पावसाळ्यात का वाढते डेंगू आणि मलेरियाचे थैमान? जाणून घ्या याची कारणे आणि उपाय

पावसाळ्यात का वाढते डेंगू आणि मलेरियाचे थैमान? जाणून घ्या याची कारणे आणि उपाय

पावसाळा आला कि रोगराईचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होते. सर्दी, खोकला, मलेरिया, डेंगू इत्यादी आजार पावसाळा आला कि डोकं वर काढतात. मात्र हे आजार होण्याची कारणं आणि उपाय जाणून घेतल्यास या आजारांपासून दूर राहणं किंवा त्यांना दूर करणं सहज शक्य आहे. ‘बीइंग महाराष्ट्रीयन’च्या आजच्या लेखात आपण याविषयी माहिती पाहणार आहोत.

डेंगू : डेंग्यूचा ताप हा एडिज नामक डासाने चावा घेतल्यामुळे होतो. या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यामध्ये होते. डेंगू झाल्यानंतर अंगदुखी, ताप, सांधेदुखी इत्यादी लक्षणं दिसायला सुरु होतात. त्यामुळे अशा डासांची उत्पत्ती आपल्या घरात आणि परिसरात होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मलेरिया : ‘एनिफिलीज’ या डासाच्या मादीने चावा घेतल्यास मलेरिया होतो. ताप आणि अंगदुखी ही मलेरियाची महत्वाची लक्षणे आहेत. नाली, गटारं, साचलेले डबके यामंध्ये डीडीटी पावडर शिंपडल्यास अशा डासांची उत्पत्ती होत नाही. या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

सर्दी-खोकला : पावसाळ्याव्यतिरिक्तही वर्षभर होणारा आजार म्हणजे सर्दी-खोकला होय. सर्दी-खोकल्यामुळे कधीकधी तापही येऊ शकतो. सर्दी-खोकला झालेल्या संक्रमित व्यक्तीपासून दूर राहून हा आजार टाळता येतो. त्याचप्रमाणे पावसात भिजणे टाळावे तसेच भिजल्यास अंग आणि डोके व्यवस्थित कोरडे करावे.

टायफाईड : पावसाळ्यात टायफाईड हा जीवघेणा आजारदेखील बऱ्याच जणांना धडकी भरवतो. अस्वच्छ अन्नपदार्थ खाल्ल्याने तसेच दूषित पाणी पिल्याने टायफाईड होतो. त्यामुळे शक्यतो स्वच्छ अन्न आणि पाण्याचे सेवन करावे तसेच बाहेरील उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत. वर नमूद केलेल्या सर्व आजारांविषयी लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.