Featured

गुलकंद खाण्याची योग्य पद्धत कोणती? गुलकंदामुळे काय फायदे होतात जाणून घ्या

गुलकंद खाण्याची योग्य पद्धत कोणती? गुलकंदामुळे काय फायदे होतात जाणून घ्या

गुलकंद खाण्याच्या आरोग्यदायी फायद्यांविषयी नेहमी सांगितले जाते. मात्र अनेकांना याविषयी माहिती नसते. त्याचप्रमाणे गुलकंद खाण्याविषयीची पद्धत याविषयी अनेकजण अनभिज्ञ असतात. गुलकंद खाण्याची योग्य पद्धत आणि गुलकंदाच्या सेवनामुळे शरीराला होणारे फायदे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत.

गुलकंद म्हणजे काय : गुलकंद म्हणजे गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांपासून बनवलेला एक प्रकारचा मुरंबा होय. यामध्ये साखर मिसळून याला गोडवा प्राप्त होतो. गुलाबाच्या फुलाचा सुगंध आणि मुरंब्यातील गोडवा यामुळे गुलकंद खावासा वाटतो. उन्हाळ्यात याचे जास्त सेवन केले जाते. गुलकंद खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :

सुंदर त्वचा : गुलकंदामध्ये अनेक औषधी गुण असल्यामुळे याचे सेवन केल्याने त्वचेला अनेक फायदे होतात. गुलकंदाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील डाग, मुरूम, फोड दूर होतात. तसेच त्वचेला मुलायमपणा मिळतो. त्वचा तजेलदार आणि चमकदार बनते.

वजन कमी करण्यासाठी : वजन कमी करण्यासाठी गुलकंदाचा उपयोग होऊ शकतो. कमी फॅट असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. गुलकंद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुलाब पाकळ्यांमध्ये फॅट कमी असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

तोंडातील छाले दूर होतात : तोंड येणे किंवा तोंडात छाले होणे हि समस्या अनेकांना उद्भवते. यामुळे अन्नसेवन करताना किंवा तिखट पदार्थ खाताना तोंडाची प्रचंड आग होते. क जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तोंडात छाले होतात असे सांगितले जाते. गुलकंदात क जीवनसत्व आढळत असल्यामुळे याचे सेवन केल्यास हा त्रास दूर होऊ शकतो.

डोळ्यांसाठी : डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठीदेखील गुलकंद खाणे फायदेशीर आहे. गुलकंदाचा गुणधर्म हा शीत असतो. त्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच परंतु डोळ्यांनादेखील याचा फायदा होतो. विशेषतः उन्हाळ्यामध्ये याचा जास्त लाभ दिसून येतो. डोळ्यांची सूज आणि डोळे लाल होणे यावर गुलकंद हा प्रभावी इलाज ठरू शकतो.

इतर फायदे : गुलकंद खाण्याचे वर नमूद केलेल्या फायद्यांव्यतिरिक्त इतरही अनेक फायदे आहेत. गुलकंद खाल्ल्याने मानसिक आणि शारीरिक थकावट दूर होते. तसेच गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास तोसुद्धा कमी होतो. गुलकंद स्मरणशती वाढवण्यासाठीदेखील फायदेशीर आहे.

गुलकंद सेवनाची पद्धत :

गुलकंद ब्रेडसोबत खाल्ला जाऊ शकतो.
गुलकंदाला दुधात उकळून पिले जाऊ शकते
गुलकंद नुसता सुद्धा खाल्ला जाऊ शकतो.
उन्हाळ्यामध्ये पाण्यासोबत मिसळून गुलकंद खावा.
गुलकंदाचे लाडू बनवूनदेखील खाल्ले जाऊ शकतात.
दिवसभरात १-२ चमचे गुलकंद खाणे योग्य ठरते.

(Disclaimer : ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या वरील आरोग्यविषयक लेखात दिलेली माहिती वैद्यकीय सल्ल्याला पर्याय होऊ शकत नसून, ही माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. यामध्ये सांगितलेले उपचार किंवा सल्ला अंमलात आणण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)