नवरात्रामध्ये गरबा म्हणजे रास दांडिया हा अलीकडच्या काळात अपरिहार्य भाग झाला आहे. गुजरातमधलं नवरात्रात तसंच इतर धार्मिक उत्सवांमध्ये केलं जाणारं हे पारंपरिक नृत्य आता देशभर लोकप्रिय झालं आहे.
गणपती झाले की वेध लागतात नवरात्रीचे आणि नवरात्र म्हटलं की आठवतो तो नऊ दिवस खेळला जाणारा गरबा किंवा दांडिया हा नृत्यप्रकार. सगळे जण नवरात्रीमधील रास – दांडियाची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. गणपती गेले की नवीन दांडिया, खास रास-गरब्याचे नवीन कपडे आणि गरबा-दांडिया खेळण्यासाठी वाजवली जाणारी गाणी इत्यादी गोष्टींना उधाण आलेले असते.

दांडिया किंवा गरबा हा मूळचा गुजरात राज्यातील उत्सव म्हणून प्रचलित आहे. याच्या माध्यमातून देवीची आराधना केली जाते. शहरापुरताच मर्यादित असलेला उत्सव आता तो ग्रामीण भागातही पोहोचला असला तरी या महोत्सवाचे मात्र गेल्या काही वर्षांत शहरांमध्ये स्वरूप बदलले आहे. पूर्वी देवीच्या मंदिरासमोर तिची आराधना करण्याच्या उद्देशाने त्या परिसरात राहणाऱ्या किंवा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या महिला एकत्र येऊन गरबा करीत होते. मात्र, आता या महोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आले आहे.

दांडियासाठी पेहराव

धोती, कुर्ता, घागरा, चेनिया, केडिया आणि दांडिया ही खास दांडियासाठी वापरात येणारी वेशभूषा. गुजरातमधील प्रसिद्ध घागरा चोली, चेनिया चोली तर राजस्थानातील केडिया, कोटी त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ही वेशभूषा गरब्यासाठी विशेष प्रसिद्ध असून आता शहरातील विविध भागात ते विक्रीला आले असून त्याची विक्री जोमात सुरू आहे. अनेक ठिकाणी ते भाडय़ानेही मिळत आहे. गुजराती पद्धतीचे घागरा चोली, चेनिया चोली १ हजार रुपयापासून ते ३५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. महिलांचे घेरदार पोशाख गोलाकार पद्धतीने केलेल्या नृत्याची अधिकच शान वाढवतात. पारंपरिक दागिनेदेखील घातले जातात, बिंदी, झुमके, कडे, कंबरपट्टा, माळ, पैंजण अशा दागिन्यांनी महिला नटतात व नवरात्री दरम्यान त्यांच्या सौंदर्यात ह्या मुळे विशेष भर पडते

आजकालचा गरबा

आजकाल गरब्याचा ट्रेण्ड मोठय़ा प्रमाणावर दिसून येतो व या पारंपरिक लोकनृत्याला व्यावसायिक, ग्लॅमरस स्वरूप प्राप्त झालं आहे. नवरात्रीच्या आधी गरबा शिकण्याचे वर्ग घेतले जातात व लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सगळेच जण या वर्गाचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेताना दिसत आहेत. गुजराथी समाजापुरता हा सण मर्यादित राहिला नसून बहुभाषिक, आंतरदेशीय लोकसुद्धा उत्साहाने या सोहळ्यात सामील होताना दिसत आहेत. समाजातील एकजुटीसाठी लोकसंस्कृती कशी पोषक ठरते, याचा हा जणू दाखलाच आहे. मोठय़ा पटांगणावर होणाऱ्या ‘गरबा डीजे’चं प्रमाण झपाटय़ाने वाढू लागलंय. काही ठिकाणी तर प्रतिदिवशी १०००-२००० रु. भरूनही गरबा खेळायला जाणाऱ्या लोकांच्या संख्येत भर पडत आहे