जगभरामध्ये कोरोनाचे संकट धुमाकूळ घालत असताना बॉलीवूड वर मात्र या आठवड्यात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील दोन चतुरस्त्र अभिनेते म्हणजेच इरफान खान आणि ऋषी कपूर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ऋषी कपूर हे गेल्या कित्येक पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. ऋषी कपूर यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला एक रोमँटिक हिरो म्हणूनच प्रवेश केला होता. देखणे व राजबिंडे रूप आणि त्याच्या जोडीला काळानुसार केलेली वेशभूषा याच्या आधारे स्क्रीनवर आपली रोमांटिक हिरो ची प्रतिमा जिवंत करणाऱ्या  या अभिनेत्याचे आँफस्क्रीन सुद्धा त्या काळातील तरुणांनी अनुकरण केले आहे .

ऋषी कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याशी निगडीत अनेक किस्से व आठवणी चित्रपट सृष्टीतील व्यक्तींकडून सांगितल्या जात आहेत.करण जोहर यांनी आपल्या आत्मचरित्रात वर्णन केलेल्या ऋषी कपूर यांची दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या हिंदी चित्रपट सृष्टीतील ब्लॉकबस्टर हिट सिनेमाशी निगडीत आठवण सध्या व्हायरल होत आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ही शाहरुख खान आणि  काजोल यांची लव्ह स्टोरी भारताप्रमाणेच अनिवासी भारतीयांना सुद्धा खूप भावली होती .आजही दिलवाले दुलहनिया ले.जाएंगे चे प्रयोग काही चित्रपटगृहांमध्ये केले जातात. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाच्या स्टार कास्ट मध्ये ऋषी कपूर हे नव्हते मात्र तरीही दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटासोबत ऋषी कपूर यांचे अनोखे नाते आहे. हे नाते नक्की काय होते हे आज आपण जाणून घेणार आहोत.

 करण जोहर या आठवणी विषयी आपल्या आत्मचरित्रात सांगतात की त्यावेळी ते आदित्य चोप्रा यांना दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाशी निगडित वेशभूषेसाठी सहाय्य करत होते. या चित्रपटातील न जाने मेरे दील को क्या हो गया या गाण्याच्या शेवटी शाहरुख खानला घालण्यासाठी एक ड्रेस आवश्यक होता. या गाण्यामध्ये शेवटी काजोलला शाहरुखला आपल्यासमोर असल्याचा भास होतो आणि मग ती भानावर येऊन आपल्या घराच्या आत मध्ये जाते.

या ड्रेसच्या निवडीच्या वेळी काँस्च्युम साठी जे बजेट शिल्लक होते त्या बजेटमध्ये एखादा महागडा ड्रेस विकत घेणे शक्य नव्हते. मग अशा परिस्थितीमध्ये करण जोहरने मुंबईमधील स्टुडिओज मध्ये पडलेल्या वेशभूषांच्या पेटयांना जणू काही एखाद्या खजिन्याप्रमाणे शोधण्यास सुरुवात केली आणि या मधून अगदी जादू घडल्याप्रमाणे एक लाल आणि पांढऱ्या रंगाच्या रेषांचे स्वेटर निघाले.

हे लाल आणि पांढऱ्या रेषांनी सजलेले स्वेटर म्हणजेच ऋषी कपूर आणि श्रीदेवी यांच्या रोमान्सचा नजराना असलेल्या चांदणी चित्रपटांमध्ये ऋषी कपूर यांनी घातलेले स्वेटर होय.ऋषी कपूर यांनी चांदणी या चित्रपटांमध्ये हे स्वेटर घातल्यानंतर त्या पिढीतील तरुणाईमध्ये स्टाइल स्टेटमेंट म्हणून अशा प्रकारचे स्वेटर घालण्याचा ट्रेंड आला होता.

करन जोहर यांच्या हाती हे स्वेटर आल्यानंतर त्यामध्ये एक छिद्र होते जे करण जोहर यांनी रफू करुन घेतले आणि हेच स्वेटर डीडीएलजे या चित्रपटातील गाण्या मध्ये शाहरूखसाठी निवडले गेले. शाहरुख आणि आदित्य चोप्रा या दोघांनाही या गाण्यातील स्वेटर मधला शाहरूखचा लूक खूपच भावला होता व तो चहात्यांच्या सुद्धा पसंतीस उतरला याची पावती म्हणजे या चित्रपटानंतर पुन्हा एकदा तरुणांनी  स्टाईल स्टेटमेंट म्हणून स्वेटर घालण्याचा ट्रेंड सुरू केला.