Health

उन्हाळ्यात घामोळ्यांपासून बचाव करण्यासाठी हे १२ घरगुती उपाय, ७ वा उपाय आहे सर्वात सोपा

Prickly Heat Marathi
Prickly Heat Marathi

भारतीय हवामानानुसार तीन ऋतू भारतामध्ये अस्तित्वात आहेत. या तीनही ऋतुंमध्ये भौगोलिक व वातावरणीय बदल घडून येतात व याचा प्रत्यक्ष प्रभाव येथील रहिवाशांच्या राहणीमानावर पडत असतो. प्रत्येक ऋतूमध्ये काही आरोग्यविषयक समस्या उद्भवतातच. उन्हाळ्याचे आगमन होताच उष्णता, अतिरिक्त धूळ ,प्रदूषण इत्यादीमुळे हमखास सतावणारी समस्या म्हणजे घामोळ्या होय.घामोळ्यांचे  दुसरे नाव म्हणजे मिलियारिया होय. उन्हाळा सुरू झाला की घामोळ्यांवर प्रभावी उपचार म्हणून निरनिराळ्या टाल्कम पावडर, प्रिकली हीट पावडर बाजारामध्ये उपलब्ध होतात. या प्रिकली हीट पावडर सोबतच काही घरगुती उपाय सुद्धा आहे ज्यामुळे घामोळ्या मुळे निर्माण होणाऱ्या जळजळ, कोरडेपणा व खाजे पासून सुटका मिळू शकते.

घामोळ्या होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्वचेवर निर्माण होणारा घाम शरीरातून त्वचेद्वारे बाहेर न पडता त्वचेच्या रंध्रांमध्ये अडकून राहतो व यामुळेच आपल्या बगल ,कंबर ,मान, पाठ या अवयवांवर मुख्यत्वे घामोळ्या झाल्याचे दिसून येते.

1) गुलाबजल आणि चंदन – गुलाबजल आणि चंदन या मुळातच थंड असलेल्या या पदार्थांच्या वापरामुळे घामोळ्या पासून बचाव होऊ शकतो. चंदन पावडर साधारण चार चमचे आणि त्या प्रमाणात गुलाबजल घेऊन त्यांचे व्यवस्थित मिश्रण करावे व हा लेप घामोळ्या असलेल्या ठिकाणी लावावे. हा लेप सुकल्यानंतर व्यवस्थित धुऊन घ्यावे. गुलाब जल त्वचेचा ph बॅलन्स राखतो तर चंदन घामोळे असलेले ठिकाणी थंडपणा निर्माण करते.हा लेप सातत्याने लावला तर काही दिवसातच  घामोळ्या पासून निश्चितच सुटका मिळू शकते.

2) बेकिंग सोडाः घरामध्ये निरनिराळ्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोड्याचे सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे.बेकिंग सोड्याच्या वापरामुळे शरीराच्या त्वचेवरील निस्तेज थर निघून जातो व पीएच समतोल राखला जातो. साध्या पाण्यामध्ये तीन ते चार चमचे बेकिंग सोडा घेऊन तो घामोळे झालेल्या त्वचेवर लावून नंतर धुवून.काढल्यावर त्वचे वरील शुष्कपणा गेला असे दिसते. बेकिंग सोड्याच्या वापराने निरनिराळ्या प्रकारचा संसर्ग दूर केला जाऊ शकतो.

3) कोरफडः कोरफड थंडावा देणारी व त्वचेच्या संक्रमणापासून बचाव करणारी वनस्पती मानली जाते. कोरफड जेलचा वापर करून कोरड्या त्वचेला ओलावा दिला जाऊ शकतो. कोरफड मध्ये विटामिन सी, विटामिन ईआणि बीटा कॅरेटिन हे घटक असतात. कोरफड वापरल्यामुळे घामोळ्यांसोबत महत्वाच्या विकारांपासून सुद्धा संरक्षण मिळते.

4) मुलतानी माती आणि नींबू ः मुलतानी माती मध्ये धुळ ,त्वचेमधील घाण व घाम शोषून घेण्याची क्षमता असते.मुलतानी माती त्वचेला थंडावा सुद्धा देते त्याच प्रमाणे त्वचाविकार यांना कारणीभूत होणाऱ्या संसर्गापासून सुद्धा बचाव करते .लिंबामध्ये अँन्टी बॅक्टेरियल आणि अँन्टी व्हायरल गुणधर्म असतात. या दोन्हींच्या मिश्रणामुळे निश्चितच घामोळ्यांना दूर ठेवले जाऊ शकते .कडूनिंबाच्या झाडाची पाने  आंघोळीच्या पाण्यामध्ये उकळून हे पाणी अंघोळीसाठी वापरले तर अनेक त्वचा विकारांना दूर ठेवले जाऊ शकते.

5) काकडी आणि पुदिन्याची पाने बारीक वाटून घ्यावे व.यामध्ये थोडेसे गुलाब पाणी टाकून हे मिश्रण घामोळ्या मुळे जळजळ होणाऱ्या भागांवर लावले असता शरीराचा होणारा दाह कमी होतो.

6) हळदः हळदीचे औषधी गुणधर्म सर्वज्ञात आहेत.हळदी त्वचेच्या जळजळीपासून संरक्षण देते. हळद आणि मेथीच्या बियांना एकत्र करून वाटावे व हा लेप अंघोळीच्या अगोदर पाच मिनिटे घामोळ्या झालेल्या ठिकाणी लावावा व नंतर धुऊन.टाकावा.

7) बर्फ ः घामोळ्या मुळे जेव्हा सर्वांगाची लाहीलाही होत असते तेव्हा एक तातडीचा उपाय म्हणजे बर्फाचा तुकडा कपड्यामध्ये गुंडाळून तो घामोळ्या झालेल्या ठिकाणी लावला असता जळजळ होण्यापासून काही काळ  आराम मिळू शकतो.

8) नारळाचे तेल आणि कापूरः नारळाचे तेल आणि कापूर यांचे मिश्रण दैनंदिन तत्त्वावर रोज लावले तर अनेक त्वचाविकार यांपासून संरक्षण मिळू शकते.

9) कडुनिंबाची पाने आणि तुळशीचे पाने यांचा लेप लावल्यामुळे सुद्धा घामोळ्या पासून बचाव होऊ शकतो.

10) मेहंदी हा थंड गुणधर्म असलेला घटक आहे त्यामुळे मेंदीच्या वापरामुळे उन्हाळ्यात तळपायाची, हाताची आग रोखली जाऊ शकते. त्याच प्रमाणे केसांमध्ये मेहंदी लावल्यामुळे केसांमध्ये होणाऱ्या घामोळ्या पासून बचाव होऊ शकतो.

11) खसखस आणि आवळ्याचे चूर्ण एकत्र करून खाल्ले असता शरीरामधील अंतर्गत उष्णता कमी होते व त्वचा विकारांपासूनही संरक्षण मिळते.

12) कच्च्या कांद्याचा रस हासुद्धा अनेक त्वचाविकारात आणि विशेषतः घामोळ्यापासून संरक्षण देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. कच्च्याकांद्याचा रस आणि तूप एकत्र करून ते घामोळ्या आलेल्या भागावर लावले असता काही दिवसांनी घामोळे नाहीसे.होते.