदायक आणि कल्याणकारी असल्याचे सांगितले जाते. श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असून, दीपोत्सवानंतर तुळशीचा विवाह करण्याची परंपरा आहे. सत्यनारायण असो किंवा विष्णूशी संबंधित कोणत्याही पूजनावेळी तुळस आवश्यक असते. तुळशीच्या पानाशिवाय भगवंत नैवेद्य ग्रहण करत नाहीत, अशी मान्यता आहे.परंतु अनेकांच्या घरात तुळशीचे रोप वारंवार लावून देखील लगेच सुकून जाते. यामागे  अनेक समज -गैरसमज आहेत परंतु  रोपण  करण्याची चुकीची पद्धत यामुळे तुळशीचे रोप वारंवार सुकून जाते. अनेक वेळा तुळशीचे रोप  सडून किंवा सुकून जाते.फक्त ज्या जमिनीत पाणी साचून राहते तिथं तुळशीचे मूळ कुजतात त्यामुळे कोरड्या आणि पाणी झिरपरणाऱ्या जमिनीत तुळस लावावी. 

अशा मातीत लावा तुळशीचे रोपे – तुळशीचे रोप लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी ,जास्त पाणी घातल्यामुळे देखील तुळशीचे रोप नीट लागत नाही. जर जास्त पाणी झाले तर त्या रोपाला बुरशी येते. त्यामुळे रोप लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. ७० टक्के माती व ३० टक्के वाळू एकत्र करून तुळशीचे रोप लावा. त्यामुळे पावसाळ्यात किंवा  जेव्हा जास्त पाणी घातले जाईल तेव्हा ते पाणी वाळूमुळे निघून जाईल. 

 शेण खतांचा योग्य वापर –  गाय आणि शेती हे एक वेगळे समीकरण आहे. गाईच्या शेणाचा , मूत्राचा, दुधाचा  सर्व गोष्टीचा फार उपयोग होतो. तुळशीचे रोप येण्यासाठी देखील शेतखत खूप उपयोगी ठरते. पण शेतखत टाकताना. ते खत सुके असावे ,म्हणजे रोपांना चांगले पोषण मिळते . शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती तसेच वहनदेखील चांगल्याप्रकारे होते.शेणखतामधून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत फारच अत्यल्प असते. परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत करणारे जिवाणू जसे ऍझोटोबॅक्‍टर, स्फुरद विरघळवण्यास मदत करणारे जिवाणू इ. इतर सूक्ष्मजीवांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो.

कुंडीची  निवड करताना – कुंडीच्या आकारा बाबतीतही वेगवेगळ्या आकाराच्या कुंडय़ा उपलब्ध असतात. कुंडीच्या आकाराचा विचार करताना, झाड आणि कुंडी एकमेकांना शोभून दिसणारी असावी. कोणतेही झाड लहान असताना त्याला साजेशी लहानच कुंडी वापरावी. ते मोठे झाल्यावर, त्याला साजेशा मोठय़ा कुंडीत आपण हलवू शकतो. यामुळे जागा वाचते आणि जास्त कुंडय़ा आपण ठेवू शकतो. जमिनीवरचा झाडाचा भाग आपल्याला दिसतो, पण कुंडी ही झाडाच्या न दिसणाऱ्या भागासाठी अर्थात मुळांसाठी आहे. कुंडीमध्ये झाडाची मुळे वाढणार आहेत. सर्वसाधारणपणे मुळांचा पसारा हा झाडाच्या डोलाऱ्याप्रमाणे असतो. उंच, उभे वाढणाऱ्या झाडाची मुळे खोल जातात तर पसरणाऱ्या झाडाची मुळेही पसरतात. उंच झाडाला उभी, खोल कुंडी वापरावी तर पसरणाऱ्या झाडाला पसरट कुंडी वापरावी. यावरून कुंडी आणि झाड याचे योग्य समीकरण आपण ठरवू शकतो.कुंडीला तळाशी भोकं आहेत की नाही ते आवर्जून बघावं. पाण्याचा निचरा होण्यासाठी तसेच कुंडीतल्या मातीत हवा खेळण्यासाठी कुंडीला तीन ते चार भोकं असावीत. कुंडी जमिनीवर ठेवल्यावर तिची भोकं आणि जमीन यात थोडं अंतर राहील अशाच कुंडय़ा निवडाव्यात. त्यामुळे भोकं बुजण्याची आणि त्यामुळे पाण्याचा निचरा न होण्याची शक्यता कमी होते सुरवातीला खाली एक कागद टाका त्या नंतर त्यावर शेणखत मिक्स केलेली माती टाका. आणि मग रोप लावा. 

पाणी किती व कधी घालावे – तुळशीच्या रोपट्याला पाणी देताना खूप काळजी घ्यावी , कारण जास्त पाणी दिले तर रोप सुकून ,किंवा सडून  जाईल. थंडीच्या दिवसात ४-५ दिवसांनी एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात तर  पाऊस असेल तर पाणी देणे टाळावे. उन्हाळ्यात मात्र दिवसातून किमान एकदा मोजकेच पाणी द्यावे. 

वरच्या फांद्या व शेंडे तोडावेत –  तुळशीचे रोपटे लावून झाल्यानंतर एक आठवड्याचा अवधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे शेंडे कापावेत. . शेंडे कापावेत कारण त्यामुळे  फक्त शेंड्यांची वाढ न होता संपूर्णझाडांची नीट वाढ होते.  

मंजुळा आल्यानंतर – तुळशीची जर योग्य वाढ झाली तर तिला मंजुळा येतात. मंजुळा म्हणजेच बिया होय. या बिया खूप आरोग्यदायी असतात यांचे  अनेक उपयोग देखील आहेत.तुळशीची वाढ तीन महिन्यांत पूर्ण होते त्यावेळी रोपाची उंची अंदाजे दोन फूट असते, त्यानंतर तुळशीला फुलांचे तुरे म्हणजेच मंजिऱ्या येण्यास सुरुवात होते. तुळशीला फुले आल्यानंतर तिच्या फांद्या अधिक जून होतात. तसेच झाडाची वाढही थोडी मंदावते. कारण झाडातील सर्व अन्नघटक बी बनण्यासाठी वापरले जातात. म्हणूनच तुळशीच्या फुलांचे तुरे लहान असतानाच काढून टाकावेत-   काही वेळेस मंजुळा तुळशीच्या कुंडीतच पडतात व तेथे नवीन रोप उगवतात. पण ही उगवलेली रोपे त्या कुंडीतच ठेऊ नयेत. वेगळ्या कुंडीत ठेवावीत म्हणजे त्या एका रोपांची चांगली वाढ होते. जर मंजुळा सुकल्या असतील तर त्या काढून ठेवाव्यात  त्याचे अनेक फायदे आहेत. 

कीड  लागली तर  –  सावलीत लावलेल्या झाडांना कीड व रोगांची लागण होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत तुळशीवर रासायनिक कीटकनाशके वा औषधे फवारू नका. घरगुती उपाय करून पहा. हळदीचे पाणी, पाण्यात मिसळेले आंबट ताक झाडावर शिंपडा किंवा फवारा. सर्वात महत्वाचे म्हणजे निदान ३-४ तास ऊन मिळेल अशा ठिकाणी झाड हलवा. बाजारात नीम आयला स्प्रे देखील मिळतो तो देखील तुम्ही वापरू शकता.