Home » नाचणीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचून नक्की कराल आहारात समावेश…!
Health

नाचणीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे वाचून नक्की कराल आहारात समावेश…!

भारतीय आहाराला समतोल मानले जाते कारण भारतीय आहारामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ,जीवनसत्वे या सर्वांचा समावेश असलेल्या विविध घटकांचा समावेश केला जातो. नाचणी हा असाच एक पौष्टिक पदार्थ भारतीय आहारामध्ये प्रत्येक प्रांतामध्ये आढळतो.

नाचणी चा वापर हा त्याचे पीठ करून या पिठाद्वारे विविध पदार्थ करून केला जातो. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धा पर्यंत सर्वांसाठीच नाचणी हा पचण्यास हलका व विविध फायदे असलेला पदार्थ आहे. आज आपण नाचणीच्या सेवनाने आपल्या शरीराला मिळणारे फायदे पाहणार आहोत.

१) नाचणी हा प्रथिनांचा अतिशय उत्तम असा स्त्रोत आहे. नाचणीच्या पिठाचा एक कपभर समावेश आपल्या आहारात केला तर शरीराला १०.३ ग्रॅम इतके प्रथिने मिळतात. शाकाहारी लोकांसाठी नाचणी हा प्रथिने मिळवण्यासाठीचा उत्तम पर्याय आहे. प्रथिने ही आपल्या शरीरातील पेशींच्या कार्यासाठी व शरीरातील ऑक्सिजन विविध अवयवांना पुरवण्यासाठी खूपच आवश्यक असतात.

२) तंतुमय पदार्थांचे सेवन करणे हे पचनासाठी खूप आवश्यक असते. नाचणीमध्ये विरघळू शकणारे तंतूजन्य पदार्थ असतात यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. एक कपभर नाचणीच्या पिठापासून जवळपास 16 ग्रॅम इतकी तंतूजन्य पदार्थ आपल्या शरीराला मिळतात.

३) ज्या व्यक्तींना ग्लुटेनची एलर्जी असते अशा व्यक्तींसाठी नाचणी हा अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. नाचणी ग्लुटेनफ्री आहे.भारतीय नाष्ट्यांमध्ये नाचणीचे डोसे किंवा घावन हा एक चविष्ट पदार्थ आहे.

४) नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. अँटिऑक्सिडंट मुळे संसर्गजन्य आजारांपासून शरीराला संरक्षण मिळते.

५) मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी नाचणी ही फायदेशीर ठरते. नाचणीमुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते.

६) लहान मुलांसाठी नाचणी हा एक पौष्टिक आहार ठरतो. नाचणी ज्वारी व खजूर या पदार्थांचे एकत्र मिश्रण हे लहान मुलांना पोषण देते व दीर्घकाळपर्यंत ऊर्जा सुद्धा पुरवते.

७) नाचणीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या मॅग्नेशियम पैकी 50 टक्के मॅग्नेशियम आढळते. मॅग्नेशियम हे हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी खूप आवश्यक असते. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी नाचणीचा आपल्या आहारात अवश्य सामावेश करावा. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात तंतूजन्य पदार्थ असतात. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल बाहेर पडण्यास मदत होते व गुड कोलेस्टेरॉल चा संचय होतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.

८) नाचणीमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम व तंतुजन्य पदार्थ खूप मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरातील ऊर्जा दीर्घकाळपर्यंत टिकून ठेवण्यास सहाय्य मिळते. क्रीडा प्रकारांमध्ये सक्रिय असलेल्या व्यक्तींसाठी दीर्घकाळपर्यंत ऊर्जा टिकून ठेवणे व आपली कामगिरी उंचावण्यासाठी नाचणीचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

९) नाचणीमध्ये कॅल्शियमचा साठा असतो .यामुळे दातांचे व हाडांचे आरोग्य राखले जाते तसेच लाल रक्तपेशींची संख्या ही वाढवली जाते. लाल रक्तपेशी या शरीराला रक्तपुरवठा सुरळीतपणे करण्याचे कार्य करतात.