fbpx

मुलीवर इंप्रेशन मारायला गेला आणि त्यातून तो करोडपती झाला

विशीतले करोडपती

मुलीवर इंप्रेशन मारायला गेला आणि त्यातून तो करोडपती झाला. वाचायला खूप विचित्र वाटतं ना? पण केरळच्या दीपकच्या बाबतीत हे सत्य आहे. त्याचं असं झालं. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकणारा दीपक एका कॉलेजच्या कट्ट्यावर बसला होता. बाजूने जाणाऱ्या मुलीवर इंप्रेशन पाडण्यासाठी दीपकने मित्राला एक प्रश्न विचारला. मित्राने त्याचं उत्तर गुगलवर शोधायला सांगितलं. पण या पठ्ठ्याकडे मोबाईल होता पण मोबाईलमध्ये इंटरनेट नव्हता तर गुगल कुठून करणार. एक प्रकारे बिचाऱ्याचा हिरमोड झाला. पण हाच हिरमोड त्याला करोडपती करुन गेला. तो क्षण त्याच्यासाठी युरेका क्षण होता. आपल्या सारखे कितीतरी मोबाईल वापरणारी माणसं असतील ज्यांच्याकडे इंटरनेट नाही पण त्यांना माहिती हवीय तर त्यांनी काय करायचं? या प्रश्नातूनच जन्मास आली इन्नोज टेक्नॉलॉजि प्रायव्हेट लिमिटेड.

Deepak Ravindran - Being Marathi
Deepak Ravindran – Being Marathi

केरळमधील कोरामंगला या छोट्या शहरात दीपक रविन्द्रन आणि त्याचे तीन मित्र, मोहम्मद हिसामुद्दीन, अश्विन नाथ, अभिनव श्री हे लाल बहाद्दूर शास्त्री नावाच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होते. वयाच्या अवघ्या विशीमध्ये या चौघांनी फक्त एक लाख रुपयांच्या बीजभांडवलावर २००९ मध्ये इन्नोज टेक्नॉलॉजि सुरु केली. आज या कंपनीची ऊलाढाल ६ कोटी असून पुढील आर्थिक वर्षामध्ये यामध्ये तब्बल १५० टक्क्यांनी वाढ करायचं उद्दीष्ट या चौघांचं आहे. ज्यांच्याकडे मोबाईल आहे पण इंटरनेट नाही त्यांना आवश्यक असलेली माहिती पुरविण्यासाठी या चौघांनी ‘एसएमएस ग्यान’ सुरु केलं. कंपनी सुरु झाली पण व्यवसाय कसा करायचा याचं ज्ञान मात्र कोणालाच नव्हते. केरळ मध्ये उद्योजकतेच्या संदर्भात माहिती देण्याचं कार्य आणि उद्योजकतेला वाव देण्याचं कार्य टेक्नॉलॉजि पार्क मध्ये केलं जातं. येथेच तात्पुरत्या कार्यलयाचा पत्ता देखील दिला जातो. दीपक आणि त्याच्या मित्रांनी टेक्नॉलॉजि पार्क मध्ये संपर्क साधला. अधिकृतरित्या उद्योजक संगोपन कार्यक्रमातून निर्माण झालेले हे भारतातील पहिले युवा उद्योजक होते.

Deepak Ravindran - Being Marathi
Deepak Ravindran – Being Marathi

इंजियनियरिंग पूर्ण केल्यानंतर पूर्णवेळ उद्योजक बनण्यासाठी आवश्यक ते कौशल्य आत्मसात व्हावे याकरिता सेंटर फॉर इनोव्हेशन, इनक्युबेशन आणि आंत्रप्रिन्युअरशिप मध्ये प्रवेश घेतला. तेथील तज्ज्ञांच्या मदतीने एसएमएस ग्यानचं लॉन्च करण्यात आलं. लॉन्चिंगसाठी त्यांनी भारती एयरटेलची सेवा घेतली. आज ‘एसएमएस ग्यान’ हे इन्नोज टेक्नॉलॉजिचं पहिलं अपत्य म्हणूनच ओळखलं जातं. एसएमएस ग्यानची सेवा हवी असल्यास ५५४४४ या क्रमांकावर मेसेज पाठविला जातो. त्यानंतर आपल्याला हवी असलेली माहिती क्षणार्धात आपल्या मोबाईल वर मिळते. ही माहिती एखाद्या नोकरी, फॅशन, सामान्य ज्ञान किंवा अगदी शब्दाच्या अर्थाशी सुद्धा निगडीत असू शकते. फक्त एका रुपयाच्या किमतीत ही माहिती तुम्हांला मिळते. जर तुम्ही ३० रुपये भरुन वर्गणीदार झालात तर अमर्यादीत माहिती तुम्ही मागवू शकता. आज भारतात ९० कोटी मोबाईलधारक आहेत. यातील बहुतांश लोकांकडे इंटरनेट नाही आणि हेच इन्नोज टेक्नॉलॉजिचे लक्ष्यित ग्राहक आहेत.

Deepak Ravindran - Being Marathi
Deepak Ravindran – Being Marathi

इन्नोज टेक्नॉलॉजि आजमितीस एक कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना एसएमएस ग्यानची सेवा पुरवित आहे. यापैकी ३५ लाख ग्राहक वर्गणीदार आहेत. सध्याचा उत्पादन खर्च ३० लाख रुपये आहे. चार वर्षांत या कंपनीची उलाढाल ६ कोटीपर्यंत गेली असून, निव्वळ नफ्याचं प्रमाण ६५ टक्के आहे. पुढील आर्थिक वर्षांत कंपनीची उलाढाल १५ कोटीपर्यंत नेण्याचा दीपक आणि त्याच्या मित्रांचा मानस आहे. माहिती मिळविण्यासाठी इन्नोज टेक्नॉलॉजिने विकिपिडिया, बिंग, वोलफ्राम अल्फा तसेच दळणवळण, आरोग्य, क्रीडा या क्षेत्रातील माहिती गोळा करणाऱ्या कंपनीसोबत करार केला आहे. इतकंच नव्हे तर तुम्ही तुमच्या इंटरनेट नसलेल्या मोबाईलवरून तुमचं फेसबुकचं अकाऊंट अपडेट करु शकता ट्विट करु शकता अगदी जीमेल वरुन मेल पण पाठवू शकता.

Deepak Ravindran - Being Marathi
Deepak Ravindran – Being Marathi

अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांमध्ये मोबाईलची देखील भर पडली आहे. मानसोपचारांच्या मते मोबाईलमुळे नोमोफोबिया हा आजार जडतो. हा आजार तुम्हांला आम्हांला कोणालाही असू शकतो. या आजाराची लक्षणं म्हणजे जरा मोबाईल हातात नसेल तर जीव कासावीस होणे. दर दोन मिनीटाला मोबाईल तपासणे. मोबाईलची बॅटरी संपेल याची भिती सतत मनात असणे. नेमकं माणसाच्या याच आजाराची नस दीपक आणि त्याच्या मित्रांना सापडली आणि इन्नोज टेक्नॉलॉजि जागतिक स्तरावर पोहोचली. म्हणूनच कोणताही विचार क्षुल्लक नसतो. कोणास ठाऊक तोच क्षुल्लक वाटणारा विचार एखाद्याला यशोशिखरावर घेऊन जाईल.
– प्रमोद सावंत

Deepak Ravindran - Being Marathi
Deepak Ravindran – Being Marathi

Source : http://busno181-pramod.blogspot.in/2014/06/blog-post_16.html