सध्या दूरदर्शन वर पुन्हा एकदा प्रसारित होणा-या  रामायण या मालिकेने आताच्या काळात देखील लोकप्रियतेचे ,टीआरपी चे सर्व विक्रम तोडले आहेत. आज जागतिक स्तरावरील कोणत्याही टेलिव्हिजन शोच्या टीआरपी पेक्षा सर्वात जास्त टीआरपी खेचण्याचा विक्रम रामायण या मालिकेने केला आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा रामायण मालिकेचे  हे गारुड प्रेक्षकांवर इतके प्रभावी ठरत आहे तर ऐंशीच्या दशकामध्ये या मालिके बद्दल प्रेक्षकांमध्ये किती जास्त चर्चा असेल याचा अंदाज बांधणे आवाक्या पलीकडचे आहे .

रामायण या मालिकेच्या लोकप्रियतेचे गमक हे या मालिकेच्या निर्मिती च्या साठी केले गेलेले संशोधन आणि साईन केलेली अगदी चपखल अशी स्टार कास्ट हे आहे.रामानंद सागर यांनी रामायण या मालिकेतील प्रत्येक पात्रासाठी चा कलाकार हा अगदी तावून सुलाखून मगच निश्चित केला होता. रामायण मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान चे अनेक किस्से आज सुद्धा खूप लोकप्रिय आहेत.

या मालिकेमधील पात्रांशी निगडीत अनेक कथा आजही चर्चिल्या जातात .आज आपण रामायणामधील एकाजोडीबद्दल जाणून घेणार आहोत जे प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा पती-पत्नी होते.या मालिकेमध्ये भगवान श्रीराम यांचे पितामह राजा दशरथ आणि माता कौशल्या यांची भूमिका अनुक्रमे बाळ धुरी आणि आणि ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांनी साकारली होती. फार कमी लोकांना माहिती होते की बाळ धुरी आणि जयश्री गडकर हे प्रत्यक्ष आयुष्यातही पती-पत्नीच होते.बाळ धुरी आणि जयश्री गडकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार होते .जयश्री गडकर यांनी आपल्या संपूर्ण फिल्मी करियरमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या व त्या चाहत्यांकडून अक्षरशः डोक्यावर सुद्धा घेतल्या गेल्या होत्या.

रामायण या मालिकेतील जयश्री गडकर यांनी साकारलेल्या माता कौशल्याच्या भूमिकेला लोकांकडून खूप पसंत केले गेले. मात्र त्या अगोदरपासून जयश्री गडकर या मराठी चित्रपट सृष्टीतील त्याकाळच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी  एक होत्या.मराठी सिनेमामध्ये जयश्री गडकर म्हणजे एक यशस्वी अभिनेत्री व अभिनयाचे खणखणीत नाणे हेच समीकरण होते. त्यांनी निरनिराळ्या चित्रपटांमध्ये अगदी प्रेमिकेच्या भूमिकेपासून ते सोज्वळ भूमिकांत पर्यंत सर्वच भूमिका केल्या. असे असले तरीही हिंदी चित्रपट सृष्टीला किंवा अभिनय क्षेत्राला जयश्री गडकर या त्यांच्या रामायणामधील कौशल्याच्या भूमिकेचे मुळेच माहिती झाल्या.जयश्री गडकर यांचा जन्म कर्नाटकामधील कारवार येथे 1942 साली झाला.

अभिनयामध्ये सुरुवातीपासूनच जयश्री गडकर यांना गती होती व वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी दिसतं तसं नसतं या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. इथून सुरू झालेला जयश्रीताईं चा प्रवास हा निराळ्या भूमिका द्वारे अधिकच झळाळत गेला.साधी माणसं ,मोहित्यांची मंजुळा, वैशाखवणवा ,सासु असावी  अशी ,माणिनी, अवघाची संसार असे एकापेक्षा एक सरस यशस्वी चित्रपट जयश्री ताईंच्या खात्यावर आहेत .

जयश्री ताईंना मानिनी,साधी माणसं या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.जयश्री गडकर यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा केवळ हिंदी किंवा मराठी भाषे पुरता सीमित न राहता तमिळ ,गुजराती, तेलगु या भाषांमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 2008 साली जयश्रीताई यांना हृदयविकाराच्या धक्क्यामुळे देवाज्ञा झाली व बाळ धुरी यांच्या सोबतचा त्यांचा जोडीदार म्हणून असलेला प्रवास संपुष्टात आला.