भारतीय चित्रपट सृष्टी संपूर्ण जगभरातील चित्रपट क्षेत्रामध्ये योगदान देण्यामध्ये अग्रस्थानी राहिली आहे. भारतीय चित्रपट सृष्टी अर्थात बॉलिवूडचा इतिहास निरनिराळ्या टप्प्यांवर अनेक तथाकथित परंपरा, प्रथा ,पद्धतींना छेद देत सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा बनला आहे. भारतीय चित्रपटसृष्टी ही समाजव्यवस्थेशी नाळ जोडलेली आहे. म्हणूनच भारतीय चित्रपट सृष्टीचे सुरुवातीचे स्वरुप पुरुषसत्ताक होते कारण त्याकाळी भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्याची स्त्रियांना परवानगी नव्हती.

अशा काळात सुद्धा काही स्त्रियांनी बंडखोरी करून चित्रपट सृष्टी मध्ये प्रवेश केला. मात्र या ठिकाणी सुद्धा त्यांना मुख्य भूमिके मध्ये काम करत असताना चित्रपटातील नायकाच्या बरोबरीने फुटेज मिळण्यासाठी संघर्ष करावाच लागला. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय चित्रपट नायकप्रधान असत ज्यामध्ये नायिका या केवळ प्रेमगीत गाण्यासाठी किंवा नायकाच्या पाठीमागे उभे राहणाऱ्या प्रेमिके साठी जणूकाही औषधाला त् घेतल्या जात.

मात्र हळूहळू स्त्रीप्रधान विषय व भूमिका सुद्धा भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये विस्तारू लागल्या. स्मिता पाटील, शबाना आझमी यांच्यासोबत सध्याच्या काळातील दीपिका पदुकोण,कंगना रणौत, तापसी पन्नू या नायिकांना  स्त्रीकेंद्री विषयांच्या  चित्रपटांसाठी ओळखले जाते. यामध्ये नायका पेक्षा नायिका हि जास्त कणखर व अधिक फुटेज असलेली  दाखवली जाते. म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीने काळाच्या ओघात प्रस्थापित परंपरांना  धक्का दिला.

अशीच एक धारणा  म्हणजे बॉलीवूड मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने  लग्न केले तर तिचे करिअरच संपुष्टात येते. या धारणे पायी अनेक अभिनेत्री या  लग्न व संसारा पासून चार हात अंतर राखूनच राहिल्या किंवा काही दशकांपूर्वीच्या अभिनेत्री ज्यांनी करिअरच्या प्रसिद्धी, यशाच्या शिखरावर असतांना लग्न केले त्यांना केवळ लग्न केले  म्हणून आपल्या करिअरला अलविदा ही करावे लागले.

सध्याच्या काळात मात्र अभिनेत्री लग्नानंतर देखील तितक्याच जोमाने चित्रपटांमध्ये काम करताना व यशस्वी सुद्धा होताना दिसतात. प्रत्येक काळामध्ये प्रचलित धारणांना टक्कर देणारे एक तरी उदाहरण हे नक्कीच अस्तित्वात असते.  आज आपण अशा अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जिने अगदी लहान वयातच विवाह केला व विवाहानंतर सुद्धा बॉलीवूड मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. या अभिनेत्रीचे नाव मौसमी चॅटर्जी होय.

1948 साली कलकत्ता येथे जन्मलेल्या मौसमी चॅटर्जी यांचे वडील प्रांतोष चटोपाध्याय आर्मी ऑफिसर होते तर त्यांचे आजोबा सुद्धा न्यायाधीश होते. अगदी शालेय वयापासूनच मौसमी चटर्जी यांनी अभिनयाला सुरुवात केली .बंगाली चित्रपट बालिकावधू पासून मौसमी चटर्जी यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. बालिकावधू मधील यांच्या अभिनयाला चहात्यांची खूप वाहवा मिळाली. मात्र त्यानंतर अगदी लहान वयातच मौसमी यांचा विवाह हेमंत कुमार या प्रसिद्ध गायकांच्या मुलगा जयंत यांच्यासोबत झाला. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी एका कन्या रत्नाला ही जन्म दिला. मौसमी सांगतात की त्यावेळी सगळ्यांना माझे करियर संपुष्टात आले असेच वाटत होते.

कारण एखाद्या अभिनेत्रीने लग्न करणे म्हणजे तिचे करिअर संपले असेच मानले जात असे आणि मौसमी यांना तर इतक्या लहान वयात एक मुलगी सुद्धा होती. आपल्या  अभिनयाच्या जोरावर एका मुलीची आई बनल्यानंतर सुद्धा मौसमी यांनी चित्रपट सृष्टी मध्ये कमबॅक केले आणि त्यांना मुख्य भूमिका सुद्धा मिळाल्या. मौसमी चटर्जी यांनी त्यांच्या काळातील आघाडीचे अभिनेते अमिताभ बच्चन, शशि कपूर ,संजीवकुमार,विनोद मेहरा यांच्यासोबत काम केले .कच्चे धागे ,जहरीला इंसान, अंगूर संतान,पिकू, घर एक मंदिर ,दासी, जल्लाद ,फुल खिले है गुलशन गुलशन ,मांग भरो सजना,  यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करताना मौसमी चटर्जी यांना त्या विवाहित असल्यामुळे कोणताही अडथळा आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये वैयक्तिक आयुष्याचे ही संतुलन साधणा-या मौसमी चटर्जी यांना 2019 मध्ये त्यांच्या मुलीच्या मृत्यूचे दुःख सहन करावे लागले. मौसमी चटर्जी यांची मुलगी पायल डीकि सिन्हा  2018 साली कोमामध्ये गेली होती व त्या आधीपासून ती आजारी होती. मुलीच्या मृत्यूनंतर मौसमी चटर्जी आणि त्यांचे पती जयंत  यांनी जावई डिकि यांनी आपल्या मुलीच्या तब्येतीची योग्य ती काळजी न घेतल्याचा आरोप केला होता.मात्र हे आरोप खोटे असल्याचे सांगत त्यांनी मौसमी चटर्जी यांच्यावरच मानहानीचा दावा दाखल केला होता.