ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट बॉबी नसून तर ‘हा’ होता, फक्त एका ‘चॉकलेटसाठी’ केलं होतं चित्रपटात काम

कोरोनाच्या काळामध्ये गेल्या महिनाभरात बॉलीवुडने अनेक महान अभिनेते निरनिराळ्या आजारांमुळे गमावले आहेत. या महान कलाकारांपैकी एक म्हणजे चिरतरुण म्हणून ओळखले जाणारे ऋषी कपूर होय. चित्रपट सृष्टीतील चॉकलेट हिरो, निरनिराळ्या छटा आपल्या अभिनया मधून जिवंत करणारे अष्टपैलू अभिनेते व शेवट पर्यंत अभिनयामध्ये विविध प्रयोग करत राहिलेले, ऋषी कपूर यांचे गेल्या महिन्यात कॅन्सरशी झुंज देताना निधन झाले.

त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर लाँकडाऊन च्या काळामध्ये अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थिती मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मात्र सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांद्वारे ऋषी कपूर यांच्याशी निगडित अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला.

ऋषी कपूर यांची खरी ओळख बाँबी या चित्रपटातील देखण्या, रोमँटिक हिरो या प्रतिमेने झाली .मात्र बॉलीवूड मधील महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या काही घराण्यांपैकी पैकी एक असलेल्या कपूर खानदानामधून ऋषी कपूर पुढे आले होते.

राजकपूर हे भारतीय चित्रपट सृष्टी मधील द ग्रेट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते हे ऋषी कपूर यांचे वडील होते व या फिल्मी वारश्याला पुढे चालवण्याची सुरुवात ही ऋषी कपूर यांनी बॉबी या चित्रपटाद्वारे केली असेल अनेकांना वाटते मात्र त्या अगोदर ऋषी कपूर यांनी एक बालकलाकार म्हणून मेरा नाम जोकर या चित्रपटामध्ये काम केल्याचे त्यांच्या चाहत्यांना निश्चितच माहित असेल. मात्र इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट हा मेरा नाम जोकर या चित्रपटाच्याही अगोदर अभिनय केलेला श्री ४२० होय.

श्री ४२० या चित्रपटामध्ये ऋषी कपूर यांचे वडील राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट त्या काळी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. या चित्रपटातील गाणी सुद्धा तितकीच लोकप्रिय झाली होती. प्यार हुआ इकरार हुआ हे गाणे याच चित्रपटातील होते.

या चित्रपटातील प्यार हुआ इकरार हुआ या गाण्यामध्ये पावसाचे चित्रिकरण करण्यात आले आहे .या गाण्यातील एका प्रसंगामध्ये तीन मुले पावसातून जाताना दाखवली आहेत. या तीन मुलांपैकी  एक म्हणजेच ऋषी कपूर व इतर दोन मुलं म्हणजे त्यांचे भाऊ होय.ऋषी कपूर यांचा रुपेरी पडद्यावरील हा पहिला सीन होय.

ऋषी कपूर यांनी स्वतः या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला होता. हे चित्रीकरण पावसामध्ये केलेले होते त्यामुळे चालत असतांना मध्येच जोरात पाणी या मुलांच्या अंगावर टाकले जात असे व ऋषी कपूर आणि त्यांचे दोन भाऊ या प्रसंगामध्ये चालत असताना जोरात पाणी टाकले जाई व ते पाणी पडल्याबरोबर लहानगे ऋषी कपूर जोरजोराने रडायला लागत असत. खूप वेळा रिटेक झाले व तो प्रसंग काही केल्या चित्रित होईना.

शेवटी यावर काहीतरी उपाय काढण्यासाठी नर्गिस जी पुढे सरसावल्या आणि त्यांनी ऋषी कपूर यांना प्रेमाने जवळ घेऊन सांगितले की जर त्यांनी हा सीन न रडता पूर्ण केला तर तर त्या चॉकलेट देतील. चॉकलेटच्या आमिषाने ऋषी कपूर न रडता सीन देण्यासाठी तयार झाले व पावसाचे पाणी अंगावर पडले तेव्हा ते रडले नाही आणि तो सीन अगदी व्यवस्थितपणे चित्रित झाला .ऋषी कपूर यांना नर्गिस जींनी कबूल केल्याप्रमाणे चॉकलेट सुद्धा दिले. आयुष्यामधील पहिल्या सीनमध्ये भांबावलेल्या ऋषी कपूर यांनी  नंतरच्या आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्तमोत्तम भूमिका साकारल्या.