…म्हणून दुपारच्या वेळी झोप घेणे आहे फायदेशीर…

दुपारच्या वेळी झोप घेण्याची सवय अनेकांना असते. दुपारच्या वेळी वामकुक्षी घेणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे असे मानले जाते मात्र याचे काही तोटे सुद्धा शरीराला होतात हे सुद्धा सिद्ध झाले आहे. दुपारच्या वेळी वामकुक्षी घेणे हे लहान मुलांच्याच नव्हे तर मोठ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप उपकारक आहे. दुपारच्या वेळेस झोप येत असेल तर त्यामध्ये आळस येण्याची भीती न बाळगता एक डुलकी घेणे कधीही चांगलेच होय. दुपारच्या वेळी थोडा वेळ झोप घेतल्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी कामगिरी चांगली होते, एकाग्रता वाढते ,मूड चांगला होतो, कल्पना शक्तीमध्ये वाढ होते यांसारखे अनेक फायदे दुपारच्या वेळी झोप घेतल्यामुळे होतात. आज आपण वामकुक्षी मुळे शरीराला होणारे एकंदरीत फायदे पाहणार आहोत.

1) दुपारच्या वेळी घेतलेल्या झोपेमुळे स्मरणशक्तीमध्ये वाढ होते असे संशोधनामध्ये आढळून आले आहे  दुपारच्यावेळी वामकुक्षी घेतल्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा दैनंदिन आयुष्यातील अनेक कामे व्यवस्थित स्मरणात राहिल्याचे दिसून येते. वामकुक्षी च्या अगोदर काम केल्यामुळे आलेला थकवा दूर होऊन आपल्या पंचेंद्रियांना ऊर्जा मिळून त्याचा फायदा हा आपल्या एकंदरीत कामगिरीवर ही सकारात्मक पद्धतीने दिसून येतो.

2) दुपारच्या वेळी झोप घेतल्याचा फायदा हा केवळ वामकुक्षीच्या अगोदर दिवसभरामध्ये शिकलेल्या कार्यांना व्यवस्थित स्मरणा मध्ये ठेवण्यासाठी होत नाहीतर मेंदूच्या कार्यांना सुद्धा वामकुक्षी मुळे चालना मिळते व आपण शिकलेल्या गोष्टींचा  परस्पर संबंध हा दैनंदिन आयुष्यातील संपर्कात येणाऱ्या विविध गोष्टींशी लावण्याच्या कार्यक्षमतेवर याचा प्रभाव पडतो.

3) दुपारपर्यंत एकसारखे काम केल्यामुळे एकसुरीपणा निर्माण होतो व कामांमधील कार्यक्षमता थोडीशी कमी होऊ लागते. काही वेळ वामकुक्षी घेतल्यामुळे आपल्याला या कामांमध्ये थोडासा ब्रेक मिळून आराम मिळतो व जेणेकरून आपण करत असलेल्या कामाप्रती पुन्हा एकदा सातत्य निर्माण होण्यास साहाय्य मिळते.

4) आपल्याला आळसावलेल्या सारखे वाटत असेल, थकवा आल्यासारखे वाटत असेल किंवा उदास वाटत असेल तर अशावेळी एखादा तासभर न झोपता केवळ शांतपणे पडून राहिले तरीही आपला मूड हा पुन्हा एकदा ताजातवाना होतो.

5) जेवणानंतर कित्येकांना डोळे जड झाल्यासारखे वाटते व त्यावेळी झोपेवर नियंत्रण मिळवणे खूप अवघड असल्यासारखे वाटते.अशा वेळी 15 ते 20 मिनिटांची वामकुक्षी घेतली असता शरीर जड न होता नसा मोकळ्या होतात व पुन्हा एकदा एकाग्रता निर्माण होते व आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येते.

6) वामकुक्षी ही तीस मिनिटां पेक्षा जास्त कालावधीचे नसावी. दुपारच्यावेळी जेवणानंतर दहा मिनिटे ते 30 मिनिटे इतका वेळ झोपले तर आपण पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन कामाला सुरुवात करू शकतो मात्र याउलट एक तासापेक्षा जास्त वेळ दुपारी झोपले असता उठल्यानंतर ताजेतवाने वाटण्याऐवजी थकवा आलेला जाणवतो त्यामुळे दुपारच्या वेळी जितका थोडा कालावधी तुम्ही झोपाल तितके त्याचे फायदे आपल्या शरीराला अधिक मिळतात.

…म्हणून दुपारच्या वेळी झोप घेणे आहे फायदेशीर: : भाग २