नवरात्री २०१९:- भोंडला म्हणजे नक्की काय असते बरं ?

0
108

नवरात्रीला सुरुवात झाली आहे. दांडिया गरबा यासोबतच नवरात्रीमध्ये एक विशेष खेळ खेळला जातो तो म्हणजे भोंडला.कदाचित तुमच्यापैकी कित्येकांना हा भोंडला म्हणजे काय हे माहीत नसेल. चला तर मग भोंडला म्हणजे काय, हे जाणून घेऊया.
आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते आणि छोट्या – मोठ्या मुलींच्या आनंदाला उधाण येते. कारण माहीत आहे ? त्या दिवसापासून त्यांच्या आवडत्या ह्दग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात झाली, कि त्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत मुली ‘हदगा’ खेळतात. याला ‘भोंडला’ असेही म्हणतात. हा सण मुलींचा विशेष आवडता आहे. या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. म्हणूनच हत्तीचं चित्र काढून घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी भोंडला खेळला जातो. पाऊस परत जायची वेळ आली असल्याने ढग मोठयाने आवाज करू लागतात. याला ‘हत्तीचा पाऊस’ असं म्हणतात. म्हणूनच हत्तीचं चित्र काढून घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी भोंडला खेळला जातो.

भोंडल्याला ‘हादगा’ किंवा ‘भुलाबाई’ असंही म्हटलं जातं. असं असलं तरीही ‘भोंडला’ हे नाव सर्वपरिचित आहे. हा भोंडला मैदानात, हॉलमध्ये, चौकात किंवा गच्चीत खेळला जातो. त्यासाठी देवी बसवण्याचीही गरज नसते. एका पाटावर मधोमध हत्तीच चित्र काढलं जातं. त्याच्या वर चंद्र आणि सूर्याचीही चित्रं काढली जातात. ही सगळी चित्रं तांदळाने भरली जातात. हा पाट मधोमध ठेवला जातो. भोंडला खेळायला येणारी काही मुलं खाऊचे डबे आणतात. आणलेले खाऊचे डबे त्या पाटाभोवती ठेवले जातात. सगळी मुलं एकमेकांचा हात धरून फेर धरतात.

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी

पारव घुमतंय पारावरी

या गाण्याने भोंडल्याला सुरुवात होते. एकामागून एक गाणी म्हटली जातात.

अशी अनेक गाणी म्हणत भोंडला साजरा केला जातो. मग ज्यांचा खाऊ असतो ती मुलं किंवा मुली मधे येतात. बाकीचे सगळे आजूबाजूला बसतात. त्यांचा खाऊ ओळखायचा असतो. तिखट की गोड, अशी विचारणा होते. एकेक पदार्थाची नावं घेत खिरापत ओळखायची चढाओढ सुरू होते. काही काही ठिकाणी पहिल्या दिवशी एकच खाऊ असतो. दुस-या दिवशी दोन, तिसऱ्या दिवशी तीन.. असं करत करत शेवटच्या दिवशी भरपूर मुलांकडे खाऊ असतात. जो मुलगा बरोबर खाऊ ओळखतो त्याच्यापासून ती खिरापत वाटायला सुरुवात केली जाते.
आजही आधुनिक कामात वेगवान जीवन जगताना स्पर्धा-ताणतणाव यातून मुक्त होण्यासाठी आणि दोन घटका आनंद प्राप्तीसाठी ‘पारंपरिक पद्धतीचा भोंडला’ नव्या युगात तरुण स्त्रियांनाही आनंद देत असतो आणि म्हणून अनेक सार्वजनिक ठिकाणी भोंडला साजरा होत आहे.