…म्हणून लता मंगेशकर अविवाहित राहिल्या

गानसम्राज्ञी लता मंगेशकर अविवाहित राहण्यामागे ‘ही’ आहे चर्चा

बॉलिवूड आणि त्यातील कलाकार यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीतही चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येते. मग ते कधी अभिनेता सलमान खानच्या लग्नाविषयी असो कि अभिनेत्री रेखा कुणाच्या नावाने कुंकू लावतात याविषयी असो. बॉलिवूडच्या चाहत्यांना अजून एक नेहमी सतावणारा प्रश्न म्हणजे ‘भारताच्या गानकोकिळा अर्थात गायिका लता मंगेशकर अविवाहित का राहिल्या?’ हा आहे. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात याच प्रश्नाच्या अनुषंगाने जाणून घेऊयात याविषयीची खास माहिती.

लतादीदी अविवाहित का राहिल्या याविषयी एका मुलाखतीत त्यांनी स्वतः माहिती दिली होती. त्या म्हणाल्या, ‘खरं तर घरातील सर्व सदस्यांची जबाबदारी माझ्यावर होती. अशा परिस्थितीत मला माझ्या लग्नाची कल्पना आली तरी ती अंमलात आणणे शक्य नव्हते. मी अगदी लहान वयातच काम करण्यास सुरवात केली. मी खूप काम करायचे. लहान भावंडांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना त्यांच्या मार्गाला लावल्यावर लग्नाचा विचार करावा असं मला वाटलं. मग माझ्या बहिणींचे लग्न झाले. त्यांना झालेली मुलं सांभाळता सांभाळता माझ्या लग्नाचं वय आणि वेळ दोन्हीही निघून गेलं

लतादीदींनीं केलेला हा खुलासाच त्यांच्या अविवाहित राहण्यामागचं कारण मानला जातो. मात्र त्यांच्या अविवाहित राहण्याविषयी अनेक मतप्रवाह, अफवा तसेच इतरही अनेक चर्चा माध्यमांत वेळोवेळी त्याकाळापासून तर आजतागायत झडत आल्या आहेत. त्यापैकीच एक चर्चा पुढीलप्रमाणेदेखील ऐकायला मिळते.

राजस्थानमधील डुंगरपूर राजघराण्यातील राजसिंह आणि लता मंगेशकर यांच्या नात्याविषयी त्याकाळी अनेकवेळा माध्यमांमधून चर्चा होत होती. 1 डिंसेबर 1935 रोजी राजपूतानाच्या डूंगरपूर राजघराण्यात जन्मलेल्या राजसिंह यांची मैत्री लता मंगेशकर यांच्या भावाशी होता. ते दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे. पुढे राजसिंग वकिलीच्या शिक्षणासाठी मुंबईला आले आणि त्यांची भेट पुन्हा मित्र असलेल्या लता मंगेशकर यांच्या भावाशी झाली. 

यानिमित्ताने राजसिंग यांचे लताजींच्या घरी येणेजाणे वाढले आणि त्यांची मैत्री लताजींशी झाली. दोघेही एकमेकांना पसंद करू लागले. राजसिंह यांनी आपल्या आईवडिलांना दिलेल्या वचनामुळे लताजी आणि त्यांचा विवाह होऊ शकला नाही असे म्हटले जाते. ‘सामान्य घरातील मुलगी राजघराण्यात सून म्हणून आणणार नाही’, असे ते वचन होते. याच कारणामुळे लताजी आणि राजसिंह त्यांच्यातील नात्याला नाव देऊ शकले नाही असे सांगितले जाते.

राजसिंह यांचा 12 सप्टेंबर, 2009 रोजी देहांत झाला. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. यातून त्यांनी आईवडिलांना दिलेले वचनही पाळले आणि लताजींसाठी ते आयुष्यभर अविवाहिताही राहिले अशा चर्चा होऊ लागल्या. त्यांचे लताजींसोबत शेवटपर्यंत मधुर संबंध राहिले असेही सांगितले जाते. राजसिंह राजकारणाबरोबरच क्रिकेटशीही संबंधित होते. ते 16 वर्षापर्यंत राजस्थान रणजी संघाचे सदस्य होते त्याचप्रमाणे अनेक वर्ष बीसीसीआयशीदेखील निगडित होते. भारतीय क्रिकेट टीमच्या अनेक दौऱ्यांमध्ये त्यांनी व्यवस्थापकाची भूमिका निभावली होती.