#आंतराष्ट्रीय कॉफी दिवस:- कॉफी आणि त्याचे प्रकार

मूळची इथियोपियात जन्म झालेली, काळसर तपकिरी रंगाची, थोडीशी कडवट चवीची, ती समोर आली की, मनाला खरोखर संजीवनी मिळते. कोण बरं ती? तर गोड-कडवट चवीने जिव्हातृप्ती देणारी नेहमीच हवीहवीशी वाटणारी ‘कॉफी. तरुणाईत जसं चहाप्रेम उतू जातं तसंच कॉफीप्रेम देखील असतं. चहाप्रेमींमध्ये जसा सकाळी कडक चहा, मित्रांमध्ये चर्चा करायला फक्कड चहा, दुपारची झोप उडवायला लज्जतदार चहा हवा. तसंच कॉफीप्रेमींना सकाळी हॉट कॉफी, मीटिंगला कोल्ड कॉफी, फिल्टरकॉफी ही हवीच.
आंतराष्ट्रीय कॉफी दिवस दरवर्षी 01 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. कॉफी व्यवसायात गुंतलेल्या सर्वांच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस दरवर्षी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश कॉफी या पेयाला प्रोत्साहन देणे आहे. या दिवसाचा मुख्य हेतू म्हणजे अशा सर्व लोकांना मान सन्मान मिळवून देणे जे लोक शेतातून दुकानात कॉफी पोचवण्यासाठी खूप परिश्रम करतात. २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय कॉफी संघटनेने इटलीमधील मिलान येथे पहिला जागतिक कॉफी दिवस आयोजित केला होता.

कॉफीच्या लोकप्रिय प्रकारांबद्दल थोडेसे :

१. एस्प्रेसो : हा प्रकार कॉफीचे प्राथमिक रूप आहे असे म्हणता येईल. यामध्ये कॉफीच्या बिया दळून, त्यावर गरम पाणी घालून कॉफीच्या बियांचा अर्क काढला जातो. हा अर्क जास्त ‘कॉन्सन्ट्रेटेड’ असल्यामुळे अगदी थोड्या प्रमाणात ( साधारणतः ३० मि.लि ) सर्व्ह केला जातो. त्याचमुळे एस्प्रेसो साठीचे कपदेखील आकाराने सामान्य कपापेक्षा लहान असतात. या कॉफीमध्ये दुधाचा वापर केला जात नाही.

२. माकियातो : ह्या प्रकारच्या कॉफी मध्ये आधी एस्प्रेसो घालून त्यावर दूध घुसळून तयार केलेला ‘फोम’ किंवा फेस घातला जातो. दुधाच्या फोममुळे कॉफी तितकी कॉन्सन्ट्रेटेड स्वरूपात राहात नाही.

३. लाटे : ‘लाटे’ ह्या कॉफीच्या प्रकारामध्ये कपमध्ये आधी एस्प्रेसो घातली जाते, त्यावर गरम दूध घालून, सगळ्यात वर दुधाचा फोम घातला जातो. ‘लाटे’ गरम किंवा गार ( आईस्ड ) ह्या दोन्ही प्रकारांमध्ये मिळते. ‘लाटे आर्ट’ हा प्रकारही खूप लोकप्रिय आहे. त्यामध्ये दुधाचा फोम कॉफीवर घालताना वेगवेगळी सुंदर डिझाईन कॉफीवर तयार केली जातात.

४. फ्लॅट व्हाईट : यामध्ये एस्प्रेसो आणि त्यावर गरम दूध एवढे दोनच घटक असतात. त्यावर दुधाचा हलका फोम असतो.

५. कॅपुचिनो : हा कॉफीचा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय म्हणता येईल. यामध्ये सगळ्यात आधी एस्प्रेसो तयार करून कपमध्ये घातली जाते, त्यावर गरम दूध, त्यावर दुधाचा फोम आणि सगळ्यात वर कोको पावडर किंवा चॉकलेट पावडर भुरभुरली जाते.

६. मोका : ह्या प्रकाराला “चॉकलेट कॉफी” म्हणता येईल, कारण या कॉफी मध्ये आधी एस्प्रेसो घातली जाते आणि त्यावर हॉट चॉकलेट घातले जाते. त्यावर गरम दूध घातले जाते.